भर पावसात बाइकवर बुंगाट
By admin | Published: June 16, 2016 11:45 AM2016-06-16T11:45:46+5:302016-06-16T12:28:40+5:30
पावसात बाइकवर बुंगाट फिरायचं प्लॅनिंग तुम्ही करत असाल, पण तुमची बाइक त्यासाठी तयार आहे का?
- जयेश भंडारी
(द हायकर क्लब)
हे सारं कितीही रोमॅण्टिक वाटत असलं, तरी पावसाळ्यात आपल्या गाडीची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. पावसाळ्याअगोदर जसे आपण आपले ठेवणीतले छत्र्या, रेनकोट वगैरे व्यवस्थित आहे की नाही ते तपासून घेतो व त्यांची दुरुस्ती करतो, तसंच गाडीचीही काळजी घेणं गरजेचं आहे.
कारण पाऊस कितीही रोमॅण्टिक वाटत असला तरी पावसात बाइक चालवणं हे तसं धोक्याचं असतंच. पावसाच्या माऱ्यात समोरचं कमी दिसतं, रस्त्यात खड्डे, त्यात साचलेलं पाणी, गाडी स्लिप होण्याची शक्यता या साऱ्यानं वाढतेच.
त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी (खरंतर गाडी वापरताना नेहमीच) तिची नियमित सर्व्हिसिंग करून घेणं गरजेचं आहे. बहुतकेदा गाडीची काळजी घेताना गाडीच्या चाकांकडे आपलं दुर्लक्ष होतं. वापर होऊन होऊन झिजल्यामुळे टायर्स गुळगुळीत होतात. असे टायर्स पावसाळ्यात ओल्या रस्त्यावर घसरून अॅक्सिडेंट व्हायची शक्यता असते. त्यामुळे टायर्स जास्त झिजले असल्यास पावसाळा सुरू होण्यापूर्वी बदलून घेणे आवश्यक ठरते.
दुसरी एक सहसा दुर्लक्षित होणारी गोष्ट म्हणजे स्पार्क-प्लग कॅप. बरेचदा ही कॅप सैल असल्यामुळे पावसाचे पाणी जाऊन प्लग शॉट होण्याच्या घटना घडतात. म्हणून पावसाळ्यापूर्वी ही कॅप चेक करून घ्यावी.
अशाच प्रकारे इतरही काळजी घेत आणि पावसाळ्याच्या स्वागताला आपली गाडी सज्ज ठेवू शकतो.
१) इंजिन आॅइल लेव्हल
तुमच्या गाडीला चेनगार्ड असलं तरीही पावसाळ्यात, गाळ-चिखलात चेन लवकर खराब होतेच. त्यातून तुमच्या अॅव्हरेजवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे चांगलं चेन क्लीनर आणाच. पण त्याआधी इंजिन आॅइल लेव्हल तपासून घ्या. चांगल्या कंपनीचं आॅइल वापरा. त्यामुळे गाडीची तब्येत धडधाकट राहील.
२) ओपन वायरिंग
गाडीच्या काही वायरी लोंबत असतील, बाहेर असतील तर त्याभोवती इलेक्ट्रिक टेप गुंडाळा. पावसाळ्यात या वायरींना पाणी लागतंच. त्यातून शॉर्टसर्किट होऊ शकतं. त्यामुळे या उघड्यावाघड्या वायरींचं काम आधी करा.
३) व्हील अलाइनमेण्ट
ज्यांच्या जिवावर तुम्ही बुंगाट निघता ते हे टायर्स. त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. २५ ते ३० हजार किलोमीटर गाडी फिरली असेल किंवा गाडी घेऊन पाच वर्षे होत आली असतील तर तुम्ही नवीन टायर्स घ्या. जर घासून घासून टायर गुळगुळीत झालेले असतील तर ग्रीप कमी होते, गाडी स्लिप होऊ शकते. त्यामुळे हे व्हील अलाइनमेण्टही एकदा करून घ्या.
४) ब्रेक
गाडीचे ब्रेक तर उत्तम हवेतच. ब्रेक पॅड, लायनर्स तपासून आवश्यक असल्यास बदलून घ्या. काही होत नाही म्हणत ब्रेक नसलेली गाडी अजिबात चालवू नका.
५) बॅटरी चार्जिंग
बॅटरी चार्ज आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं. अनेकांच्या गाड्या पावसाळ्यात त्रास देतात. स्टार्ट होत नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी बॅटरी चार्जिंग करून घेणं महत्त्वाचं.
१) गाडीचे आरसे चांगले आहेत की नाही ते तपासा. तेच हेल्मेटचंही. त्याच्या काचेतून चांगलं दिसेल ना पावसात हे एकदा तपासून घ्या.
२) मडगार्ड, एअर फिल्टर, प्लग इथं चिखल बसला असेल तर तो रोजच्या रोज काढा.