चार्जिंगला लावलेल्या फोनच्या शॉकनं जीवाला धोका
By admin | Published: April 4, 2017 03:23 PM2017-04-04T15:23:17+5:302017-04-04T15:23:17+5:30
फोन चार्जिंगला लावून झोपायची सवय आहे तुम्हाला? असेल तर ती झोप तुमच्यासाठी काळझोप ठरू शकते.
नाशिक, प्रतिनिधी,
फोन चार्जिंगला लावून झोपायची सवय आहे तुम्हाला? असेल तर ती झोप तुमच्यासाठी काळझोप ठरू शकते.
मोबाईल फोनची बॅटरी एक टक्का उरेपर्यंत अनेकजण फोनवर बोलतात, मग फोन एकीकडे चार्जिंगला लावून बोलतात आणि रात्री झोपताना तर फोन उशाशीच घेवून झोपतात. हे कमीच म्हणून जवळपास जर प्लग असेल तर अगदी उशाजवळ फोन ठेवून तो चार्जिंगला लावला जातो. फोन तापतो, चटके बसतात, तरीही बोलणं, व्हॉट्सअॅपवरच्या गप्पा संपत नाहीत..
हे सारं जीवावर बेतू शकतं.
वॉशिंग्टन पोस्टने या अमेरिकेतील दैनिकानं कालच प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार अशीच घातक सवय एका ३२ वर्षाच्या तरुणाच्या जीवावर बेतली. दैव बलवत्तर म्हणून तो बचावला. विल डे नावाचा हा तरुण अलाबामा राज्यात हंण्टसविल या शहरात राहतो. रात्री आपला आयफोन चार्जिंगला लावून तो झोपला. फोन उशाशीच होता. सकाळ होता होता कूस बदलली तशी त्याच्या गळ्यातली चेन त्या चार्जरवर पडली. आणि त्याच्या गळ्याला असा भयानक शॉक बसला की त्याचा पूर्ण गळा भाजला गेला, छातीही भाजली गेली. वेळेत दवाखान्यात पोहचल्यानं तो वाचला.
तो सांगतो, मी कधी कल्पनाही केली नव्हती की गळ्यातली चेन, चार्जर या रोजच्या वापरातल्या वस्तूच अशा ब्लास्ट होतील आणि बॉम्ब फुटल्यासारख्या माझ्या अंगावरच फुटतील.
साधारण १०० व्होल्ट्स इलेक्ट्रिसिटीचा शॉकही माणसासाठी जीवघेणा असू शकतो. त्यामुळे यापुढे फोन चार्जिंगला लावून बोलताना, उशाशी ठेवून झोपताना आपल्या जीवाला धोका आहे एवढं लक्षात असू द्या..
प्रश्न आपल्या जीवाचा आहे..आणि इतरांच्याही!