पहाडात न पुरणारा श्वास

By admin | Published: August 13, 2015 02:57 PM2015-08-13T14:57:53+5:302015-08-13T14:57:53+5:30

एकदा तरी लेह-लडाख ट्रीप करायचीच. सायकल रॅली, बाइक रॅली करायचीच, कारगिलला जायचंच, असं अनेकजण उत्साहात ठरवतात. पण जिथे कसलेले साहसवीर कमी पडतात, तिथं ‘हौशी’ मंडळींनी काय काळजी घ्यायला हवी?

Breathlessness | पहाडात न पुरणारा श्वास

पहाडात न पुरणारा श्वास

Next
>- खुल्या हवेत फिरताना ऑक्सिजनअभावी जीव जाऊ शकतो, यावर अनेकांचा विश्वास बसत नसला तरी ते खरंय! 
नाशिकच्या एका गुणी सायकलपटूचा मनाली ते लेह-लडाख सायकल प्रवासादरम्यान मृत्यू झाला. सायकल रॅली करणारे आणि बायकर्स सगळेच या बातमीनं हादरले. हळहळले.
मुख्य म्हणजे कधीतरी एकदा कारगिलला जायचं, कधीतरी एकदा लेह-लडाख ट्रीप करायची असं जे मनाशी ठरवतात, ते तर खूपच धास्तावले असणार!
अशा अॅडव्हेंचर टुर्स करणा:या अनेकांसमोर प्रश्न असतो की, या माउण्टन सिकनेसचं करायचं काय? हे मान्यच करायला हवं की, हिमालय ही अलग दुनिया आहे. तिथं माउण्टन सिकनेस आपल्याला गाठू शकतोच. आणि तसा त्रस तिथं आपल्याला होईल की नाही, हे घरबसल्या कळण्याची काही टेस्ट नाही. ते तिथं गेलं कीच कळतं! 
उंचावरच्या त्या जगात काहीजण अगदी इथल्यासारखेच नॉर्मल असतात. बहुतेकांना थोडाफार त्रस होतो. काहींना हेलिकॉप्टरमधून कमी उंचीवर आणण्याची वेळ येते, तर चुकून कधी प्राणावरही बेततं. लेहच्या सरकारी रु ग्णालयात माउण्टन सिकनसेवर उपचार घेण्यासाठी टुरिस्ट्सची गर्दी आताशा नेहमीच असते. पण योग्य काळजी घेतली, शरीराचं आणि निसर्गाचं म्हणणं ऐकत प्रवास केला तर आपल्याला या माउण्टन सिकनेसशी दोन हात करण्याचे प्रयत्न तरी करता येऊ शकतात.
आणि तरीही नाही जमलं तर आपण थांबू, पुन्हा प्रयत्न करू हे मान्यही करायला हवं!
 
उंचीची गणितं
आपल्याकडचं सर्वात उंच शिखर कळसूबाई समुद्रसपाटीपासून साडेपाच हजार फूट उंचीवर आहे. श्रीनगर आणि मनाली सहा-सात हजार फूट, लेह शहर 12 हजार फूट आणि या टूरमधला सर्वांत उंच पॉइंट म्हणजे खार्दुंगला साधारण 18 हजार फूट उंचीवर आहे. म्हणजे श्रीनगर किंवा मनाली कुठूनही सुरु वात केली तरी सात ते 18 हजार फूट उंचीच्या दरम्यान आपण चढ-उतार करत राहतो.
दोन्ही ठिकाणांहून थेट लेहला पोहोचता येत नाही. मधे कुठेतरी एक रात्र राहावं लागतं. मनालीमार्गे सुरु वात करणारे केलाँग, जिस्पा किंवा सार्चूमध्ये एक किंवा दोन रात्री राहतात. श्रीनगरमार्गे प्रवास करणारे कारगिल किंवा मुलबिकला मुक्काम करतात. एकतर एवढं मोठं अंतर सलग कापणं शक्य नसतं आणि अॅक्लेमटाइज होणं, म्हणजेच विरळ हवेत तग धरण्यासाठी आपलं शरीर तयार करणं गरजेचं असतं. 
यापैकी कारगिल साडेआठ हजार फुटांच्या आसपास आहे. जिस्पा आणि केलाँग दहा-साडेदहा हजार फूट. सार्चू मात्र तब्बल 14 हजार फुटांवर म्हणजेच लेहपेक्षाही अधिक उंचीवर आहे. जिस्पाच्या तुलनेत सार्चूला राहण्याची चांगली सोय आहे. त्यामुळे बहुतेक बाइकर्स आणि टुरिस्ट सार्चूला मुक्काम करतात. पण अनेकांसाठी तेच घातक ठरतं. दिवसभर उंच भागांत भटकंती केली तरी चालेल. पण झोप मात्र सखल भागातच घ्या, हा इथला रूल! मनालीहून थेट सार्चूला आलेल्या जवळपास सर्वासाठीच ती रात्र त्रसदायक ठरते. माउण्टन सिकनेसने बरेचजण बेजार होतात. हेच तुम्ही लेहहून परतताना सार्चूला राहिलात किंवा जिस्पा, केलाँगमध्ये एक रात्र राहून दुसरी रात्र सार्चूत घालवलीत तर मात्र त्या तुलनेत कमी त्रस होतो. कारण शरीर आधीच अॅक्लेमटाइज झालेलं असतं. 
श्रीनगर-लेह मार्ग भौगोलिकदृष्टय़ा आणि अक्लेमेटायङोशनच्या दृष्टीनेही अधिक सुरक्षित मानला जातो. मनाली-लेह अतिशय बेभरवशाचा आणि विरळ हवेमुळे नाकीनव आणणारा मार्ग म्हणून ओळखला जातो. पण तिथलं सौंदर्य रिस्क घ्यायला भाग पाडतं. 
दोन्ही मार्ग नयनरम्य आहेत. आकाशात घुसलेले सुळके तासून तयार केलेले हे नागमोडी घाटरस्ते पार करताना साहस आणि स्टॅमिनाचा पुरेपूर कस लागतो. त्याच वेळी निसर्गाची सतत बदलणारी रम्य रूपं पाहताना अक्षरश: वेड लागायची वेळ येते. मात्र या सा:या खिंडी ज्याला पास म्हणतात, ते स्नो फॉल, लँडस्लाइड, स्नो स्लाइड किंवा एखाद्या अपघातामुळे कधीही बंद पडू शकतात आणि तासन्तास अडकून पडण्याची वेळ येऊ शकते. रस्ते निर्मनुष्य असल्यामुळे आणि फोन, इंटरनेट अतिशय बेभरवशाचं असल्यामुळे वाहन वाटेत बंद पडलं तर कित्येक तास कोणतीही मदत मिळत नाही. 
सपाटीच्या भागात आपण रोज 1क्क् किमी कापतो म्हणून लेहमध्येही तसंच करता येईल, या भ्रमात राहू नये. इथल्या विरळ हवेत लवकर दमछाक होते. त्यामुळे आपल्या क्षमतेचा अंदाज घेत सावकाश सायकलिंग करावं. उंची गाठल्यानंतर एक-दोन दिवस केवळ विश्रंती घ्यावी. या काळात थोडंफार फिरून वातावरणाची सवय करून घ्यावी. थंडीमुळे तहान लागत नाही. तरीही दर तासाने एक ग्लास पाणी प्यावं. डोकेदुखी, जेवावंसं न वाटणं ही माउण्टन सिकनेसची लक्षणं म्हणून गृहीत धरावीत आणि औषधोपचार व विश्रंती घ्यावी.
हे सगळे धोके पत्करूनही अनेक टुरिस्ट, बायकर्स तिथं जातात, जीव धोक्यात घालतात कारण त्यातलं थ्रिल आणि आनंद त्याला वेड लावणारा असतो. 
पण त्या आनंदात स्वत:ची काळजी मात्र घ्यायलाच हवी!
 
 
 
माउण्टन सिकनेसची लक्षणं
- तीव्र डोकेदुखी
- मळमळ 
- उलटी होणो
- चालताना दम लागणो
- हात, पाय, चेह:यावर सूज येणो
- अन्नावरची इच्छा उडणो
- धाप लागणो
- झोप उडणो
 
दक्षता काय घ्यावी लागते?
- मनाली किंवा श्रीनगरहून निघाल्यापासूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती औषधं घ्यायला सुरुवात करावी.
- उंची गाठताना टप्प्याटप्प्यात प्रवास करावा.
- शरीर नीट अॅक्लेमटाइज होण्यापूर्वी धावपळ करू नये. 
- थोडय़ा-थोडय़ा वेळाने पाणी पीत राहावे.
- सोबत नेहमी पुरेसे खाद्यपदार्थ ठेवावेत.
- गाडीत पुरेसं पेट्रोल आहे ना आणि गाडी फिट आहे ना हे तपासून घ्यावं. 
- त्रस झाल्यास त्वरित जवळच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावेत.
 
 
- सुशांत करंदीकर,  अॅडव्हेंचर टूर ऑपरेटर 
( शब्दांकन - विजया जांगळे)

Web Title: Breathlessness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.