गाजर, गाढव आणि इंजिनिअर
By Admin | Published: August 20, 2015 02:52 PM2015-08-20T14:52:13+5:302015-08-20T14:52:13+5:30
आवडतं म्हणून आम्ही कुठ इंजिनिअरिंग शिकतो? आमच्यापैकी कुणालाही विचारा की, इंजिनिअरिंग म्हणजे काय? आम्हाला उत्तर माहिती नाही! विचारा, का तुला इंजिनिअर व्हायचंय? उत्तर एकच, फ्युचर सिक्युअर व्हावं म्हणून! पण जी गोष्ट धड आवडही नाही, धड जमतही नाही, कळतही नाही ती शिकून आम्ही काय लायकीचे इंजिनिअर होणार?
इंजिनिअर होऊ घातलेल्या एका तरुण दोस्तानं मांडलेली ही त्याच्या मनातली घालमेल आणि काही उत्तरं टाळत चाललेले प्रश्नही!
काल- परवा मित्रंसोबत कट्टय़ावर बसलो होतो. खूप बोअर होत होतं. मित्र म्हणाले, भाऊ एखादी कविता होऊन जाऊ द्या. आभाळ दाटलेलं होतं म्हणून पावसातील प्रेमाची एक रोमँटिक कविता मित्रंना ऐकवली. त्यांना जाम आवडली. एक जण म्हणाला, ‘यू आर बॉर्न टू बिकम अ रायटर, नॉट अॅन इंजिनिअर. तू काय करतोस इकडे!’
आणि त्याच्या मताला सगळ्यांनी संमती दर्शवली. मलाही खूप भारी वाटलं. पण आयटीत फायनल इयरला शिकणा:या, वर्गात टॉपरपैकी एक असणा:या विद्याथ्र्याला कुणी असं म्हटलं तर त्याचं मन किती बावचळत असेल हे कुणाला सांगायचं?
मला आजही आठवतंय, शाळेत असताना कुणीही विचारलं की, तुला काय व्हायचंय तर मी अगदी अभिमानाने म्हणायचो, मला सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचंय. खरं तर त्या वेळेस मला सॉफ्टवेअर म्हणजे काय हेसुद्धा माहिती नव्हतं. पण एवढं माहीत होतं की, सॉफ्टवेअर हे कम्प्युटरचं काहीतरी असतं. तेव्हाच कळलं होतं की, सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणजे काहीतरी खूप मोठं असतं, तिथे खूप पैसे मिळतात अशी एक भाबडी समजूत होती.
वेळ सरत गेली, आम्ही मोठे झालो. बारावी झाली, सीईटीचा निकाल आला, प्रेफरन्स फॉर्मपण भरले. मी लहानपणी सारखं म्हणायचो ना, की मला सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचंय. ते देवानं खूपच गांभीर्याने घेतलं आणि मला आयटी मिळालं. तेही असं की, मी प्रेफरन्स म्हणून बाकीच्या ब्रॅँच दिल्या होत्या. पण मिळालं आयटीतच. कॉलेजला आल्यावर मला एकानं सांगितलं की, फस्र्ट इयरला चांगले मार्क्स घेतल्यावर ब्रॅन्च बदलून मिळते. मग वर्षभर चतुर महालिंगम पॅटर्न राबवला आणि जाम अभ्यास केला. चांगले मार्क्सही घेतले. पण ब्रॅन्च काही बदलून मिळाली नाही. मग आता आयटीतच राहावं लागणार हे कळल्यावर, प्राऊड टू बिकम अॅन आयटी इंजिनिअर या अॅटिटय़ूडमध्ये जगायला सुरुवात केली. मग काय सेकंड इयर, थर्ड इयर चांगल्या मार्कानी पास झालो. पण एक इंजिनिअर म्हणून काहीतरी नवं, काहीतरी अस्सल असं मी या वेळेत काही केलंच नाही.
हे सगळं आठवलं की, मला स्वत:चीच लाज वाटते. पुढच्या काही महिन्यांत मी इंजिनिअर होईल. पण इंजिनिअर या शब्दाचा अर्थ मी समजून घेतलाय का? त्या शब्दाला, त्याच्या अर्थाला मी जगलोय का? असे प्रश्न मनात आले की त्यांचं उत्तर अर्थातच नकारार्थी असतं. मी मला आणि माझ्या इंजिनिअर होऊ घातलेल्या दोस्तांना विचारत राहतो की, खरंच आपल्याला इंजिनिअरिंग कळलंय का?
ते आम्हाला कळलेलं नाही. कारण आमची इंजिनिअरिंगची व्याख्याच वेगळी आहे. चारही वर्षे चांगले मार्क घ्यायचे, कसेबसे प्रोजेक्ट पूर्ण करायचे, जमलं तर टीसीएससाठी डायरेक्ट इंटरव्ह्यूला पात्र व्हायचं. नाहीच झालं तर एखादा फेमस ट्रेनिंग प्रोग्रॅम करून अॅप्टिटय़ूडची तयारी करायची आणि तशीच इंटरव्ह्यूची पण! टीसीएसला लागायचं आणि मग परत तेच रिपीट टेलिकास्ट. तिथेही हेच सगळं कसंबसं. कोणीही इंजिनिअरिंगमध्ये नावीन्य शोधत नाही. काहीही बनवण्याचा प्रयत्न करत नाही. समोर गाजर बांधलेल्या सशासारखे आपण धावत राहतो. फक्त गाजर बदलत राहतं. आधी चांगले मार्क, मग चांगलं कॉलेज, मग चांगल्या पैशाचा जॉब, मग बढती अॅण्ड सो ऑन अॅण्ड ऑन..
मला कधी कधी वाटतं, आपण मेकॅनिकल घेतो कारण ती एव्हरग्रीन ब्रॅन्च आहे म्हणून. आयटी घेतो कारण आयटी नोकरी लवकर मिळते म्हणून. जर या संकल्पना उद्या बदलल्या आणि यापेक्षाही चांगल्या सुविधा देणारं क्षेत्र निर्माण झालं तर मला खात्री आहे की, आपण सारे गाजरामागेही पळू. म्हणजेच काय तर आपण इंजिनिअरिंग कधी आवड आहे म्हणून घेतलंही नाही. शिकलंही नाही. आपण इंजिनिअरिंग करतो कारण आपलं फ्युचर सिक्युअर व्हावं यासाठीच. म्हणून तर मग कुठकुठले सव्र्हे वाचून अपमानास्पद वाटतं की, 75 टक्के विद्यार्थी आज घेतलेल्या तांत्रिक शिक्षणाच्या आधारावर नोकरी मिळवण्यासाठी अपात्र आहेत.
आज लाखोंच्या संख्येने इंजिनिअर्स बाहेर पडतायेत पण त्यांच्याकडे नोकरी मिळवण्याची पात्रता नाहीये. आणि आपण इंजिनिअर झालो म्हणत ते साधं दळण आणायलादेखील जात नाहीत. त्यांना धड इंजिनिअरिंग येत नाही आणि अंगमेहनतीची कामंही जमत नाहीत.
अवतीभोवती पाहा आजकाल मुलं आठवीपासूनच इंजिनिअरिंगची तयारी करू लागली आहेत. त्यांना वेगवेगळे महागडे क्लासेस लावले जातात, त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर विशेष लक्ष दिलं जातं, पण त्याची आवड कोणीच लक्षात घेत नाही. त्याला इंजिनिअरिंग म्हणजे काय हे कोणीच समजावून सांगत नाही. मग तोही शेवटर्पयत पोपटपंचीच करत राहतो आणि गाजराच्या मागे पळत राहतो.
जेव्हा मी स्वत:ला हा प्रश्न विचारतो की मी इंजिनिअरिंग कशासाठी करतोय तेव्हा माझंही उत्तर तेच असतं की, माझं फ्युचर सिक्युअर करण्यासाठी हे शिक्षण घेतोय. पण मला लिहायला आवडतं त्याचं काय करू हे मला कुणी सांगितलं नाही. त्यातून जास्त पैसे मिळणार नाहीत ना, मग ते नको असाच एकूण आपला दृष्टिकोन!
पण गेली चार वर्षे शिकताना माझ्या हे लक्षात आलंय की, मी जे शिकलो ते मी उत्तम शिकलो. आणि माझी लेखनाची क्षमताही मी नीट वापरली, घडवली तर मला अनेक संधी मिळू शकतात.
फक्त ते करतानाही मला इंजिनिअरिंग म्हणजेही नवीन काहीतरी घडवणं हे कळायला हवं. ते समजून घेण्याचा प्रवासातच आता मी ठरवलंय की इंजिनिअरिंगच्या अर्थाला जागणारा चांगला सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचंय.
मग मला खरंच क्रिएटिव्हिटीचेही नवनवे आणि खरे संदर्भ गवसतील, अशी आशा आहे.
- स्वप्नील पुरी