आवडतं म्हणून काहीही खावं का? आणि किती दिवस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 02:58 PM2018-08-30T14:58:46+5:302018-08-30T14:59:49+5:30

आजची तरुण मुलं काय खातात? घराबाहेर पडून गल्लीबोळातील फेरीवाल्यांपासून टपर्‍या, हॉटेल्स, कॅण्टिन्स इथली गर्दी पाहिली की याचे उत्तर मिळते. शनिवार-रविवार तर लोकांच्या चुली पेटतात की नाही अशी शंका येते. मग पोळी-भाजी ते कशी खातील?.

check what are you eating? is it junk? | आवडतं म्हणून काहीही खावं का? आणि किती दिवस!

आवडतं म्हणून काहीही खावं का? आणि किती दिवस!

googlenewsNext
ठळक मुद्दे निदान खाण्यापूर्वी त्याची माहिती घेतो का आपण? नेटसॅव्ही आहोत ना आपण! एका क्लिकवर मिनिटात सगळी माहिती मिळेल. पण बघितले का आपण कधी?

- वैद्य रजनी गोखले

निपुण. वय वर्षे 22. मित्रांबरोबर पिकनिकला गेलेला, अचानक मळमळ, जळजळ वाटू लागली; अ‍ॅसिडिटी झाली का, असे सगळे बोलत असतानाच त्याला घाम फुटला, छातीत कळ आली.. सिव्हिअर हार्ट अटॅक.. तिथेच विषय संपला!
अमेय. वय वर्षे 21-22; नियमित जिमला जाणारा.. अचानक अंगावर सूज येऊ लागली.. खूप तपासण्या केल्या.. निदान- किडनी फेल्युअर! नंतर केवळ 2-3 महिन्यांचे आयुष्य!
माझे मावसा. वय वर्षे 99. परवाच त्यांच्याशी बोलले; छान गप्पा मारल्या. उत्तम प्रकृती, स्वतर्‍ची सगळी कामे स्वतर्‍ करतात. उत्तम स्मरणशक्ती!
माझे मामा, वय वर्षे 92. अजूनही एकटे ट्रेनने फिरतात. प्रत्येक कुंभमेळ्यात आवजरून स्नानास जातात!
मावस सासूबाई. वय वर्षे 94. जुन्या लग्नपत्रिकांची कात्रण- गणपती कापून नवीन छान ग्रिटिंग्स बनवतात. भेटायला येणार्‍या सगळ्यांना  भेट म्हणून देतात!!
काय सांगतात ही उदाहरणे? आपल्या आजूबाजूला पाहिलं तर अशा अनेक व्यक्ती दिसतील; पण कधी याचा सिरिअसली विचार करतो का आपण? या दोन पिढींच्या आरोग्यात एवढी तफावत का आढळते? काय नेमके बदलले आहे हे शोधतो का आपण?
जरा घराबाहेर पडून गल्लीबोळातील फेरीवाल्यांपासून टपर्‍या, हॉटेल्स, कॅण्टिन्स इथली गर्दी पाहिली की याचे उत्तर मिळेल. शनिवार-रविवार तर लोकांच्या चुली पेटतात की नाही अशी शंका येते. या गर्दीत तरुणांची संख्या खूप आढळते. कॉलेजच्या आसपास तर खाऊगल्लीचे जाळेच पसरलेले असते; पण मग बाहेर ही तरुणाई पोळीभाजी खाते का? 
- नाही. त्यांना आवडतं ते बर्गर, डोनट्स, फ्रेंच फ्राईज.. कोक.. मिल्कशेक इत्यादी.
आता हे स्वातंत्र्य म्हणून बिघडलं कुठं? पोट भरतं ना त्यांचं! शिवाय आवडीनं खातात ते आणि महत्त्वाचं म्हणजे कुठंही आणि केव्हाही सहज मिळतं ते!
आवडतं म्हणून काहीही खावं का? आणि किती दिवस! निदान खाण्यापूर्वी त्याची माहिती घेतो का आपण? नेटसॅव्ही आहोत ना आपण! एका क्लिकवर मिनिटात त्याची सगळी माहिती मिळेल. पण बघितले का आपण कधी?
‘जंक फूड’वरील सगळ्या आणि यासम इतर सर्व पदार्थाचा समावेश या गटात केला जातो. 
पण जंक फूड म्हणजे काय? 
विकिपीडिया सांगतो की. न्यूट्रिशनल व्हॅल्यू अतिशय कमी असलेलं तयार किंवा पॅकेज्ड फूड म्हणजे जंक फूड. 
खूप आधीचं शिजवून ठेवलेले किंवा पॅकेज्ड फूड; ज्याचे पोषणमूल्य फारच कमी आहे, ज्यात खूप मोठय़ा प्रमणावर कॅलरीज मिळतात त्याही फॅट किंवा साखरेमार्फत; ज्यात प्रोटिन्स किंवा फायबर फारच कमी आहे, असे फूड म्हणजे जंक फूड. याला एमटी कॅलरी फूड असेही म्हणतात.
हे पदार्थ आकर्षक दिसावेत, त्यांना चांगला वास, चव यावी ते सॉफ्ट राहावे, टिकून राहावे यासाठी कलर्स, फ्लेवर्स अनेक प्रिझव्र्हेटिव्ह, केमिकल्स घातली जातात जी आरोग्यासाठी हानिकारक असतात.
आपण काय खातोय यासोबतच आपली प्रकृती, आपली पचनशक्ती, आपले वय, आपली नेमकी गरज काय? आहाराचे नेमके नियम काय, केव्हा खावे, किती वेळा खावे, किती खावे, हेही तितकेच किंबहुना अधिक महत्त्वाचं आहे.
आपल्या शरीराच्या जडणघडणीत आहाराचा सहभाग खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. कोणताही पदार्थ पोटात गेल्यावर तो शरीरानुरूप करण्यासाठी त्यावर प्रक्रिया केल्या जातात. या अतिशय गुंतागुंतीच्या केमिकल प्रक्रिया असतात. चुकीचा आहार किंवा चुकीच्या पद्धतीने म्हणजे एकावेळी खूप खाणे, सतत खाणे, अवेळी खाणे यामुळे या प्रक्रियांवर खूप ताण पडतो. इतर चांगल्या कामासाठी आवश्यक असणारी ऊर्जा, रसायने या पचनासाठी खर्ची पडते आणि सतत असे घडल्याने ही सिस्टम कोलमडते व अनेक आजारांची निर्मिती होते.
म्हणून खाण्यापूर्वीच हा पदार्थ आपल्याला उपयुक्त आहे की त्रासदायक आहे, याचा विचार करावा. जंक फूड्स हे त्रासदायक गटात मोडणारे आहेत. कारण त्यात पोषकांश काहीच नाहीत; परंतु त्यांना पचविण्यात खूप ऊर्जा जाते. नेहमी ताजे अन्न खावे. एक रात्र उलटून गेलेले अन्न शिळे अन्न समजले जाते. जे अनेक टॉक्सिन्स तयार करते. पॅकेज फूड कितीतरी दिवस आधी तयार करून ठेवलेले असते! आकर्षक दिसण्यासाठी यात टाकले जाणारे पदार्थ कॅन्सरसारख्या आजारांना निमंत्रण देतात.
ज्या वयात भरपूर पोषणमूल्ये असलेला म्हणजे सकस, ताज्या, सात्त्विक आहाराची गरज असते त्या वयातील पिढी निकस, शिळा, तामस आहार घेऊन स्वतर्‍ला धन्य समजते आहे.
अमेरिकेत हा प्रश्न खूप आधीपासून भेडसावतो आहे. यावर अनेक रिसर्चही केले गेले आहेत व त्याचे निष्कर्ष धक्कादायक आहेत.
स्थूलता, डायबेटिस, ब्लडप्रेशर, हृदयरोग, कॅन्सर यांसह लाइफ स्टाइलजन्य आराजांचे मूळ जंक फूडमध्ये आहे. मुलांवर केलेल्या रिसर्चमध्ये असे लक्षात आले आहे की 33 टक्के मुले हायपर अ‍ॅक्टिव्ह आहेत व त्यांच्या खाण्यात जंक फूड अधिक प्रमाणात आढळले. या मुलांमध्ये मेंदूच्या तरंगातही बदल झालेले दिसले. व्यसनाधीन व्यक्तींच्या प्रमाणे या मुलांची वर्तणूक दिसते. बॅड इटिंग हॅबिट म्हणजे स्मोकिंग करण्यासारखे आहे, असे ते म्हणतात.

बघा, काय खातोय आपण!


जंक फूड या गटात येणार्‍या पदार्थाची यादी बघितली तर ती फार मोठी आहे.
पॉपकॉर्न, बर्गर, फ्राईड चिकन, मिल्कशेक,  कॅँडी, हॉटडॉग, सॉसेजेस, सॉफ्ट ड्रिंक्स, चॉकलेटबार, पिझ्झा, चिप्स, पास्ता, फ्रेंच फ्राईज, नूडल्स, डोनट्स, बेकरी प्रॉडक्ट्स..
या सगळ्यांमध्ये फॅट्स, साखर, मीठ यांचे प्रमाण खूपच जास्त आहे.
मॅगीच्या एका पॅकमधून 3 ग्रॅम मीठ जाते आणि आपली पर डे मीठाची मात्रा आहे 6 ग्रॅम! बटाटा चिप्सद्वारे 60 टक्के कॅलरी केवळ फॅट्सपासून मिळतात. फ्रेंच फ्राईज म्हणजे तर ट्रान्स फॅट्चं आगरच आहे.
आजकाल कॉम्बो ऑफर्स असतात.
पॉपकॉर्न न् सोडा, काय देतात ते - 1610 कॅलरीज आणि 60 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट्स! बर्गर देते 37 टक्के कॅलरीज, तर आईस्क्रीमच्या एका कपात 15 ग्रॅम फॅट्स व खूपशी साखर!
खाण्यापूर्वी कधी घेतली आपण याची माहिती? नवीन पिक्चर आला की आधी गूगलवर त्याचे रिव्ह्यू बघतो आपण, मग या नवीन फूडचीही माहिती घ्यावी. गूगलवर सविस्तर माहिती आहे. मग ठरवावं खायचं की नाही ते.

शिरा, पोहे, उपमा आणि थालिपीठ!


कॉलेज परिसरात जंकफूड बंदीचा विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतलेला निर्णय खूप महत्त्वाचा आहे. तरुणांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे मोठे पाऊल आहे; पण यासह अजून काही पावले उचलावीत असे वाटते. कॉलेजेसमधून आहाराबद्दल प्रबोधनपर व्याख्याने द्यायला हवीत. मुलांना जर माहितीच नाही की चांगले काय वाईट काय, तर ते तरी काय करणार? त्यांच्या पालकांसाठी विशेषतर्‍ मातांसाठीही प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करावे. कारण यासाठी त्याही तितक्याच जबाबदार आहेत. आरोग्यदायी आहाराचा आळस/अनास्था व अज्ञान मुलांना बाहेर खाण्यास प्रवृत्त करते.
कॉलेज कॅम्पसबरोबरच कॉलेजेसच्या आसपासही नेमके काय विकले जाते याचे सव्रेक्षण व नियंत्रण व्हावे.
पोषक आहार विक्रीचे पर्याय उपलब्ध करावे व त्यासाठी चालना द्यावी. शिरा, पोहे, उपमा, थालिपीठ यांसह अनेक भारतीय पदार्थ काळाच्या ओघात मागे पडत चालले आहेत, त्यांचे पुनरूज्जीवन होऊन संपूर्ण जगाच्या आहारात त्यांनी स्थान मिळवावे ही आशा!

(लेखिका आयुर्वेदिक तज्ञ आहेत.)

Web Title: check what are you eating? is it junk?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.