राजकारणात करिअर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 09:04 AM2018-05-17T09:04:45+5:302018-05-17T09:04:45+5:30

राजकारणात करिअर करायचं तर बेसिक क्वॉलिफिकेशन काय हवं? घराण्यात राजकारणाची परंपरा नाही तर सोबत गुंडपुंडांची फौज. भल्या-बुऱ्या मार्गांनी मिळवलेला प्रचंड पैसा. मात्र राजकारणाचा पोत बदलत असताना राजकारणातही करिअरच्या नव्या वाटा तयार होत आहे. पुण्यातील एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नन्स ही संस्था असाच एक अभ्यासक्रम शिकवते.

Career in politics | राजकारणात करिअर

राजकारणात करिअर

googlenewsNext


- अविनाश थोरात
पुण्यातील एका ज्येष्ठ कार्यकर्त्याला एका अभियानाची माहिती घेण्यासाठी नियमित फोन यायचा. दोघांचा संवाद व्हायचा. पण पाठपुराव्यामुळे कार्यकर्ता काहीसा वैतागला होता. एकदा आपल्याला सूचनावजा आदेश देणाऱ्या फोनवरील व्यक्तीची प्रत्यक्ष भेट झाली. या ज्येष्ठ कार्यकर्त्याला धक्काच बसला. अगदी २१-२२ वर्षांचा तरुण होता तो. आपली उभी हयात राजकारणात गेली, या तरुणाच्या वयाइतकं आपलं राजकारण आहे. तरीही आपल्याला हा ‘शिकवतोय’ हे पाहून कार्यकर्ता संतापला. त्यानं वरिष्ठांकडे तक्रार केली. पण त्याला सांगण्यात आलं की, नव्या पद्धतीच्या राजकारणात अनुभवाइतकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा भाग व्यवस्थापनाचा आहे. पद्धतशीरपणे स्ट्रॅटेजी आखून त्याप्रमाणे काम करायचं आहे. त्यामुळे त्याला या तरुणाचे आदेश मानावेच लागतील.
हे एक उदाहरण झालं, भाजपातल्या नव्या कार्यकर्त्यांच्या फळीचं. पण सगळ्याच पक्षांमध्ये वेगवेगळ्या पातळींवर अनेक तरुण काम करत आहेत. प्रत्यक्षात ही मंडळी समोर येत नसली तरी ‘बॅक आॅफिस’चे ते ‘बॅकबोन’ बनले आहेत.
कोण आहेत ही तरुण मंडळी. त्यामध्ये आयआयटीयन्स आहेत, मॅनेजमेंट शिक्षण घेणारे आहेत, इंजिनिअर्स आहेत, वकील आहेत आणि नुकतेच ग्रॅज्युएट झालेलेही आहेत. वेगवेगळ्या पार्श्वभूमीची ही मुुलंपण त्यांच्यामध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करण्याची माहिती. अभ्यास करण्याची तयारी आहे. फिल्डवर्क करून त्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट करता येतात. वेगवेगळ्या माध्यमांतून मिळालेल्या माहितीचे पृथक्करण करता येतं. सोशल मीडियाचा उत्तम करता येतो. ‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’ आता उघड झालं. पण त्याच्या आधीपासूनच वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांचा कौल जाणून त्याप्रमाणे स्ट्रेटेजी आखण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. भारतातीलच नव्हे तर जगातील राजकारण बदलतं आहे. निवडणुकाही मार्केटिंग कॅम्पेन होऊ लागल्या आहेत. आणि त्यासाठी आता ‘पॉलिटिकल एमबीए’ची गरज पडू लागली आहे.
इतके दिवस काय होतं, राजकारणात करिअर करायचं तर बेसिक क्वॉलिफिकेशन काय हवं?
घराण्यात राजकारणाची परंपरा नाही तर सोबत गुंडपुंडांची फौज. तेही नसेल तर भल्याबुºया मार्गांनी मिळवलेला प्रचंड पैसा. हे काहीच नसेल तर किमान जनआंदोलनांच्या माध्यमातून आलेलं नेतृत्व तरी असायला हवं. पण एखाद्या तरुणाकडे हे काहीच नसेल आणि तरी त्यानं ठरवलं की राजकारणात करिअर करायचंच तर? नव्या काळात कदाचित आता हे शक्य होणार आहे.
गेल्या काही वर्षांत राजकारणाचा पोतच बदलून गेला. निवडणूक व्यवस्थापन या विषयात प्रशांत किशोर यांच्यासारखी नावं पुढं आली. त्यामुळेच केवळ नेता बनून मंत्रीसंत्री होणं म्हणजेच राजकारणात करिअर करणं हा समज आता फिकट होऊ लागला आहे. राजकीय प्रक्रियेत अनेक नवे घटक आकार घेत आहेत आणि त्यात आता नव्या तरुणांचा सहभागही वाढू लागलेला दिसतोय. पुण्यातील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नन्स या संस्थेत आता खास राजकारणाचा अभ्यासक्रम सुरू झाला आहे.
आपल्याकडे एक पूर्वी समज होता राजकारणाचं शिक्षण काय देणार? नेतृत्वगुण उपजतच असावा लागतो, वक्तृत्वकला ही नैसर्गिक देणगी आहे. मात्र बदलत्या काळात हे स्पष्ट दिसतंय की प्रशिक्षणातूनही राजकीयदृष्ट्या सजग कार्यकर्ता आणि त्यातून नेता घडू शकतो. एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नन्स ही संस्था असाच अभ्यासक्रम शिकवते. राहुल कराड सांगतात, ‘देशाच्या निवडणूक प्रक्रियेत आमूलाग्र बदल करणारे टी. एन. शेषन राजकारणात युवकांचा सहभाग नसल्यानं व्यथित होते. कोणतीही राजकीय परंपरा नसलेल्या तरुणांनाही राजकारणात येण्याचा मार्ग मिळाला तर परिस्थितीत बदल होईल. या दृष्टीने राजकारणाचं प्रशिक्षण देणारी संस्था सुरू करण्याचा विचार होऊ लागला. पण जगात कुठंही या पद्धतीचं शिक्षण दिलं जात नाही. त्यामुळे अभ्यासक्रमापासून सगळ्या अडचणी होत्या. मात्र शेषन यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या. देशातील अनेक मान्यवरांसोबत विचारमंथन झाले. त्यातून अभ्यासक्रमाचा आराखडा तयार झाला. मात्र, हे सगळं करताना एखाद्या नेत्याच्या पीएला आवश्यक अभ्यासक्रम आम्ही तयार करत नव्हतो, तर सामाजिक दायित्व म्हणून राजकारणाकडे पाहणारी पिढी तयार व्हावी. त्यांच्यामध्ये वैचारिक प्रेरणांबरोबर उत्तम मूल्यं आणि आचार असावेत,’ हा आमचा प्रयत्न होता.
त्यानुसार हा अभ्यासक्रम आखला गेला. कौटिल्यापासून शिवाजीमहाराजांपर्यंतची प्रशासकीय व्यवस्थेची सूत्रं ते थेट बूथ मॅनेजमेंटसाठी आवश्यक असलेली कौशल्यं असं या अभ्यासक्रमाचं स्वरूप आहे. त्यामध्ये अर्थशास्त्र, आंतरराष्टÑीय संबंध, भारतीय घटना, कायदा शिकविला जातो. संभाषण कला, भाषण कला, सर्वेक्षण, निवडणूक अंदाजशास्त्र यासारख्या गोष्टींचा समावेश केलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे केवळ थेअरीवर भर न देता विविध क्षेत्रांतील मान्यवर अतिथी व्याख्याता म्हणून येत असतात. मिटसॉगच्या सुरुवातीच्या काळात ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांनी विद्यार्थ्यांना भाषणकलेवर व्याख्यानं दिली आहेत. मणीशंकर अय्यर यांनी पंचायतराज व्यवस्था समजावून सांगितली. नरेंद्र जाधव अजूनही अतिथी व्याख्याते म्हणून जोडलेले आहेत.याशिवाय देश-परदेशातील अनेक नेत्यांची व्याख्याने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जातात. पहिल्यापासूनच या सगळ्या व्याख्यानांचे डिजिटलायझेशन केलेलं असल्यानं नव्यानं आलेल्या विद्यार्थ्यांनाही ती भाषणं पाहता येतात. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी ग्रामपंचायत स्तरापासून ते लोकसभा- राज्यसभेपर्यंत भेटी घडवून आणल्या जातात.
गेल्या १३ वर्षांत राजकारण खूप बदललं. वेगवेगळ्या संकल्पना आल्या. त्याचे प्रत्यंतरही अभ्यासक्रमावर उमटलेले दिसतं. मिटसॉगच्या सहसंचालक डॉ. शैलश्री हरिदास सांगतात, पॉलिटिकल ब्रॅँडिंग, बूथ मॅनेजमेंट, पॉलिटिकल स्पिच रायटिंग याचं शिक्षण प्रत्यक्ष अनुभवातून दिलं जातं. विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी असाईनमेंट म्हणून वेगवेगळे विषय दिले जातात. त्याच्यावर तयारी करून त्यांनी चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांसमोर सादर करायचे असते. माध्यम विश्लेषण, मतदार विश्लेषण हे विषय देशातील तज्ज्ञ मंडळी येऊन शिकवितात. निवडणूक अंदाजशास्त्र विषय अगदी मुळापासून शिकविला जातो. अनेक माजी विद्यार्थी या विषयातील वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करत आहेत. मुलांसाठी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे इलेक्शन इण्टरनशिप. वेगवेगळ्या राज्यांतील निवडणुकांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी विद्यार्थ्यांना पाठवलं जातं.
हा अभ्यासक्रम राजकारणाकडे एक नवीन करिअर म्हणून पाहणाºयांसाठी एक अभ्यासू मार्ग ठरावा.


सध्या संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये राजकीय पार्श्वभूमी असलेले आणि नसलेले यांचे प्रमाण पन्नास-पन्नास टक्के आहे. सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना राजकीय प्रक्रियेशी जोडले जाण्यात मुख्य अडसर असतो तो संपर्काचा. त्यामुळेच संस्थेच्या पातळीवरून मुलांना इण्टरनशिपसाठी विविध पक्षांच्या नेत्यांशी संपर्क करून दिला जातो.
**
प्रणय भिसे हा विद्यार्थी सांगतो, गुजरात निवडणुकीचा अभ्यास करण्यासाठी आम्ही गेलो होतो. तेथे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्याशी भेट झाली. त्यांनी उत्सुकतेने चौकशी केली. त्यांना ही संकल्पनाच इतकी आवडली की, स्वत:हून मुंबईत भेटण्यासाठी बोलावलं. सध्या मी आमदार अनिल परब यांच्याकडे इण्टरनशिप करत आहे.
**

प्रा. महेश साने सांगतात, सक्रिय राजकारणात संधी आहेतच; परंतु अनेक विद्यार्थ्यांनी विविध पक्षांच्या बॅक आॅफिसमध्येही आपलं स्थान निर्माण केलं आहे. वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करून त्यावर मांडणी करण्याचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जातं. अभ्यास करून एखाद्या विषयावर बोलण्याच्या असाईनमेंट सातत्यानं घेतल्या जातात. त्यामुळे विविध पक्षांचे प्रवक्ते, नेते यांना मांडणी करण्यासाठी ‘इनपुट्स’ देण्याचं कामही आमचे विद्यार्थी करतात.
**
केवळ सक्रिय राजकारणच नव्हे तर विविध जनआंदोलने, स्वयंसेवी संस्थांमध्ये नेतृत्व करण्याच्या दृष्टीनेही विद्यार्थ्यांना तयार केले जाते. दिल्लीतील निर्भया आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावलेले विद्यार्थी नेते व्ही. लेनीन कुमार नुकतेच मिटसॉगमध्ये प्राध्यापक म्हणून दाखल झाले आहेत. लेनीन कुमार सांगतात, इंग्लंडमध्ये लेबर पार्टीच्या वतीने विविध विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाते. त्यांची अभ्यास मंडळं बनवली जातात. यातून नेतृत्व घडतं. आपल्याकडचाही विद्यार्थी सजग होतोय. विविध जनआंदोलनांशी जोडला जात आहे. त्याला व्यवस्थित प्रशिक्षण मिळालं तर राजकारण आणि समाजकारणात तो आपली भूमिका निभावू शकतो.
**
विक्रम बुनकर हा राजस्थानातील एका आमदाराचा मुलगा, तो या अभ्यासक्रमाविषयी सांगतो, माझ्या घरात राजकीय परंपरा होती. परंतु, तरीही माझ्यातील कौशल्ये विकसित करण्याची गरज वाटत होती. मिटसॉगच्या प्रशिक्षणात खूप शिकायला मिळालं. भाषणकला विकसित झाली. सध्या मी कॉँग्रेस नेते नितीन राऊत यांच्याकडे इण्टरनशिप करत आहे.
**
एका पातळीवर तरुण राजकीयदृष्ट्या सजग होतोय. पण देशातील राजकारणाला नवी दिशा देण्यासाठी संपूर्ण भारतात इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटेक्निकल लीडरशिप अ‍ॅण्ड गव्हर्नन्स (आयआयपीएलजी) सुरू कराव्यात. अशा संस्था संबंधित राज्याच्या विधानसभा, लोकसभा, राज्यसभा, भारत सरकार आणि खासगी शिक्षण संस्थांच्या एकत्रित सहभागाने चालवल्या गेल्या पाहिजे, अशी मागणी राहुल कराड करतात.

Web Title: Career in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.