टेन्शन पळवता येतं तुम्हाला?
By admin | Published: April 10, 2015 01:29 PM2015-04-10T13:29:55+5:302015-04-10T13:29:55+5:30
मुलाखतीला आलेल्या उमेदवारांमधे हल्ली एक गुण प्रकर्षानं तपासून पाहिला जातो. स्ट्रेस, हाताळता कसा? अनेकदा तर मुद्दाम अशा सिच्युएशनमधे टाकलं जातं की ज्यानं स्ट्रेस वाढेल. त्या मन:स्थितीत तो उमेदवार कसा रिअॅक्ट करतो हे तपासून पाहिलं जातं!
Next
स्ट्रेस मॅनेजमेण्ट
मुलाखतीला आलेल्या उमेदवारांमधे हल्ली एक गुण प्रकर्षानं तपासून पाहिला जातो. स्ट्रेस, हाताळता कसा? अनेकदा तर मुद्दाम अशा सिच्युएशनमधे टाकलं जातं की ज्यानं स्ट्रेस वाढेल. त्या मन:स्थितीत तो उमेदवार कसा रिअॅक्ट करतो हे तपासून पाहिलं जातं!
आजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात तणाव कुणाला जाणवत नाही? एका वेळी शेकडो गोष्टी हाताळण्याच्या नादात आपण सर्वच थोडय़ाफार प्रमाणात तणावग्रस्त असतोच. ह्या तणावाला आपण कसे हाताळतो, किंबहुना त्यावर मात कशा प्रकारे मिळवतो या गोष्टीचा खूप मोठा वाटा आपल्या यशामध्ये असतो.
तणाव येण्याची किंवा वाढण्याची खरंतर अनेक कारणं आहेत. तुमचा स्ट्रेस कशानं वाढतो हे एकदा ताडून पहाच.
1) आपल्यापैकी काही लोक स्वभावातच टेन्शन घेणारे असतात. मग अशा लोकांना अगदी लहान सहान कारणांवरूनदेखील खूप टेन्शन येते.
2) काही वेळेला परिस्थिती अचानक बिघडल्यामुळे तणाव निर्माण होतो. अचानक होणारे बदल, संकटं, अनपेक्षित समस्या या सर्व गोष्टी तणावपूर्ण ठरू शकतात.
3) एखादी समस्या जर बराच काळ आपल्याला छळत असेल तर आपला स्ट्रेस वाढतो.
साधारण या कारणांनी तणाव येतो. मुद्दा आहे येणारा तणाव हाताळायचा कसा?
आणि स्ट्रेस हाताळणं, तो बाजूला ठेवून उत्तम काम करणं हे स्कील शिकायचं कसं?
स्ट्रेस पळवायचा कसा?
1) एखादा प्रश्न, समस्या आपल्यापुढे आली तर टाळाटाळ करून, वेळ मारून नेऊ नका. लवकरात लवकर तोडगा काढायच्या मागे लागा. जितका विलंब कराल तितका तणाव वाढत जाईल.
2) काही वेळा सहज प्रश्न सुटत नाहीत. अशा वेळी फ्रस्ट्रेट होण्याऐवजी स्वत:ची समजूत घाला. टेन्शन न घेता जोमानं प्रय} करा.
3) तटस्थ दृष्टिकोन ठेवून परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करा. प्रश्न फार मोठा न वाटता, वस्तुस्थिती समजण्यास त्यामुळे मदत होते.
4) तुमच्या सपोर्ट सिस्टीमचा लाभ घ्या. तुमच्या सभोवताली अशा काही व्यक्ती असतील ज्या कायम तुमचे मनोबल वाढवतात, तुम्हाला धीर देतात. त्यांच्याशी बोला, मन मोकळं करा.
5) तुम्हाला शक्य असतील तितकीच कामे एकावेळी हातात घ्या. अति काम करण्याचा ध्यास जितका जास्त तितका तणाव जास्त. एकही काम धड झाले नाही तर तणाव अजून वाढेल!
6) दैनंदिन जीवनात स्वत:साठी थोडा वेळ तरी ठेवा. अगदी रोज शक्य नसला तरी किमान आठवडय़ातून एकदा थोडा वेळ आपल्याला जे आवडते ते करण्यामध्ये घालवा.
7) योग, विपश्यना, मेडिटेशन करून पहा. त्यामुळे शरीर तसेच मनाचे संतुलन राखण्यास प्रचंड मदत मिळते.
8) परिस्थिती किती बिकट आहे याची भीती मनात बाळगण्याऐवजी त्यावर तोडगा कसा काढता येईल या बाजूने विचार करा.
9) प्रॉब्लेमवर फार फोकस करण्यापेक्षा त्यावरच्या सोल्युशनवर फोकस करा.
1क्) आत्मबल कमी होऊ देऊ नका. तणाव आले की सर्वप्रथम आपला आत्मविश्वास खचतो. असे होऊ देऊ नका. तुमच्या क्षमतांचा आढावा घ्या आणि आपण या समस्येला तोंड देऊ शकतो असं एकदा स्वत:ला सांगाच. नक्की जमेल!
- समिंदरा हर्डीकर-सावंत