पोट तरी कशावर भरणार तुम्ही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 03:18 PM2019-10-10T15:18:45+5:302019-10-10T15:19:20+5:30

लाखोंनी इंजिनिअर कॉलेजांच्या फॅक्टरीतून टिकल्या छापल्यासारखे बाहेर पडत असताना शिक्षणाला काय किंमत उरणार आहे?

changing world this battle for survival | पोट तरी कशावर भरणार तुम्ही?

पोट तरी कशावर भरणार तुम्ही?

Next
ठळक मुद्देजग उलटेपालटे झाले तरी शाश्वत राहणारी एकच वस्तू आपल्या हातात आहे. ती ओळखा आणि राखा!

- मिलिंद थत्ते

नैसर्गिक साधनसंपत्ती हा सर्वाच्याच जगण्याचा आधार आहे. निसर्गातल्या वेगवेगळ्या वस्तूंवर आधारित पोटापाण्याचे उद्योग लोक करत असतात. पण तो आधार काढूनच घेतला तर? म्हणजे मासेच संपले किंवा मासे पकडण्यावर बंदीच घातली तर मच्छीमारांनी जगायचे कसे? किंवा जमीन नापीक झाली वा त्यावर नांगर धरायची परवानगीच काढून घेतली तर शेतकर्‍यांनी जगायचे कसे?
निसर्गाच्या वापराचे कोणते हक्क कोणाकडे आणि कशासाठी आहेत यावर ती माणसं टिकणार का आणि निसर्ग टिकणार का हे अवलंबून असते. 
समजा एखाद्या जंगलातून इमारती लाकूड काढण्याचे हक्क एखाद्या कंपनीला 10 वर्षांसाठी दिले तर काय होईल? त्या कंपनीला त्याच 10 वर्षात जास्तीत जास्त नफा कमवायचा आहे. ती कंपनी अधिकाधिक लाकूड तोडेल, त्या लाकडाच्या आड येणार्‍या इतर झाडाझुडपांना ‘अडथळा’ मानून नष्ट करेल, 10 वर्षात आणखी लाकूड देतील अशा झाडांची लागवड ‘अडथळा’ साफ केलेल्या जागेवर करेल. अडथळा म्हणून नष्ट केलेल्या झुडपांत काही औषधी वनस्पती असतील. त्या वनौषधींपासून औषध बनवणारा एखादा स्थानिक वैद्य/वैदू असेल. कंपनीने तो ‘अडथळा’ नष्ट केल्यावर या वैदूच्या पोटापाण्याचे काय होईल?
जेव्हा जेव्हा नवे तंत्रज्ञान येते, नवे उद्योग येतात, तेव्हा संसाधनांवरचे अधिकार इकडून तिकडे हेलकावे खातात. जेव्हा जेव्हा माणूस निसर्गावर घाला घालतो, तेव्हा तेव्हा तो काही माणसांवरही घाव घालत असतो. अशा स्थितीत ‘बळी तो कान पिळी’ हा कायदा चालतो. 
मरेनात का दुबळे लोक - असा याचा अर्थ होतो. तसं होणं योग्य नसेल तर आपण भारतीय समाज म्हणून काही काळजी घेणं भाग आहे. आपल्या संविधानात यालाच ‘समान संधीचा अधिकार’ म्हटलं आहे. 
काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलतं - तेव्हा मागे राहणार्‍यांना किमान उभं तरी राहता यावं याची काळजी आपण भारतीय म्हणून करतो का?
शेकडो वर्षापूर्वी आपल्यापैकी काही लोक शेतीकडे वळले. त्यांना एका जमिनीला धरून राहण्याचं महत्त्व कळलं. नदीकाठच्या सुपीक गाळाच्या जमिनी त्यांनी ताब्यात घेतल्या. आजही आपण असं पाहतो की, तेव्हा जे शेतीकडे वळले नाहीत, शिकार करत राहिले किंवा फळे-कंद गोळा करून पोट भरत राहिले - त्यांना आताही मागास म्हटलं जातं. त्यांच्या हातात सत्ता नाही. वरकस, छोटय़ा तुकडय़ातल्या जमिनी आहेत. किंवा भूमिहीन आहेत. 
शेकडो वर्षापूर्वी शेतीचं युग सुरू झाले, तेव्हा मागे राहिलेले आपले भाऊबंद आताही मागे आहेत. 
पुढचे युग यंत्रोद्योगांचे आले. जे यंत्रविद्या व कौशल्य शिकले, त्यांनी यंत्रयुगात विकास साधून घेतला. काही महापुरुषांनी तेव्हाच ‘शहरांकडे चला’ हा मंत्र दिला. पुढचे युग शहरांच्या स्फोटाचे आहे. अतिलोकसंख्येकडे कोलमडणार्‍या शहरांचे आहे.
शहरांचे विकेंद्रीकरण हा पुढचा मंत्र सुरू झाला आहे. यंत्र चालवण्यासाठी माणसांची गरज उरलेली नाही. अनेक अवघड कामे करणारे यंत्रमानव तयार होत आहेत. ते संप करत नाहीत, पगारवाढ मागत नाहीत, जातीय गुंडगिरी करत नाहीत. अशा काळात पुन्हा युग बदलत असताना माणसांना नेमके काय काम उरणार आहे? रसायनयुक्त अन्नाने जग त्रासत चालले आहे. नवीन आजार येताहेत, आणि वैद्यक माफियांची चांदी होत आहे. पुन्हा शाश्वत जीवनशैलीकडे, रसायनमुक्त अन्नाकडे जाण्यासाठी पैशाने  पुढारलेले लोक मागे वळू लागले आहेत. शुद्ध अन्न महाग होण्याचा पुढचा काळ आहे.
आपण गावातले सामान्य तरुण या उलथापालथीत कशाला धरून राहू शकतो? 
लाखोंनी इंजिनिअर वगैरे कालेजांच्या फॅक्टरीतून टिकल्या छापल्यासारखे बाहेर पडत असताना शिक्षणाला काय किंमत उरणार आहे? 
जग उलटेपालटे झाले तरी शाश्वत राहणारी एकच वस्तू आपल्या हातात आहे. ती ओळखा आणि राखा!

Web Title: changing world this battle for survival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.