जळून खाक

By admin | Published: August 7, 2014 09:31 PM2014-08-07T21:31:39+5:302014-08-07T21:31:39+5:30

प्रिया आणि ललितची जोडी सगळ्या कॉलेजमध्ये खूपच प्रसिद्ध. पण प्रिया स्वभावानं थोडी आक्रमक. त्यामुळे ललितबाबत थोडी जास्तच पझेसिव्हही.

Burning | जळून खाक

जळून खाक

Next
>प्रिया आणि ललितची जोडी सगळ्या कॉलेजमध्ये खूपच प्रसिद्ध. पण प्रिया  स्वभावानं थोडी आक्रमक. त्यामुळे ललितबाबत थोडी जास्तच पझेसिव्हही. ललितशी दुसर्‍या कोणी मुलीनं बोलण्याचा नुस्ता  प्रयत्न जरी केला तरी तिला राग येत असे. प्रत्येक वेळी ललित तिची समजूत घालता घालता थकून जाई. अशातच वर्गातला दिलेला ‘प्रोजेक्ट’ पूर्ण करायला ललितच्या ग्रुपमध्ये संपदा आली. आणि  तेव्हापासून प्रियाचा नूरच बदलून गेला. ‘इतका वेळ कुठे होतास?’ आज उशीरच का झाला?’ एवढा वेळ कशाला चर्चा करायची असते?’ हा  सिलसिला प्रश्नांवर थांबत नसे.. त्याचा मोबाइल चेक करणं. संपदानं त्याला कॉल - मेसेज केले आहेत का यावर लक्ष ठेवणं, सतत तिरकस बोलत राहणं हे रोजचंच झालं. ललित तर तिच्या या प्रश्नांनी आणि वागण्यानं वैतागायला लागला. यासार्‍याचा त्याला खूप ताण यायला लागला. मग त्यांच्या नात्यातला दुरावा वाढायला लागला.
हे असं का झालं? 
कारण प्रियाच्या मनातला मत्सर.
मत्सराची भावना ही अशा प्रकारे नेहमीच नात्यावर खूप खोलवर परिणाम करताना दिसते. खरंतर आपल्या मनात अशा टोकाच्या भावना उमटायला लागल्या की, त्या भावनेचं सर्मथन करण्याऐवजी ती तपासून पाहणंच नेहमी उपयोगाचं ठरतं. कारण मत्सराच्या भावनेसोबतच आपल्या मनातला संशयीपणा, राग, भीती, मनात जागी झालेली असुरक्षिततेची भावना या सर्व गोष्टींची नोंद आपल्या मनानं घेणं जरुरीचं असतं. ती नोंद वेळीच घेतली तर आपल्याच लक्षात येतं की, आपल्यालाही इतक्या तीव्रपणे मत्सर वाटू शकतो. आणि त्या मत्सराला दुसर्‍या व्यक्तीचं वागणं जबाबदार नाही तर माझीच विचार करण्याची पद्धत जबाबदार आहे. हे वेळेत लक्षात आलं, ही जाणीव मनात निर्माण झाली तर आपण आपलीच ही भावना जास्त चांगल्या प्रकारे हाताळू शकतो.
या निमित्तानं आपण स्वत:मध्ये डोकावून पाहू शकतो. ते पाहिलं तर आपल्याला वाटणारी असुरक्षितता आपल्या मनात कशामुळे ठाण मांडून बसली आहे, त्याची काय कारणं आहेत याचा मागोवा घेता येऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मत्सराशी निगडित असलेली स्वत:विषयीची कमतरतेची भावना लक्षात येऊन ती कमी करण्यासाठी स्वत:लाच मदत करता येते. 
उदा. प्रियाच्या मनात असा विचार आला की, माझ्यात काही तरी कमी आहे म्हणून ललित संपदाकडे आकर्षित झाला. पण मुळात प्रियाला स्वत:विषयी कमतरतेची भावना का वाटते? तिनं ती का जोपासली आहे? याचा नीट विचार केला तर त्याची ठोस कारणं सापडत नाहीत, म्हणजे आपण उगाचच स्वत:ला कमी समजत रहातोय हे विचार केल्यावर तिच्या लक्षात येऊ शकतं. पण तसा विचारच न केल्यानं, माझ्यातच काहीतरी कमी आहे म्हणून लोकं मला नाकारतील, सोडून जातील अशा प्रकारची धारणा तयार होते. आणि त्यामुळे खूप असुरक्षित वाटत राहतं. 
थोडक्यात मनात मत्सराची भावना जागी झाली की तुम्हाला आतून हलवून टाकतेच; पण शिवाय तुमच्या नात्यालाही खूप सारा अस्थिरपणा आणते. एकदा का या गोष्टीची जाणीव झाली की, आपल्या मित्राबरोबर जोडीदाराबरोबर याची चर्चा करायला हरकत नसते. पण बोलताना ‘तुझ्यामुळे मला असा त्रास होतोय.’ असा दोषारोप करणं टाळायला हवं. आणि आपण कसे मूर्ख आहोत, आपणच वाईट अशी स्वत:विषयीची नकारात्मक स्वप्रतिमा बदलण्याचा प्रयत्नही करायला हवाच. 
- डॉ. संज्योत देशपांडे
 
खूप जेलस वाटलं तर.?
प्रियासारखंच आपलंही झालं तर अशी भावना माझ्या मनात निर्माणच कशी झाली तर असं म्हणत स्वत:ला जाब विचारण्यापेक्षा किंवा ते नाकारण्यापेक्षा ती भावना जवळच्या एखाद्या विश्‍वासू मित्र-मैत्रिणीकडे व्यक्त करा. 
समजा, असं जवळचं कुणीच नसेल तर या भावनेविषयी मनात जे काही येतं ते लिहून काढण्याचा प्रयत्न करा. विचार असे लिहून काढले तर नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला एवढा मत्सर दाटून आला आहे याची स्वत:लाच कल्पना येते. आपल्याच विचारांना तपासून पहायलाही त्याची मदत होऊ शकते. 
या विचारांमध्ये मत्सर निर्माण करणार्‍या विचारांसोबत अजूनही असे काही विचार असतात जे या भावनेची तीव्रता कित्येक पटींनी वाढवायला मदत करतात. उदा. ‘ही व्यक्ती सोडून गेली तर माझं कसं होणार?’ ‘जिच्यावर डोळे झाकून विश्‍वास ठेवावा असं मला कुणी मिळणारच नाही का’ अशा प्रकारचे विचार एका प्रकारे या भावनेची तीव्रता वाढवतच नेतात. आणि त्यामुळे या भावनेला हाताळणं खूपच कठीण होऊन बसतं.
 
ब्लेमगेम बंद कराच.
मत्सर किंवा असूया या भावना तुम्हाला स्वत:मध्ये व तुमच्या नात्यामध्ये डोकावून पाहायला भाग पाडते. स्वत:मध्ये बदल घडवून आणायलाही प्रवृत्त करते. त्यामुळेच हे लक्षात ठेवा.
मत्सर असूया या वाईट भावना आहेत त्या कधीही मनात यायला नकोत या कल्पनेतून बाहेर पडा.
या निमित्तानं नात्याविषयी, तुमच्याविषयी समजलेल्या कमतरतांची नोंद घ्या.
इतरांवर दोषारोप न करता बोलण्याचा प्रयत्न करा.
या भावनेची जबाबदारी दुसर्‍याची नसून पूर्णत: स्वत:चीच आहे याचं भान ठेवा.
स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा.

Web Title: Burning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.