दुनियेशी पंगा घेणारे चॅम्पियन्स
By admin | Published: April 8, 2016 05:53 PM2016-04-08T17:53:06+5:302016-04-08T17:53:06+5:30
एकीकडे सा:या जगानं त्यांना मोडीत काढलं, त्यांचा अपमान केला, हेटाळणी केली, टर उडवली. दुसरीकडे त्यांच्याच माणसांनी त्यांचे हक्क नाकारले, पोटावरच पाय दिले.
Next
>सगळी दुनिया आपल्याला मोडीत काढते, आपल्याला हसते, पाण्यात पाहते, आपल्या रंगरूपावर अपमानास्पद कमेण्ट्स करते, आपली अक्कल काढते, आपल्याला ‘बिनडोक’ म्हणते; अशावेळी त्या दुनियेला केवळ आपल्या गुणवत्तेनं सणसणीत उत्तर कसं द्यावं हे ‘त्यांना’ विचारा.
***
आपला खिसा फाटका, हातात दमडी नाही, अवतीभवतीचं जग पैशाच्या चकचकाटानं झगमगतं, पण आपल्या वाटय़ाला त्यातला वाटा येत नाही. अवस्था अशी की, आजची भ्रांत; उद्याचा विचार करायलाच फुरसत नाही! त्यात आपला हक्क डावलला जातो, आपली ‘कॉण्ट्रॅक्ट्स’ रिन्यू होत नाहीत, कमालीची असुरक्षितता निर्माण होते, आपलं सारंच स्टेकला लावायची वेळ येते तेव्हा काय करायचं?
परिस्थितीसमोर लोटांगण न घालता त्या परिस्थितीलाच कसे आपले पाय धरायला भाग पाडता येतं, हे त्यांना विचारा!
***
‘ते’ कोण?
चॅम्पियन्स!!
कॅरेबियन बेटावरून आलेले रांगडे पण भावुक, लढवय्ये पण निरागस, आक्रमक पण उत्साही असे ते चॅम्पियन्स!!
जगज्जेते वेस्ट इंडियन्स!!
गेल्या रविवारची टी-ट्वेण्टी फायनल तुम्ही पाहिलीच असेल, अजून बोलत असाल त्या मॅचविषयी! शेवटच्या ओव्हरमधल्या चार सुपरसिक्सर्सविषयी आणि त्यानंतरच्या ‘उ ला ला उ ले हो’ चॅम्पियन डान्सविषयीही! ते सारं आठवलं तर अजून अंगावर रोमांच उभे राहतात, आणि काळजाचा एक ठोका चुकतोच चुकतो.
पण म्हणून इथंच ही गोष्ट संपत नाही.
कारण क्रिकेटच्या मैदानात जे उत्तुंग विजयाचं रूप दिसलं ते त्यांच्या मोठय़ा गोष्टीचा एक छोटा भाग होतं.
खरंतर ही गोष्ट त्यापूर्वी कितीतरी दिवस आधीच सुरू झाली होती. अगदी 2क्12 मध्ये सामीच्या याच संघानं टी-ट्वेण्टी वर्ल्डकप जिंकला तेव्हापासूनची आहे ही कहाणी!
एवढा वर्ल्डकप जिंकला, किती कौतुक व्हायला पाहिजे होतं या टीमचं! (आठवा, आपल्याकडे किती झालं होतं!)
पण ते झालं नाही. उलट जगभरातले पत्रकार, क्रिकेटपंडित, विश्लेषक काय म्हणाले, ‘लागला मटका यांना, नाहीतर हे काय चॅम्पियन व्हायच्या लायकीचे आहेत का?’
इकडे ही अवहेलना, तिकडे त्यांच्या क्रिकेट बोर्डालाही कप जिंकल्याचं काही कौतुक नव्हतं. आणि आम पब्लिकलाही! कारण एकेकाळी क्रिकेटवेडं असलेलं तिथलं तारुण्य आता पुरतं फुटबॉलवेडं झालेलं आहे. (त्यात पैसा-प्रसिद्धी जास्त आहे, हे उघड कारण आहेच!) त्यामुळे पब्लिकनं काही या खेळाडूंना डोक्यावर घेतलं नाही. त्यांच्या क्रिकेट बोर्डाची हालतही अत्यंत खस्ता. (खरंतर अख्खी कॅरेबियन अर्थव्यवस्थाच सध्या मोडकळीस आलेली आहे.) बोर्डाकडेच पैसा नाही म्हणत बोर्डानं काहींचे कॉण्ट्रॅक्ट रद्द केले, काहींच्या मानधनात कपात केली. ज्यानं वर्ल्डकप जिंकून दिला ते सामी आणि महान खेळाडू म्हणून ज्याचं नाव जग आदरानं घेतं त्या शिवनारायण चंद्रपॉलला वन डे संघातूनही डच्चू मिळाला!
इंग्लंडमधले काऊण्टी क्लब, ऑस्ट्रेलियातले खासगी क्लब, भारतात आयपीएल यासारख्या मिळेल त्या संघात इंडिज खेळाडूंनी मग खेळणं पसंत केलं. मिळाला तो पैसा घेतला. गेल, सिम्पसन, ब्राव्हो, सॅम्युअल्स आपल्याला कळले ते आयपीएलमधूनच! पण हा पैसा या खेळाडूंना मिळतोय म्हणून ते गब्बर झाले आहेत आणि आपल्याला जुमानत नाहीत असं विंडीज बोर्डाला वाटलं. त्यातून वाद आणखी पेटला.
सारं प्रकरण इतकं विकोपाला गेलं की, इंडिज क्रिकेट आपली पत गमावून बसलं. आणि या वल्र्डकपची गोष्ट तर सगळ्यांना माहिती आहेच आता. बोर्ड वर्ल्डकपसाठी संघ पाठवायलाच तयार नव्हता. त्यातही ज्यांना पाठवणार अशी तयारी दाखवली त्यांचं मानधन घटवलं. हे खेळाडू अक्षरश: स्वत:च आपला संघ बांधून कसेबसे भारतात पोहचले.
आणि त्यांचा कॅप्टन सामी म्हणाला तसं ना त्यांच्याकडे इंडिज जर्सी होत्या, ना पैसे, ना देशभर प्रवासाचे पैसे. या वर्ल्डकपनंतर पुन्हा कधी आपण इंडिजच्या वतीनं क्रिकेट खेळू का हेसुद्धा या खेळाडूंना माहिती नव्हतं. त्यात मार्क निकोलससारखा ज्येष्ठ कॉमेण्टेटर उघड उघड या संघाला ‘शॉर्ट ऑफ ब्रेन’ म्हणजे खरंतर बिनडोक म्हणत होता. आपल्या कॉलममधून त्यांची टर उडवत होता. तिकडे शेन वॉर्न गेली काही वर्षे सॅम्युअल्सच्या मागे लागून त्याची टर उडवत होता. आणि एकूण जगभरच या संघाला कुणी गिनतीत घेत नव्हतं. अगदी रंगद्वेषी टिप्पण्यांनाही सामोरं जावं लागलं. (आपल्याकडेही अनेकांनी त्यांच्या काळ्या रंगावर फालतू जोक्स व्हायरल केलेच होते.)
टोकाची उपेक्षा, टोकाचे अपमान, पैशाची चणचण, असुरक्षित वर्तमान आणि भविष्यकाळ असे सारे नकार आपल्या किटमध्येच भरून आणले होते या टीमनं
.आणि तरीही ते जीव तोडून खेळले. आणि जिंकले. सा:या जगाच्या नाकावर टिच्चून! अपमान करणा:यांचे दातच नाही, तर सगळा जबडाच त्यांनी त्यांच्या घशात घातला.
जिद्द, गुणवत्ता, धैर्य आणि आपल्यातली आग यांच्या जोरावर आज ते चॅम्पियन्स आहेत!
आणि काळाच्या कसोटीवर त्यांनी एक गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध केली आहे की, कुणी तोंडावर अपमान केले असले, खिशात दमडी नसली, अख्ख्या जगानं मोडीत काढलं असलं, तरी गुणवत्ता आणि पराक्रमच कायम जगज्जेता ठरतो. असतो!!
चॅम्पियन्सच्या शाळेतले लाइफ लेसन्स
1) फाइट. व्हॉटेव्हर इट इज !!
किती ती भयाण परिस्थिती! सगळीच भ्रांत आणि पुढय़ात उभा जालीम जमाना. सतत अपमान करायला टपलेला. अशावेळी खरंतर मोडून पडणं, डिप्रेस होणं, आपण कुचकामीच आहोत म्हणत हार पत्करत गप्प राहणं स्वाभाविक असतं. पण या टीमनं हेच सारं आपल्या मनातल्या आगीत इंधन म्हणून भरलं आणि जी लढाई लढली, ती आपल्या मनासारखा विजय मिळवूनच थांबली. आपण जिंकत नाही, तोवर लढा थांबत नाही हेच हे चॅम्पियन सांगतात.
2) पुन्हा पुन्हा. जस्ट प्रुव्ह इट अगेन!
खरंतर एकदा चॅम्पियन झाल्यावर पुन्हा जगानं का त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करावेत? पण ते जगानं केलेच. मग आपली गुणवत्ता त्यांनी पुन्हा सिद्ध केली आणि अशी सिद्ध केली की दुनियेनं आपली बोटंच नाही, तर कोपरापासून हात तोंडात घातले नी सलाम ठोकला.
3) टीम है तो सबकुछ है!
वेस्ट इंडिज हा सलग भूभाग नाही, तो काही बेटांचा समूह आहे. आणि या बेटांवरचे वेगवेगळ्या भागातले हे खेळाडू. अनेकजण तर पूर्वी एका संघात खेळलेही नव्हते. पण टीम म्हणून एकत्र आले आणि मग ते 15 उरले नाही तर ते 15 एक होत सा:या दुनियेला पुरून उरले. त्यामुळेच तर एकटा गेल खेळला नाही तरी टीम खेळली. आणि जी टीम पक्की असते ती जिंकतेच, बॅटलफिल्ड कुठलंही असो हेच त्यांनी पुन्हा सांगितलं.
4) नाणं वाजलं ना, आता खैर नाही
आपण आपलं नाणं वाजवून दाखवलं ना, सिद्ध केली ना गुणवत्ता, मग आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना चार खडे बोल सुनवत ज्याला त्याला ज्याची त्याची जागा त्यांनी दाखवून दिली. तीही जगासमोर. त्याच जगासमोर ज्यानं यांचा अपमान होताना शांतपणो पाहिला होता. त्यामुळेच तर अत्युच्च आनंदाच्या क्षणीही त्यांनी ज्याचं त्याचं माप पदरात घातलंच. किती काळ चांगल्या माणसांनी संयम दाखवायचा हेच त्यांची कृती जगाला विचारते आहे.
5) पैसा हवाच, कशासाठी ते आम्ही ठरवू!
आपल्या हक्काचा पैसा मागणं, आपल्या कष्टांची योग्य किंमत मागणं, त्यासाठी लढणं, वरिष्ठांशी पंगा घेणं, त्यासाठी आपली नोकरी पणाला लावणं हे सोपं नसतंच. पण त्यांनी हे सारं केलं. मात्र वल्र्डकप जिंकून जो पैसा मिळाला त्यातला एक मोठा भाग सरळ मिशनरी कामाला मदत म्हणून दान करून टाकला.
- चिन्मय लेले
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)