मूल्यं-तत्त्वं यांच्यासह जगता येतं?
By admin | Published: April 5, 2017 04:00 PM2017-04-05T16:00:36+5:302017-04-05T17:44:05+5:30
उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब.. या चक्रात फिरता फिरता तरुण मनांमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न
Next
>उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब.. या चक्रात फिरता फिरता तरुण मनांमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरं तर प्रयोगच - गडचिरोलीला सुरू आहे. त्याचं नाव ‘निर्माण’. डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या प्रेरणेतून या प्रयोगात एकत्र येणारं तारुण्य एका विलक्षण अनुभवातून जातं.
गेल्या पाच वर्षांत ‘निर्माण’च्या एकूण पाच बॅचेसमध्ये ७००हून अधिक मुलामुलींनी हा अर्थपूर्ण अनुभव घेतला. त्यातल्या काहींनी सामाजिक कामात उडी घेतली आहे. काही पुढलं शिक्षण - जॉब या मार्गाने गेले असले तरी त्यांनी बदलत्या समाजाकडे पाहण्याची ‘वेगळी’ नजर कमावली आहे. समाजासाठी काही करावं असं वाटणाऱ्या साऱ्यांनाच जे प्रश्न पडतात,
त्या प्रश्नांची उत्तरं स्वत:पुरती शोधण्याचा प्रयत्न या निर्माणी दोस्तांनी केलेला आहे.
म्हणून त्यांनी सांगितलेली ही अवघड प्रश्नांची उकल..
त्यातला हा चौथा प्रश्न : मूल्यं-तत्त्वं यांच्यासह जगता येतं?
माणुसकीचं काय ते बोला..
इतर सजीव आणि यंत्रमानव यांच्यापेक्षा माणसात काय वेगळं आहे?
बुद्धी, मन आणि माणुसकी.
यापैकी आपल्याकडील बुद्धीचा उपयोग कसा आणि कुठं करावा हे आपल्यावर अवलंबून आहे. मनाने आणि बुद्धीने सांगितल्याप्रमाणे वागायला हवं हे आपल्याला तसं ढोबळमानानं कळतं. आता उरली ती माणुसकी. आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांसोबत कसं वागतो यावरून आपल्यातली माणुसकी दिसून येते.
आपली वागणूक ही आपला स्वभाव, आपले विचार व आपली त्यावेळची भावनिक/मानसिक स्थिती यावर अवलंबून असते. लोक जन्मत: चांगले किंवा वाईट म्हणून जन्माला येत नाहीत तर समोर उद्भवणारी परिस्थिती आणि त्याला दिला गेलेला प्रतिसाद यावरून आपली प्रवृत्ती दिसून येते. यावेळी आपली नैतिक मूल्य फार महत्त्वाची भूमिका बजावतात.
आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांसोबत इमानदारीनं वागणं आणि कधीही आपल्याकडून कुणाची फसवणूक होणार नाही या दोन मूल्यांचा सराव करण्याचा मी माझ्यापुरता प्रयत्न करते. इतरांना फसवून आपल्याला कदाचित फायदा होईलही; पण तो क्षणिकच असेल. समोरच्या व्यक्तीचा विश्वास आपण गमावून बसू. अब्राहम लिंकन लिहितात ,you can fool all the people some of the time, and some of the people all the time, but you cannot fool all the people all the time. . माणूस म्हणून ही मूल्य खूपच मूलभूत आहेत असा मला वाटतं.
मुख्य म्हणजे मी हे लक्षात ठेवते की जे नैतिक आहे ते बरोबरच आहे. मात्र जे कायदेशीर आहे ते नैतिक आहे असं नाही. हे लक्षात ठेवलं तरी बरंच काही जमू शकेल.
- मृण्मयी अग्निहोत्री
सोयीच्या वेळी तुम्ही नक्की काय नाकारता?
मूल्यशिक्षणाचा तास असतो ना शाळेत.
पण शाळेबाहेर काय येतं त्यातून? कधी कधी आपण आयुष्यात इतकं मश्गुल असतो की आपण ठरवलेलं स्वत:च मूल्य स्वत:च मातीत घालतो. उदाहरण घ्यायचं तर दोन चाकी गाडीवर कधीच तिघांनी बसायचं नाही असं ठरवलं तरी जेव्हा परिस्थिती गळ्याशी येते तेव्हा स्वत:च स्वत:च्या मूल्याची उचलबांगडी करतो. असं का होतं?
मुंबईमध्ये लोकलने जाताना बरेच भिकारी किंवा पैसे मागणारे छोटे मुलं येतात तेव्हा मला नेहमी त्यांना पैसे द्यायची सवय होती. पण जेव्हा कळलं की, माझ्या या कृत्यामुळे लहान मुलांना भिकेला लावण्याचं प्रमाण वाढवण्यास मी नकळतपणे साहाय्य करतेय. लहान मुलांना पाठवून भीक मागायला लावून स्वत: त्यावर जगणारे आईवडीलही पाहण्यात आले. मग मी बंद केलं ते. तेच व्यसनांचं. दारू, सिगरेट आणि गुटखा खाणं वाईट हे लहानपणापासून घरच्यांनी मनात कोरून ठेवलंय. व्यसन न करण्याचं, त्याचं उदात्तीकरण न करण्याचं मूल्य मी मानते, पाळते. जेव्हा रात्री ११ वाजता एखादी मुलगी मला एकटी जाताना दिसते तेव्हा ही का एकटी जातेय आणि तिने कसे कपडे घातले यावर माझं लक्ष जात नाही कारण कदाचित माणूस म्हणून बघण्याची नजर निर्भयाने मला दिलीय. ती फक्त मुलगी आहे म्हणून तिने रात्री फिरू नये असं वाटत नाही.
मूल्य म्हणजे किंमत आणि व्यवस्था म्हणजे सोय. विचारांची किंमत कळाली की त्याची योग्य ती कृतीनुरूप व्यवस्था कशी लावावी हे आपोआप कळते.
- श्वेता वानखेडे