नऊ गोळ्या अंगावर झेलणारा ‘चिता’ पुन्हा अतिरेक्यांवर झेपावणार!
By admin | Published: April 6, 2017 07:20 PM2017-04-06T19:20:55+5:302017-04-06T19:20:55+5:30
धाडधाड.. धाडधाड.. धाडधाड.. छाताडावर गोळ्यांचा वर्षाव केला तरी तो पुन्हा उठून उभा राहतो आणि व्हिलनचा खातमा करतो.
जिद्दी जवानाच्या संघर्षाची चित्तथरारक कहाणी.. धाडधाड.. धाडधाड.. धाडधाड.. छाताडावर गोळ्यांचा वर्षाव केला तरी तो पुन्हा उठून उभा राहतो आणि व्हिलनचा खातमा करतो.. असलं दृष्य फक्त चित्रपटातच शोभू शकतं. पण चित्रपटांतील दृष्यांनाही लाजवेल असा चमत्कार एका भारतीय जवानाच्या बाबतीत नुकताच घडला आहे. काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना त्याला तब्बल नऊ गोळ्या लागल्या, तरीही तो जिवंत राहिला. नुसता जिवंतच नाही राहिला, तर तो आता बरा होतोय आणि पुन्हा आपल्या लष्करी सेवेत रुजू व्हायची जिद्द तो बाळगून आहे. चित्त्याची छाती आणि चित्त्याचा जोष असलेल्या या जवानाचं नावही ‘चिता’ असंच आहे. चेतना चिता!.. मूळचा राजस्थानचा असलेला हा जवान सेंट्रल रिजर्व फोर्सचा (सीआरपीएफ) ४५व्या बटालियनचा कमांडिंग आॅफिसर आहे. काश्मीर परिसरातील हिज्जन भागात अतिरेक्यांशी लढताना तब्बल नऊ गोळ्या त्याच्या शरीरात घुसल्या होत्या. या परिसरात काही परदेशी अतिरेकी आल्याची खबर गुप्तहेर खात्याकडून आल्यानंतर आर्मी, सीआरपीएफ आणि काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत या अतिरेक्यांचा सामना सुरू झाला. १४ फेब्रुवारी २०१७ची ही गोष्ट. आघाडीवर राहून लढणाऱ्या चितावर अतिरेक्यांनी गोळ्यांचा भडिमार केला. लहुलुहान झालेल्या चिता यांच्या मेंदूत, ऊजव्या डोळ्यात, पोटात, दोन्ही हातांत, पंजात, इतकंच काय, त्यांच्या पार्श्व भागावरही गोळ्या लागल्या. शरीरातही अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झालं होतं. अत्यवस्थ परिस्थितीत चिता यांना श्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे काही तातडीचे आॅपरेशन्स आणि प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना विमानानं दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आलं. त्यावेळी चिता कोमात गेलेले होते. ते वाचण्याची कोणतीच शक्यता वरकरणी तरी दिसत नव्हती. पण चिता यांची जिद्द आणि एम्सच्या डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली आणि चिता केवळ कोमातूनच बाहेर आले नाहीत, तर लवकरच तंदुरुस्त होऊन अतिरेक्यांशी पुन्हा आमनेसामने दोन हात करण्याची जिद्द बाळगून आहेत. एम्सच्या डॉक्टरांचंही म्हणणं आहे, की हा एक अभूतपूर्व असा चमत्कारच आहे. चिता यांना एम्समध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी २४ तासाच्या आत चिता यांच्या कवटीवर पहिली शस्त्रक्रिया केली. डोक्यात घुसलेल्या गोळीनं कवटीचा जो भाग नष्ट केला होता, तो भाग त्यांनी अगोदर काढून टाकला. त्यानंतर त्यांच्यावर अनेकदा शस्त्रक्रिया करण्यात आल्या. चिता यांच्या शरीरावर असलेल्या असंख्य जखमांमुळे त्या चिघळल्या होत्या. त्यावरही डॉक्टरांनी इलाज केले. प्लास्टिक सर्जरीज झाल्या. उजव्या डोळ्याला लागलेल्या गोळीमुळे त्यांची त्या डोळ्याची दृष्टी तर परत येण्याची शक्यता कमी आहे, पण डाव्या डोळ्यानं तरी त्यांना पाहाता यावं यासाठी डॉक्टर प्रयत्नशील आहेत. जवळपास दिड महिना चिता हॉस्पिटलमध्ये होते. त्यातील पंधरा दिवस ते कोमात होते आणि एक महिना आयसीयूमध्ये. नुकताच त्यांना एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी त्यांची पत्नीही हजर होती. त्यावेळचं त्यांचं वक्तव्यही एका जवानाच्या पत्नीला साजेसचं होतं. त्यांचं म्हणणं होतं, चित तर बरे होतीलच, पण ज्यावेळी ते पुन्हा आपल्या अंगावर वर्दी चढवतील आणि अतिरेक्यांचा खातमा करण्यासाठी आपलं कर्तव्य निभावण्यासाठी जातील त्याचवेळी आमचं आयुष्य खऱ्या अर्थानं नॉर्मल होईल..