कॅफे- गप्पांचा, आठवणींचा एक कट्टा
By admin | Published: June 22, 2017 09:55 AM2017-06-22T09:55:07+5:302017-06-22T09:55:07+5:30
जिना चढून वर आल्यावर थेट समोरच्या कोपऱ्यातला हा टेबल. एका बाजूला भिंत आणि एका बाजूला खिडकी
- प्रसाद सांडभोर
जिना चढून वर आल्यावर थेट समोरच्या कोपऱ्यातला हा टेबल. एका बाजूला भिंत आणि एका बाजूला खिडकी. खिडकीवर पातळ लाकडी पट्ट्यांचा पडदा. दिवसा वेळेनुसार खिडकीशी वेगवेगळे कोन करून आत येणारं ऊन आणि त्यासोबत टेबलभर पडणारी पट्टेरी सावल्यांची नक्षी. एकदम मस्त जागा. या कॅफेत पहिल्यांदा आलो तेव्हा इथे बसलो होतो.
तेव्हापासून नंतर जेव्हाही आलोय तेव्हा दरवेळी इथेच बसलोय. कधी मित्रांसोबत गप्पा मारत, कधी एखादं पुस्तक किंवा मासिक चाळत, तर कधी आजच्यासारखं एकटंच बसून कॉफी पीत.आजूबाजूचं जग न्याहाळत.
बराच जुना आहे म्हणे हा कॅफे.
हे भिंतींवरचे फोटो केवढे जुने आहेत. सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीचे! किती व कोण कोण येऊन गेले असतील आजवर इथे? किती बरं जणांनी आजवर याच खुर्चीवर बसून याच कपातून त्यांच्या आवडीची कॉफी प्यायली असेल?
काहींचं रोजचं भेटण्याचं ठिकाण असेल हे.
काहींची वेटरबुवांशी ओळख असेल; आॅर्डर ठरलेली असेल. कॅफेतल्या ठरावीक जागा ठरलेल्या असतील. इथे येणाऱ्या सगळ्यांच्या मिळून केवढ्या साऱ्या आठवणी असतील या कॅफेच्या! प्रत्येकाच्या आपल्या आपल्या स्वतंत्र.
पण मग हा कॅफे जुना कसा बरं?
हा तर दरवेळी दरक्षणी नवा आहे.
ही टेबलं, खुर्च्या, कप, चमचे, पंखे असतील जुने. पण या गोष्टी म्हणजे काही हा कॅफे नव्हे!
हा कॅफे बनतो इथे येणाऱ्या माणसांमुळे आणि त्यांच्या गप्पा-विचार-आठवणी-गोष्टींमुळे.
माणसं गेली की कॅफे मोडतो.
पुन्हा नव्या माणसांसोबत नवा बनायला.
कसलं भारी!
इथे असं नुसतं बसलं ना की असलं काहीबाही सुचणं ठरलेलंच.
म्हणून ही जागा मला अजून जास्त आवडते.
कॉफी संपत आली..
अजून काय बरं आॅर्डर करूयात?