...आमचंही एक स्वप्न आहे, भविष्यात इसरोत काम करायचं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 07:00 AM2019-07-25T07:00:00+5:302019-07-25T07:00:02+5:30
चांद्रयान अवकाशात झेपावलं तसं सार्यांच्या डोळ्यात अभिमानाचं पाणी तरळलं. ते पाणी उमेदीचं, स्वप्नांचं आणि भारतीय असल्याच्या एका आगळ्याच भावनेचं होतं!
- निनाद देशमुख
श्रीहरिकोटा हे नाव, माझ्याही स्वप्नातलं एक गाव होतं. जसं आपल्या देशात अनेकांच्या असतं. भारतानं म्हणजेच इसरोनं अवकाश विज्ञानात घेतलेली भरारी, उपग्रहांचा प्रक्षेपण हे सारं याची देही याची डोळा पाहण्याचं स्वप्न मीही अनेक वर्षे माझ्या नजरेत घेऊन जगलो.
अवकाश विज्ञानाचं, इसरोच्या विविध कामगिरींचं आकर्षण होतंच; पण प्रत्यक्ष प्रक्षेपण कधी पाहिलं नव्हतं. यावेळी जेव्हा चांद्रयान 2 च्या प्रक्षेपणाची चर्चा सुरू झाली तेव्हाच मी ठरवलं होतं की या प्रक्षेपणाच्या वेळी आपण तिथं जायचं. पत्रकार म्हणून ते चांद्रभरारी कव्हर करणं हे स्वप्न मला खुणावत होतं. नुकताच मी डीफेन्स स्टडीचा कोर्स करून आलो होतो. त्यामुळे थोडी ओळखपाळख काढली. आणि मला थेट प्रक्षेपण कव्हर करायला जायची संधी मिळाली.
मनात अनेक प्रश्न होते, कुतूहल होतं. त्या जगाची आणि आपली प्रत्यक्ष ओळख होणार म्हणून खुश होतो. अभ्यास केला. काही माहिती, अवकाश विज्ञान आणि प्रक्षेपण यांच्या परिभाषा हे सारं समजून घेतलं. काही जुजबी वाचन केलं आणि निघालो. मात्र या सार्या माहितीपलीकडचा तो थरार, ती खर्या अर्थानं पृथ्वीची कक्षा भेदून जाणारी भरारी मला अनुभवायची होती.
मात्र पहिल्यावेळी प्रक्षेपण रहित झालं. अगदी आपण त्या केंद्रात आहोत आणि प्रक्षेपण होणार नाही असं वाटल्यावर थोडं निराश वाटलं; पण तिथला माहौलच असा होता की आपण परत येऊ अशी खातरीच वाटत होती. झालंही तसंच.
लवकरच पुन्हा तारीख जाहीर झाली आणि आम्ही पुन्हा प्रक्षेपणस्थळी पोहोचलो.
काय नव्हतं तिथं.
अवकाश भरारीचं वेड पंखातच असावं लागतं वगैरे व्हॉट्सअॅप टीपिकल फॉरवर्ड आपण वाचत असतो. पण ते वेड, तो थरार, कामावरची अमिट श्रद्धा, परफेक्शन हे सारं माझ्या डोळ्यासमोर होतं.
संपूर्ण देशाची मनं उंचावणारा हा सोहळा पाहण्यातही विशेष गॅलरीची व्यवस्था करण्यात आली होती. शास्त्रज्ञांचं मनोबल वाढविण्यासाठी हातात झेंडे घेऊन शाळा-शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते. त्यांच्या नजरेत तेच कुतूहल होतं, जे तिथं जमलेल्या प्रत्येकाच्या नजरेत होतं. भरपूर लोक होते.
एवढंच कशाला आमच्यासोबत मीडिया गॅलरीत अनेक माध्यमांचे वाहनचालक होते. गॅलरीत जेवणखाण देणारे वेर्ट्स होते. जो तो त्या एका क्षणाची वाट पाहत होता.
अखेर प्रक्षेपणपूर्व अखेरच्या टप्प्यातील उलटी गिनती सुरू झाली.
पाच -चार -तीन -दोन -एक
आणि झिरो.
एक मोठा आवाज झाला आणि जीएसएलव्ही मार्क3 प्रक्षेपक चांद्रयानाला घेऊन अवकाशात झेपावले. उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला. ‘भारतमाता की जय, भारतीय शास्त्रज्ञांचा विजय असो’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमला. तिरंगा हातात घेत चंद्रोत्सव साजरा होऊ लागला.
हा सोहळा विशेष प्रेक्षक गॅलरीतून पाहणारे विद्यार्थी जयघोष करत होते. जवळपास संपूर्ण भारतातून विद्यार्थी अन् नागरिकांनी यासाठी ऑनलाइन नावनोंदणी केली होती. गेल्या सोमवारीही मोठय़ा उत्साहात नागरिक तसेच विद्यार्थी या ठिकाणी आले होते. आणि आज पुन्हा आले. ते डोळ्यात असीम विश्वास घेऊनच. सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्राच्या प्रवेशद्वारावर भारतीय शास्त्रज्ञांनी अहोरात्र मेहनत करून बनविलेल्या प्रक्षेपकाच्या प्रतिकृती सर्वाचे स्वागत करत होत्या. या प्रक्षेपकांपुढे विद्यार्थी अन् पालक सेल्फी काढून घेत होते. प्रक्षेपण होताच सर्वानी टाळ्या वाजत जल्लोष केला. खरं तर गेल्यावेळी नंतर अनेकांनी पुन्हा ऑनलाइन नावनोंदणी केली. पुन्हा प्रक्षेपण केंद्र गाठलं.
चेन्नई येथील वुमन ािश्चन कॉलेजमधून आलेल्या एल्वीन डिसूजा आणि निंदिनी मुरुगन तिथं भेटल्या. एल्वीन म्हणाली, ‘फार अभिमान वाटतो आहे, आज या ठिकाणी खर्या अर्थानं आपण भारतीय म्हणून एकत्र आलो आहोत. आम्ही फिजिक्सच्या विद्यार्थिनी. आता आमचंही एक स्वप्न आहे की, भविष्यात इसरोत काम करायचं. असं काम करायचं, ज्याला देशाला अभिमान वाटेल.’
अभिमान!
हाच एक शब्द. त्या वातावरणात आम्ही सारे भारतीयच होतो. चांद्रयान ढगाआड गेलं तेव्हा तिथं जमलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं.
ते पाणी खूण होती आपल्या भारतीय असण्याची.
आणि या चांद्रयानानं पुन्हा डोळ्यात पेरलेल्या स्वप्नांसह नव्या उमेदीची!
(निनाद लोकमतच्या पुणे आवृत्तीत वरिष्ठ उपसंपादक आहे.)