नव्या काळातला मार्क्स म्हणून तो का गाजतोय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:44 PM2018-12-20T12:44:16+5:302018-12-20T12:44:48+5:30
कॅपिटल इन द ट्वेण्टी-फस्ट सेंचुरी हे पुस्तक जगभर गाजतंय. त्याचे लेखक थॉमस पिकेटींना भेटायला हवं !
- प्रज्ञा शिदोरे
अर्थशास्रबद्दलचं पुस्तक कधी गाजतं का? म्हणजे एकदम पॉप्युलर होतं का? तसं विरळच हे सारं. पण होतं असं. अर्थशास्नचं एक पुस्तक जगात प्रचंड गाजण्याची कदाचित ही दुसरीच वेळ असेल.
पहिल्यांदा गाजलं आणि ज्यानं जगाला श्रम, भांडवल याकडे बघण्याची वेगळी दृष्टी दिली ते पुस्तक कार्ल मार्क्सचं. मूळ जर्मन भाषेत कार्ल मार्क्सने लिहिलेलं ते पुस्तक म्हणजे ‘दास कॅपिटल’. आणि आता हे दुसरं, कॅपिटल इन द ट्वेण्टीफस्ट सेंच्युरी. कदाचित म्हणूनच द इकॉनॉमिस्टसारख्या नियतकालिकाने थॉमस पिकेटी या अर्थतज्ज्ञाला त्यानं लिहिलेल्या या ‘कॅपिटल इन द ट्वेण्टीफस्ट सेंचुरी’ या पुस्तकासाठी ‘नव्या काळातला मार्क्स’ म्हणून संबोधलं असावं.
पिकेटी यांनी हे पुस्तक प्रथम फ्रेंच भाषेत 2013 साली लिहिलं. 2014 साली त्यांचं इंग्रजी भाषांतर प्रकाशित झालं. आश्चर्य म्हणजे मूळ फ्रेंच भाषेत पुस्तकाचा खप फारसा झाला नाही. पण इंग्रजी भाषेतलं हे पुस्तक लगेचच बेस्ट सेलर ठरलं. जगभरातल्या तज्ज्ञांमध्ये, अभ्यासकांमध्ये याविषयी खूप चर्चा झाली. या पुस्तकाचा मूळ विषय ‘जगातली विषमता’ हा आहे.
पिकेटीचं हे पुस्तक त्याच्या आणि त्याच्याबरोबर असलेल्या काही तज्ज्ञांच्या 10 वर्षाच्या अभ्यासाचं फलित आहे. त्यानं या पुस्तकात जगातील विषमतेचा अभ्यास करताना, लोकांचं उत्पन्न आणि संपत्तीमधील वाढ याकडे विशेष लक्ष दिलं आहे. त्याच्याकडे 18 आणि 19व्या शतकातील आकडेवारी आहे जी असं सांगते की, औद्योगिक क्र ांतीनंतर काही मोजक्याच लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली. पण राष्ट्रीय उत्पन्न मात्न कमी होत राहिलं.
या इतिहासाला साक्ष ठेवून पिकेटी भविष्यावरही भाष्य करतो. तो म्हणतो की, जर देशांनी आत्ताच आपापल्या अर्थव्यवस्थांकडे लक्ष दिलं नाही तर जगात विषमता पराकोटीला जाईल. त्याचे सामाजिक आणि राजकीय परिणाम भयावह असतील. म्हणूनच जगात आता खासगी संपत्तीवर कर लादण्याची गरज आहे, त्याशिवाय समानता कधीच साधली जाणार नाही.
हे पुस्तक अजून मराठी भाषेमध्ये उपलब्ध नाही. पण या पुस्तकात मांडलेली विधानं भारताच्या संदर्भात कशी लागू पडतात हे बघायला हवं. ते सारं समजून घ्यायला हवं. हे पुस्तक तसं समजायला थोडं अवघड आहे. मात्र निदान कॉमर्स आणि अर्थशास्नच्या विद्याथ्र्यानी आणि समाजशास्नत रस असलेल्यांनीही ते वाचून समजून घ्यायला हवं.
वाचणं ज्यांना जड जातं, त्यांनी थॉमस पिकेटी याने याच विषयावर दिलेला ‘टेड टॉक’ ऐकण्यासारखा आहे. आपलं वर्तमान आणि भविष्य कुठल्या दिशेनं जातं आहे, हे समजून घेण्याची ही संधी आहे.