कॅथरिन आणि आफ्रिका फूड प्राइज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 07:56 AM2020-12-31T07:56:12+5:302020-12-31T08:00:11+5:30

जगभरात माणसांत अनेक भेद असले तरी भूक सगळ्यांना लागते आणि पोटाच्या आगीचे प्रश्न जास्त महत्त्वाचे हेच २०२०ने पुन्हा अधोरेखित केलं !

Catherine and Africa Food Prize | कॅथरिन आणि आफ्रिका फूड प्राइज

कॅथरिन आणि आफ्रिका फूड प्राइज

Next

-कलीम अजीम

सरते वर्ष जगात सर्वांसाठी त्रासदायक ठरले. पण युगांडाच्या डॉ. कॅथरिनसाठी हे वर्ष मात्र लाभदायक व प्रचंड ऊर्जा देणारे ठरले. आफ्रिका खंडात उपासमारी व अन्न तुटवडा होऊ नये म्हणून जागतिक आरोग्य संस्था देखरेख करत असते. इथला अन्न तुटवडा कमी करण्यासाठी प्रा. कॅथरिन नकालेंबे यांनी उत्तम काम केलं. म्हणूनच त्यांना २०२०चा ‘आफ्रिका फूड प्राइज’ नावाचा बहुमान प्रदान करण्यात आला.

उपग्रह डेटाचा उपयोग कॅथरिन शेती व हवामानाच्या अभ्यासासाठी करतात. त्यांनी पीक पद्धतीवर देखरेख ठेवण्यासाठी रिमोट सेन्सिंग टूल्स तयार केले आहे. या उपकरणाच्या माध्यमातून त्यांनी डेटा बॅक तयार केली आहे. ज्यात आफ्रिका खंडातील अनेक देशांमधील शेतीचे, पिकाचे माती, धान्याचे, तणाचे फोटो, व्हिडिओ साठवले आहेत. त्यासाठी त्यांची एक मोठी यंत्रणा काम करते.

एका उपग्रहाच्या माध्यमातून शेती व शेतजमिनीवर देखरेख ठेवणारे हे इन्स्ट्रुमेंट आहे. हे साधन माती व पीक परिक्षणही करते. शिवाय भूकंप व भूस्खलनसारख्या आपत्तीची पूर्वकल्पना देते. डॉ. कॅथरिन म्हणतात, ‘जमिनीवर नजर ठेवून उपग्रहाद्वारे अशी माहिती घेतली गेली आहे जी पिके, शेतजमीन, जंगले आणि पाण्यात भेद करण्यास मदत करू शकतील. सॅटेलाइट मॉनिटरिंगद्वारे जमिनीवर लक्ष ठेवता येईल. हे यंत्र कीड किंवा रोगाच्या बाबतीत योग्य वेळी हस्तक्षेप करेल.’

कोरडवाहू शेतीसाठी क्रांतिकारी असलेले हे उपकरण पावसाचा अचूक अंदाज सांगते. पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना पेरणीची योग्य वेळ सांगते. एका अर्थाने हे उपकरण पुढचे किती दिवस पाऊस पडणार आहे की नाही याचा अचूक अंदाज सांगते. त्यातून पेरणी रोखणे शक्य होईल व बियाणे व श्रम वाया जाणार नाही.

 

हवामान, माती व शेतीची पीकवारी तपासणारे हे उपकरण आहे. नासासारख्या संस्थेने कॅथरिनच्या या कामाची व इन्स्ट्रुमेंटची दखल घेतली आहे. या उपकरणाला यंदाचा ‘आफ्रिका फूड प्राइज सन्मान’ लाभला आहे.

डॉ. कॅथरिन नकालेंबे अमेरिकेतील मेरीलॅण्ड युनिव्हर्सिटीच्या भौगोलिक विज्ञान विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्या ‘नासा हार्वेस्ट आफ्रिका प्रोग्राम’च्या डायरेक्टर आहेत.

कॅथरिन मूळच्या युगांडाच्या निवासी आहेत. आफ्रिका खंडासाठी फूड सिक्युरिटी प्रोग्रामवर ते काम करतात. आपल्या कार्याबद्दल त्या म्हणतात, ‘मला विश्वास आहे की, आम्ही संपूर्ण खंडात शाश्वत अन्न प्रणाली साध्य करण्यासाठी या प्रणालीचा मोठ्या प्रमाणात उपयोग करू शकतो.’

स्पोर्ट सायन्समध्ये रस असणाऱ्या कॅथरिन नकालेंबे अपघाताने पर्यावरण शास्राकडे आल्या. दोन जुळ्या मुलांची आई असणाऱ्या कॅथरिन एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आहेत.

युगांडाच्या रहिवासी असलेल्या कॅथरिन यांनी आपल्या मातीशी नाळ अशी कायम ठेवत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भूकेचा प्रश्न कसा सुटेल यासाठी काम केलं आहे. जगभरात मानवजातीत अनेक भेद असले तरी भूक नावाची एक समान गोष्ट माणसांना कळते, आणि त्यापायी होणारा दाह शमावा म्हणून करण्यात येणारे हे प्रयत्न २०२०ने आणलेल्या काही चांगल्या गोष्टींपैकी एक म्हणावी लागेल.

(कलीम मुक्त पत्रकार आहेत.)

kalimazim2@gmail.com

Web Title: Catherine and Africa Food Prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.