मूल्यं-तत्त्वं यांच्यासह जगता येतं?
By admin | Published: April 19, 2017 03:06 PM2017-04-19T15:06:41+5:302017-04-19T15:41:52+5:30
उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब.. या चक्रात फिरता फिरता तरुण मनांंमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरंतर प्रयोगच - गडचिरोलीला सुरू आहे.
निर्माण आणि आॅक्सिजन
उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब.. या चक्रात फिरता फिरता तरुण मनांंमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरंतर प्रयोगच - गडचिरोलीला सुरू आहे. त्याचं नाव ‘निर्माण’. डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या प्रेरणेतून या प्रयोगात एकत्र येणारं तारुण्य एका विलक्षण अनुभवातून जातं.
गेल्या पाच वर्षांत ‘निर्माण’च्या एकूण पाच बॅचेसमध्ये ७०० हून अधिक मुलामुलींनी हा अर्थपूर्ण अनुभव घेतला. त्यातल्या काहींनी सामाजिक कामात उडी घेतली आहे. काही पुढलं शिक्षण-जॉब या मार्गाने गेले असले, तरी त्यांनी बदलत्या समाजाकडे पाहण्याची ‘वेगळी’ नजर कमावली आहे. समाजासाठी काही करावं असं वाटणाऱ्या साऱ्यांनाच जे प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची उत्तरं स्वत:पुरती शोधण्याचा प्रयत्न या निर्माणी दोस्तांनी केलेला आहे.
म्हणून त्यांनी सांगितलेली ही अवघड प्रश्नांची उकल..
त्यातला हा चौथा प्रश्न : मूल्यं-तत्त्वं यांच्यासह जगता येतं?
मी शेंगा खाल्ल्या
तर टरफलं मीच उचलेन!
थोर समाजसुधारक लोकमान्य टिळक १९ व्या शतकात म्हणाले होते, ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही’.
माझी मूल्यव्यवस्था याच विचाराला अनुसरून आहे, फक्त थोडी वेगळी...
‘मी शेंगा खाल्ल्या तर मीच टरफले उचलणार, आणखी कोणी नाही’.
थोडक्यात काय, माझ्या कृतीच्या परिणामांची जबादारी पण मलाच घ्यायची आहे.
मग ती कृती बसने प्रवास करताना खाद्यपदार्थांची वेष्टणं बाहेर फेकणं असो, किंवा समाजातील समस्यांकडे डोळसपणे दुर्लक्ष करणं असो. माझ्या घरासमोर जमा झालेला कचरा असो किंवा जाता येता दिसणारे समाजातील हतबल, दुर्बल घटकांचे चेहरे असोत. जबाबदारी म्हणून स्वत: झाडू घेऊन रस्ता साफ करायला जाणं असो, की दिवसातला काही वेळ त्या दुर्बल घटकांच्या मदतीसाठी देणं असो, मी ती जबाबदारी घ्यायला हवी. आणि यामागे आहे माझ्या आईवडिलांनी शिकवलेला सर्वांबद्दलचा समान आदर. घरी आलेल्या पोस्टमनपासून सफाई कामगारांपर्यंत सर्वांना आमच्या घरी पाहुण्यासारखा आदर मिळत असे. पुढील आयुष्यात समाजातील प्रत्येक व्यक्तीकडे, मग ती व्यक्ती कोणत्याही स्तरातली असो, आदराने पाहण्याची लागलेली सवय ही इथूनच आली. हा आदरच मग आपणही समाजाचे काही देणे लागतो हे शिकवून गेला.
मला नेहमीच मार्गदर्शन करणाऱ्या एका गुरूंच्या तोंडून ऐकलेले एक वाक्य - ‘‘जोपर्यंत तुझी ते निस्तरायची तयारी असेल, तोपर्यंत तू कोणतीही चूक करू शकतोस!’’ जबाबदारी घेण्यासाठी सांगणारं हे वाक्य. हेच माझे दिशा दाखवणारे होकायंत्र. म्हणूनच की काय, गरजूंना मदत करणं आणि समाजाला आपलं योगदान देणं हे मला फक्त कर्म नाही, तर माझ्या मूल्यव्यवस्थेचाच एक भाग आणि नैतिक बंधन वाटतं.
- विवेक पाटील,
निर्माण
जगण्याची दिशा
सापडल्यावर..
मूल्य म्हणजे कंपास किंवा चुंबकसूची !
ती जगण्याची दिशा भरकटू देत नाही.
ती आपलं वागणं, बोलणं सतत दुरुस्त करत राहतात. मूल्यांचा आधार नसेल तर निर्णय घेणं फार अवघड होतं. उदाहरणार्थ युद्ध हवं की शांती हे ठरवलेलंच नसेल तर आपण अर्जुनासारखे गळून जाणार हे निश्चित! काही शाश्वत मूल्यं स्वीकारली की मनातला गोंधळ कमी होऊ लागतो. निर्णय घेणं सोपं होतं. मुळात आपण अधिक सजग, संवेदनशील होत जातो. पण, मूल्य हे प्रकरण कळायला कठीण आहे. अंगवळणी पडणं तर अशक्य वाटावं इतकं कठीण. कुणी आदर्श समोर असेल तर या अवघड प्रकरणाची आवड लागते. एखादे मूल्य समजून घेण्यासाठी, त्याचं महत्त्व आजमावण्यासाठी, त्याची सवय करून घेण्यासाठी मी एक नियम केला. ते मूल्य आपल्या बाबतीत कुणी पाळत नसतं तेव्हा आपली इतरांकडून काय अपेक्षा असते? कुणी आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं किंवा आपल्याला असमान वागणूक दिली तर त्या परिस्थितीत त्यांनी जसं वागायला हवं होतं असं आपल्याला वाटतं, तसं जास्तीत जास्त चांगले वागण्याचा प्रयत्न करावा. मूल्य नावाचं कोडं उलगडायला लागतं !
- कल्याण टांकसाळे,
निर्माण
आपण सच्चे
वाटतो का?
आपलं कोणी तरी आदर्श असतं, आपण कोणाला तरी फॉलो करत असतो. आपण आपल्या वागण्याचा, स्वभावाचा, कृतीचा चांगला आणि वाईट विचार करतो. योग्य की अयोग्य असं निवडतो म्हणजेच आपली मूल्यव्यवस्था काय आहे याचं आपल्याला आकलन झालेलं असतं. आपली मूल्यव्यवस्था आपल्याला प्रश्न विचारायला आणि विचार करायला भाग पाडते. मूल्यव्यवस्था ही फक्त पुस्तकी कल्पना मुळीच नाही. प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या मूल्यव्यवस्थेला घेऊन जगत असतो. फक्त ती आपली मूल्यं आहेत हेच आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं. ‘मी म्हणेल जगताना मूल्यव्यवस्थेचा उपयोग होतो का यापेक्षा, जगताना मी मूल्यव्यवस्थेचा उपयोग करतो/करते का’ हे जास्त महत्त्वाचं आहे. प्रामाणिकपणा, आदर, न्याय, विश्वास, शहाणपण यांसारख्या मूल्यव्यवस्थेला घेऊन मी जगत आहे आणि जगताना या मूल्यव्यवस्थेचा मला उपयोग होत आहे. याचंच एक उदाहरण म्हणजे ग्रामीण भागात काम करत असताना वयात आलेल्या मुलींना घराबाहेर पाठवलं जात नसायचं. पण मी बरोबर आहे म्हटल्यावर घरचे बिनधास्त त्यांना ‘जा’ अशी परवानगी देत. किंवा मला म्हणत, ‘ताई, तुम्ही बरोबर आहात म्हणजे आम्हाला काळजी नाही.’ याचाच अर्थ लोकांनी आपली जबाबदारी, विश्वास, आदर ही मूल्यव्यवस्था ओळखली आहे. आपल्या मूल्यव्यवस्थेची पोचपावती आपल्याबरोबरच समाजाने पण आपल्याला दिली पाहिजे. मात्र अनेकदा आपण ज्या मूल्यव्यवस्थेला मानतो ती इतरांना मान्य असेलच असे नाही. त्यामुळे समाजातून या गोष्टीला विरोध होत असतो. अशा परिस्थितीतही आपण आपल्या मूल्यांशी प्रामाणिक असलं पाहिजे.
- साधना गुलदगड,
निर्माण
रोज निभाव लागेल तेव्हा..
९आॅगस्ट २०१६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला मिनिस्ट्री आॅफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री अहवाल म्हणतो की, ९२,६५१ कोटी रुपये एवढं नुकसान शेतमालाच्या लॉसेसमुळे होतं. यातही २०,६९८ कोटी रुपये एवढं नुकसान फक्त कडधान्याच्या लॉसेसमुळे होतं.
हे अहवाल किंवा आकडेवारी आपल्याला फार दूरचे वाटतात. पण तसं नाही. ते आपल्या संदर्भातही लागू होतंच. लग्नांमध्ये कितीतरी धान्य अक्षतांच्या रूपात फेकलं जातं. मागच्या तीन वर्षांपासून मी लग्नांमध्ये अक्षता टाकणंच बंद केलं आहे. अक्षता फेकण्यामागचं शास्त्र असं सांगतात की पक्षी, जमिनीतील किडे हेसुद्धा लग्नात पाहुणचार करू शकले पाहिजेत. आजकाल मात्र डोक्यावर छान मंडप आणि पायाखाली मस्तं गालीचे अंथरून लग्नं लावली जातात. मग कशाला अक्षता टाकायच्या?
प्रश्न असे आहेत आणि माझ्या जीवनात असे छोटे छोटे मूल्य आहेत. अक्षतांच्या रूपात तांदूळ वाया न घालवणं, नैसर्गिक संसाधन जपून वापरणं, शक्य तिथे प्लॅस्टिकचा वापर टाळणं, हवं तेवढंच ताटात अन्न घेणं जेणेकरून ते वाया जाणार नाही, खादीचे कपडे वापरणे, कामामध्ये नैतिकता जपणं, स्त्रियांचा व त्यांच्या स्वातंत्र्याचा मान ठेवणं, जाती-धर्मांमध्ये भेद न करणं, दारू-सिगारेट-गुटखा-तंबाखू या पदार्थांचं सेवन न करणं.. हे सारं आपण जगताना रोज निभावू शकू असं आहे...
- प्रतीक उंबरकर,
निर्माण
प्रश्नोत्तरांचं हे प्रकरण
फार कठीण नाहीये.
‘निर्माण’ आणि ‘आॅक्सिजन’ यांच्यातला
पूल असेल आकाश भोर.
आकाश स्वत: निर्माणच्या पाचव्या बॅचमध्ये होता
आणि सध्या तो गडचिरोलीलाच सर्चमध्ये काम करतो आहे.
तुमचे प्रश्न आकाशला थेट कळवा.
त्यासाठी ईमेल :nirman.oxygen@gmail.com यातल्या निवडक प्रश्नांच्या निमित्ताने होणारा संवाद
आॅक्सिजनच्या अंकात वाचायला मिळेल.
आणि उरलेल्या गप्पांचा आॅनलाइन कट्टा असेल
www.lokmat.com/oxygen इथे!!!