कोण म्हणतं व्यायाम करायला पैसे लागतात? फुकट ते पौष्टिक, हे विसरु नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 07:15 AM2019-12-26T07:15:00+5:302019-12-26T07:15:01+5:30
महागडय़ा ‘एक्सरसाइज’ची धडपड सोडून साध्या-सोप्या व्यायामाची सवय
प्राची पाठक
नवीन वर्षाच्या संकल्पांमध्ये सातत्याने केला जाणारा संकल्प म्हणजे सकाळी उठून चालायला जाणं! वषार्नुर्वष लोक हा संकल्प करत असतात. त्यांना चालायला जायचं असतं, तेही पहाटे लवकर उठून. एक वेळ चालायला जाणं जमून येईल. परंतु, पहाटे उठून चालायला जाणं काही जमून येत नाही. सगळं घोडं अडतं ते सकाळी लवकर उठण्यावर. तरीही लोक वर्षाच्या सुरुवातीला आणि काहीजण महिन्याच्या सुरुवातीलासुद्धा पहाटे उठून चालायला जायचा संकल्प करतच राहतात. तो नव्याचे नऊ दिवस तरी टिकतो की नाही, तो वेगळा मुद्दा आहे!
कुणी जीम लावतं, कोणी भारीतल्या योग मॅट्स आणून कोणत्यातरी क्लासला जातांना आपल्याला दिसतं. कोणी हाताला महागडे वॉच वगैरे लावून फिरताना दिसतं. कोणी फोनमध्ये आरोग्याशी संबंधित अॅप्सची भली मोठी जंत्रीच डाउनलोड करून ठेवलेली असते. सतत ते त्यात काहीतरी मोजत बसलेले असतात. आपलं एकेक पाऊल सुद्धा मोजायचं बाकी ठेवत नाहीत! त्या प्रत्येक पावलागणिक आपण किती कॅलरीज खर्च केल्या, याचा हिशोब करून ते सुखावत असतात. कोणी मॅरेथॉन ग्रुप्स जॉइन करतात. कोणी महागडय़ा सायकली विकत घेतात आणि दर महिन्याला सायकलीवर कुठे सफरी केल्या, याचे फोटो सर्वत्र पसरवत राहतात.
आणि मग आपल्याला वाटतं की, आपला वेळ जमत नाही, आपलं बजेट जमत नाही. आपलं कसं होणार असं म्हणत आपण कुढत बसतो.
काय करता येईल?
आपण आपलं रुटीन बघावं. आपल्याला झेपेल, आपल्याला जमेल असा व्यायाम सुरू करावा. त्यासाठी सकाळी उठलंच पाहिजे, असं स्वतर्वर बंधन घालून घेण्याची काहीच गरज नाही. दिवसभरात केव्हाही मी अमुक मिनिटं व्यायामासाठी काढेन, असं ठरवता येतं की! आपण जिथे असू तिथेच हातापायाचे व्यायाम करता येतात. मानेचे, डोळ्यांचे व्यायाम करता येतात. रोजच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावर रिक्षा किंवा बस पकडतो तिथे किंवा जिथे गाडी पार्क करतो तिथेही थोडासा बदल करून जरा चालत जाऊन पुढून गाडी पकडता येते. गाडी लांब पार्क करत चालत जाता येतं. अभ्यास करताना वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये व्यायाम करत अभ्यास करता येतो. बसून, झोपून पुस्तक वाचण्यापेक्षा एखाद्या स्टॅंडवर पुस्तक ठेवून ते उभं राहून वाचता येईल, अशी सोय करता येते. आपला इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर वाया जाणारा वेळ नीट प्लॅन करता येतो. त्याचवेळी आहार आणि झोप यावरदेखील नीट काम होऊ शकतं. आपण काय खातोय, त्यात सकस अन्न किती आहे, आपलं हिमोग्लोबिन किती आहे, हे तपासता येतं. गरजेनुसार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपला आहार ठरवता येऊ शकतो. आपली झोप नीट होते की नाही ह्याचा आढावा घेता येतो. केवळ व्यायामासाठी धावत सुटण्याने, जड वजनं उचलण्याने आपण सुदृढ होत नसतो. त्यासाठी महागडय़ा जिमला गेलंच पाहिजे, असंही नसतं. आपलं आरोग्य आपल्या गरजेनुसार आपणच नीट प्लॅन करावं, हेच उत्तम.
त्याने काय होईल?
1. आपलं शरीर आणि मन या दोघांबरोबर आपण जास्त वेळ घालवू. त्यातून आपल्याच शरीराशी आपली मैत्री होईल.
2. अमुक कारणासाठी फीट राहायच्या हव्यासाच्या तावडीतून सुटका होईल, आणि आपण आपल्या शरीराशी उत्तम संवाद साधायला शिकू.