पापा कहते है, बडा नाम करेगा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 08:50 AM2019-12-26T08:50:01+5:302019-12-26T08:55:01+5:30
मोठं झाल्यावर कोण व्हायचं या प्रश्नाच्या उत्तराचा शोध.
प्राची पाठक
आपल्याला काय बनायचं आहे, मोठेपणी काय व्हायचं आहे, हे प्रश्न फार लवकर आपल्या अंगावर आदळत असतात. मोठेपणी म्हणजे नेमकं किती मोठं झाल्यावर हे मात्र प्रत्येकाच्या मतानुसार वेगवेगळं असतं. मुलगा मुलगी आठवी- नववीत जाण्याइतके मोठे झाले की ही मजा जरा सिरीअस व्हायला लागते. ‘तुला चांगले मार्क्स पडलेच पाहिजेत’, ‘हा सगळा मार्काचा खेळ आहे’, ‘नाहीतर भविष्यात तुझं काही खरं नाही’, अशी शेरेबाजी घरातून, बाहेरून वाढू लागते. इथेही आपलं नेमकं काय म्हणणं आहे यापेक्षा आजूबाजूच्या लोकांना आणि पालकांना नेमकं काय म्हणायचं आहे, शिक्षणासाठी आपलं बजेट काय आहे घरातलं, वगैरे मुद्दे समोर येतात. काही मुद्दे परिस्थितीनुसार बरोबरदेखील असतात.
अनेकांनी आपल्याला अमुक तमुकच व्हायचं हे मनाशी ठरवूनच टाकलेलं असतं. त्याशिवाय दुसर्या पर्यायांकडे पाहायलाही ते तयार नसतात. त्यात खरोखर आपल्याला गती आहे की नाही, त्याकडे आपला कल आहे, की नाही, हेही अनेकांना माहीत नसतं. आपल्याला लाख काय काय ट्राय करायचे असेल; परंतु, घरातली परिस्थिती, आर्थिक गणितं, आपली आवड आणि कुवत यापैकी कुठल्याच गोष्टींवर विचार केलेला नसतो आणि मुख्य म्हणजे ‘मार्केट’मध्ये सध्या काय चालू आहे, हेही माहीत नसतं.
* काय करता येईल?
मी अमुकच होईन आणि तमुक होणारच नाही, मला हे जाम आवडतं आणि ते अजिबातच आवडतच नाही, अशी फिक्स गणितं डोक्यात घेऊन बसू नका. आपल्याला आवडीचं शिक्षण, काम, जॉब आपल्याला मिळाला तर उत्तमच; पण नाही मिळाला म्हणून निराश होऊ नका. आपली आवड, इंटरेस्ट चेंज होत असते, होऊ शकते, हेही लक्षात ठेवा. मुख्य म्हणजे ‘ओपन माइण्डेड राहा. विद्यार्थी म्हणून, ट्रेनी म्हणून वाटेल त्या क्षेत्नात थोडीफार लुडबुड करून बघायची संधी शिकणार्या मुलांसाठी उपलब्ध असते. तुम्ही कोणत्याही क्षेत्नात काम करून बघायची इच्छा व्यक्त केली, तर वेगवेगळे मार्ग त्यातून नक्कीच सापडत जातात. त्यानुसार थोडंफार शिक्षण सुरू करता येतं आणि ते करताना इंटर्नशिप म्हणून, ट्रेनिंग म्हणून किंवा चक्क नोकरी म्हणूनसुद्धा नवनवीन गोष्टी करून बघता येतात. काही आठवडे ते काही महिने अशी ही प्रोसेस आपल्याला आयुष्यभरासाठी समृद्ध करून जाऊ शकते.
* त्याने काय होईल?
1- नवनवीन गोष्टी शिकता येतील.
2- त्या त्या क्षेत्रातल्या प्रोफेशनल लोकांशी ओळखी होतील. त्यातील खाचाखोचा आधीच माहीत होतील.
3- आपला कल, आवड समजू शकेल, डेव्हलप होऊ शकेल.
4- ऑन जॉब ट्रेनिंग्समुळे एरवी ज्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळणं अवघड असतं, तिथेही ट्रेनी म्हणून जाता येऊ शकतं.
5 - आपण जे नुसतंच पुस्तकी शिकत आहोत, त्याचा प्रॅक्टिकल उपयोग कळायला लागतो.