ये अपून का स्टाईल है! असं म्हणा की ठसक्यात.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 07:12 AM2019-12-26T07:12:00+5:302019-12-26T07:15:05+5:30
असू द्या की डाऊनमार्केट! ‘क्लासी’ होण्याच्या धडपडीपेक्षा ‘आपण करू ती स्टाइल’ होऊच शकते की!
प्राची पाठक
आपल्याकडचं ते सारं डाऊनमार्केट आणि इतरांचं ते एकदम भारी, असं खरंच काही असतं?, पण आपल्याला मात्र तसं वाटत असतं. कॉलेजमध्ये कोणाच्या तरी हाताला एकदम भारीतलं घडय़ाळ दिसतं. सगळी मुलं त्या घडय़ाळाचं कौतुक करत असतात. घडय़ाळ कुठून घेतलं ते कोणी विचारतं, कोणी त्याची किंमत काढून अवाक् होतं. नकळत आपण आपल्या हातातल्या घडय़ाळाकडे बघतो. ते आता आपल्याला खूपच जुनं आणि फालतू वाटायला लागतं. कोणी ब्रँडेड कपडे घालून येतात. जाम मिरवत असतात. आपल्याला ते कपडे परवडत नसतात. कोणी महागडे शूज आणि मॅचिंग एक्सेसरीज वापरतात. कोणाकडे स्टायलिश बाइक असतात, तर कोणाच्या खिशात लेटेस्ट स्मार्ट फोन. काही मुलं शहरातल्या नावाजलेल्या कॉलेजमध्ये जात असतात. आपल्याला मात्न तिथे अॅडमिशन मिळू शकलेली नसते. आपण साध्याशा कुठल्यातरी कॉलेजमध्ये शिकत असतो. ते कॉलेज खूप लोकांना डाउनमार्केट वाटत असतं. लोकांचं ऐकून आपणही आपल्या कॉलेजला डाउनमार्केट समजायला लागतो. कोणी एकदम हायटेक टेबल मॅनर्स शिकतात. ते न येणारे लोक आपोआप डाउनमार्केट होतात. उजव्या हातामध्ये काटा-चमचा ठेवायचा की त्या हातात सुरी ठेवायची, याचा आपल्या डोक्यात गोंधळ उडालेला असतो. मित्नांसोबत एकत्न जेवायला गेल्यावर आपला हात थरथरत असतो. दुसरे लोक आधी जेवायला सुरू करतील आणि मग आपण त्यांचं पाहून तसं करू, याची आपण गुपचूप वाट बघत असतो. ते कसं खातात याचं निरीक्षण करतो. कारण, हातानं खाणं डाउनमार्केट आहे, असं आपल्यावर बिंबवलेलं असतं. भर उन्हाळ्यात कोणी आपल्याला डाउनमार्केट म्हणू नये, म्हणून आपण कोट-टाय वगैरे लावून त्यात गुदमरत फिरत असतो. काही गोष्टी आपल्याला डाउनमार्केट वाटत असतात. तर काही गोष्टी या डाउनमार्केट आहेत, असं इतरांनी आपल्यावर थोपवलेलं असतं. मग आपण कसे ‘क्लासी’ आहोत, हे दाखवायची सततची धडपड आपण करत बसतो.
काय करता येईल?
मुळात एखादी गोष्ट डाउनमार्केट आहे, असं आपल्या मनात का येतं, त्याचा विचार करता येईल. सगळे म्हणतात म्हणून आपण एखाद्या गोष्टीला डाउनमार्केट समजतोय का, याचा खोलात जाऊन विचार करता येईल. अनेकदा आपण लॉजिक गुंडाळून ठेवून वागत असतो. डोक्यावर सूर्य तळपतो आहे, आपण पब्लिक ट्रान्सपोर्टने अमुक ठिकाणी जाणार आहोत, हे सर्व माहीत असूनही घट्ट टाय बांधून, शर्टावर जाड कोट चढवून फिरायची काय गरज? हा प्रश्न तरी आपल्याला पडतो का? अशा गोष्टींचा आपण लॉजिकली विचार करायला शिकू या. आजूबाजूचं हवामान काय आहे आणि आपण काय पेहराव केला आहे, याची संगती लावून बघू या. आपल्याला कम्फर्ट मिळत नाही तरीही आपण केवळ सगळे करतात म्हणून या गोष्टी करत असतो. अशा गोष्टींची आधी यादी करू या. त्या गोष्टींमध्ये नेमकं काही तथ्य आहे की नाही, ते शोधू या. मॅनर्स म्हणून काटा चमच्याने खायला शिकावं ही वेगळी गोष्ट आहे. एक बंधन म्हणून असंच वागायचं आणि तसंच करायचं अशी सक्ती, ही वेगळी गोष्ट आहे. ते केलं नाही तर तुम्ही डाउनमार्केट, गावठी असायची काही गरज नसते, हे डोक्यात फिक्स करू.
त्याने काय होईल?
1- ज्याला डाउनमार्केट समजतात, ते केवळ एटिकेट्स पाळण्यातून आलेलं बंधन असू शकतं. याचं भान आपल्याला येईल.
2- केवळ लोक म्हणतात/करतात म्हणून एखाद्या गोष्टीचा ताण घ्यायची गरज नाही, हे आपण शिकू.
3- आपल्याही विचारांची एक रोलर कोस्टर राइड होऊन आपण ज्याला डाउनमार्केट म्हणतोय, ते खरंच तसं आहे का, हे आपलं आपणच तपासायला लागू.
4- आपले कपडे, शूज, बाइक, कार, फोन, आपेलं कॉलेज, नोकरी याच्याविषयी कमीपणा बाळगायची आपली सवय निघून जाईल.
5- ‘आपण करू ती स्टाइल’, असे ट्रेंड सेटर व्हायचा आत्मविश्वास मिळेल.