सिनेमें जलन, क्यों है?

By admin | Published: May 4, 2017 07:16 AM2017-05-04T07:16:16+5:302017-05-04T07:16:16+5:30

मित्रमैत्रिणींचं लाइफ कसलं भारी. एकसे एक अपडेट टाकतात, भन्नाट फिरतात, मस्त खातातपितात, पार्ट्या करतात, एकदम आनंदी असतात. आणि आपण? आपलं लाइफ तसं नाही. आपलं नशीबच फुटकं, असं नेमकं का आणि कधीपासून वाटू लागतं आपल्याला? इतरांना फॉलो करत त्यांच्यावर पीएचडी होईल इतकी त्यांची माहिती जमवण्यापेक्षा जरा स्वत:ला फॉलो केलं तर?

Cinematic irritation, why? | सिनेमें जलन, क्यों है?

सिनेमें जलन, क्यों है?

Next

 मित्रांचे, मैत्रिणींचे सतत अपलोड होणारे फोटो पाहून टेन्शन येतं, अशी प्रतिक्रि या हल्ली कितीतरी जणांकडून मिळते. मित्रमैत्रिणींना चांगले जोडीदार मिळाले, त्यांचे फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप अपडेट आले की ते फोटो पाहून अनेकांना आनंद नाही होत, उलट आपल्याला अजून कोणी नाही असं वाटून ते आपला मूड घालवून बसणार. म्हणजे चारचौघात आनंद दाखवणार, तो व्यक्त करणार, त्यांच्यासाठी आम्ही खूशच आहोत असं चार लोकांत म्हणणार. पण मनातल्या मनात मात्र आपल्याला असं कधी जगता येईल म्हणत कुढत बसणार! त्याला चांगला जॉब लागला, आपल्याला नाही. तिला आपल्याहून चांगले मार्क्स मिळाले, आपल्याला नाही. कोणी दिसायला चांगलं, आपण नाही ही तुलना तर नेहमीचीच. त्यात कुणी फेसबुकवर ‘एंगेज्ड’ असं प्रोफाइल अपडेट केलं की आपल्यालाही असं आपलं फेसबुक अपडेट कधी एकदा टाकायची संधी मिळेल, असं वाटू लागते. आणि मग वाटतं, आपल्या आयुष्यात काहीच पुढे सरकत नाही, नुसती स्लो ट्रेन चाललीये. इतरांचं आयुष्य एकदम सुपर फास्ट धावताना दिसतं आहे. पण आपली आधीच स्लो ट्रेन. त्यात नशीब फुटकं, आणि बाकीचे पन्नास प्रॉब्लेम्स. त्या प्रॉब्लेम्सवर चटचट सुटतील अशी उत्तरे हवी असतात. ती काही केल्या सापडत नाहीत. आणि इकडे दुसऱ्यांचे फेसबुक अपडेट तोवर एंगेज्डचं मॅरीड असं झालेलं असतं. कोणी नवीन गाड्या घेतात, फोटो फेसबुकवर अपडेट टाकतात. कोणी भारीतल्या हॉटेलात जातात आणि काय खाल्लं, काय नाही ते फोटोंसकट टाकतात. वाटतं, आपण काय कायम इतरांना टाळ्याच वाजवणार का? त्यांचं आयुष्य कसं हॅपनिंग, आपल्या आयुष्यात काय तेच ते रटाळ दिवस? आपल्या आयुष्यात असं कधी घडणार? का नाही सरकत आपली खटारा गाडी पुढे? या सगळ्या प्रश्नांचा रेटा लागून गाडी आणखी पुढे सरकली की आपण अजून त्या व्हर्च्युअल अपडेट्समध्ये गुरफटत जातो. अपडेट्सचा धबधबा आपल्यावर कोसळतो. कोण कुठून कुठे गेले, कोणाला भेटले, काय खाल्लेप्याले, कोण कुणास काय म्हणाले असं सारं आपल्याला कळतं मग. त्यावरून पुन्हा वाटतं की, त्यांना इतकी सुखे मिळतात तरी कशी, बरं इतके पैसे आहेत त्यांच्याकडे, कोणाला ते जवळ करतात, आपल्याशी कसे वागतात, आपल्याला जवळ करतील का? येतंच ना मनात? मग परत आपल्यातली सद्सद्विवेकबुद्धी आपल्याला सांगते, तुलना नको करायला. त्यांचं आयुष्य वेगळं, आपलं वेगळं. इतरांचा आपण हेवा तर करत नाही ना म्हणून एक वेगळा गिल्ट आपल्या हळव्या मनात वाढू शकतो. त्या गिल्टचं टेन्शन वेगळं. आपल्याला असं वाटलंच का? कसं? मग नेहमीचा सोपा मार्ग. ‘आपलं नशीबच फुटकं, त्याला कोण काय करणार’? हे पालुपद सांगायचं स्वत:ला.. पण इतरांचं काय व्हायचं ते होवो, ते काही का करेना पण आपलं असं का होतंय? का आपण दुसऱ्यांवर असे चरफडतोय, आपलं नेमकं काय गडगडलं आहे, हे नको का पाहायला? एकतर आपण वरवरचे अपडेट्स पाहून जणू दुसऱ्यावर पीएचडी होईल इतकं त्यांना फॉलो करतो. ते बघून बघून स्वत:ला कोसतो. परत असे विचार नको करायला, असेही स्वत:ला समजावतो. पण आजूबाजूच्या परिस्थितीत विशेष सुधारणा होत नाही, म्हणून परत आधीच्या ट्रॅकवर घसरतो.इतरांचे अपडेट्स पाहून, आनंद पाहून आपल्याला वेदना होतात इतके अडकलेलो असतो. तरी बरं, कुणी तरी सांगतं, लोक खोटी प्रतिमा तयार करतात. मग आपण अजूनच खरंखोटं करायला जातो. तेही दुसऱ्याच्या आयुष्याचं. भलताच अभ्यास चालू. आपल्या कॅनव्हासवर आपलं चित्र काढायचं की इतरांचं चित्र बघत बघत आपल्या कॅनव्हासवर गिचमीड करून ठेवायची? पुन्हा, त्यांचं चित्र किती छान, माझं वाईट असं बोलत बसायचं? त्यात पुन्हा सगळ्याच काही खोट्या प्रतिमा नसतात. कुणी मेहनत घेऊन, ध्येय ठरवून आयुष्यात पुढे जात असेल. आपण फक्त त्याचं एण्ड प्रॉडक्ट बघत आहोत, तेही दुरून. लोक कष्ट करत असतात तेव्हा आपण काय करत असतो, कुठे असतो, विचारणार का स्वत:ला? डोंगर आपोआप थोडीच चढला जातो? आपण फक्त शिखरावर चढून टाकलेले फोटो पाहायचे आणि लोकांवर शिक्के मारायचे. आपण आपला डोंगर चढायला कधी घेणार? तुलना, हेवा या गोष्टी मनात येणं स्वाभाविक आहे. पण त्यांना समजून घेऊन आपल्या आयुष्यातलं बरंवाईट शोधून आपला कॅनव्हास सुंदर रंगवणं आपल्याच हाती असतं.

फारच जळकुकडे आहोत आपण असं वाटलं तर काय करणार?

कुणाचे चांगले अपडेट्स पाहिल्यावर आपल्या मनात जी भावना येते, ती स्कॅन करूया. काय असतं नेमकं त्यात ते शोधूया. काय मुद्दा असतो समोरच्यात जो आपल्याला आपलं आयुष्य कमनशिबी वाटायला लावतो? आपल्याला जे त्याच्याकडे आहे तेच मिळवायचं आहे का? कसं करणार आहोत ते आपण? अशा कोणत्या क्षमता समोरच्या व्यक्तीत आहेत, पण आपल्यात आहेत किंवा नाहीत? आपण आपल्या क्षमतांवर काम करतो का? कसं करतो? अशी कोणती कारणे आहेत, ज्यामुळे आपण जिथं आहोत तिथंच आहोत? ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण याला त्याला, परिस्थितीला दोष देण्यापलीकडे काही केलंय का? केलं तर कसं केलं? त्याचे रिझल्ट्स काय? आपल्या प्रयत्नांतून आपली स्लो ट्रेन जागची हलली तरी का? किती वेगाने? की उलटी परत धक्क्याला आली? गाडीत काही बिघाड तर नाही ना? - हे प्रश्न स्वत:ला विचारून त्यावर काम सुरू केलं की इतरांचं विश्व मोठे दिसण्यापेक्षा आपण आपल्यासाठी हातपाय मारायला सुरुवात करतो. आपला न्यूनगंड नेमका कशामुळे आहे आणि तो का आहे हे नीट शोधणं हीसुद्धा एक अचिव्हमेंट असते. त्यावर काम करणं ही नंतरची गोष्ट झाली. मुळात अमुक गोष्टीचा आपल्याला गंड आहे हे निदान दुसऱ्याच्या प्रतिमेच्या निमित्ताने कळलं ही एक छान गोष्ट म्हणून बघितली पाहिजे. कुठलीही गोष्ट आपल्याकडे नाही म्हणून तिचा विचार होतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर खरंखुरं आलेलं असतं. त्याला आपणच समजून घ्यायचं असतं. ही प्रक्रि या आपल्यात घडवायला कुणाचे स्टेटस अपडेट कारणीभूत ठरत असेल, तर उत्तम संधीच चालून आली समजायची.. स्वत:मध्ये डोकवायची, प्रगतीची. करून तर बघा! आपल्याही स्टेटस अपडेटमुळे असेच मनात चाचपडणारे अनेक लोक असू शकतात, हेही आपल्या लक्षात येईल. आपल्याला जे वाटतं ते काही जगावेगळं नाही, हे समजणं हेच किती मोठं यश आहे.

- प्राची पाठक-
 ( मनमोकळं जगण्याचा ध्यास असलेली प्राची मानसशास्त्रात सुवर्णपदक विजेती आहेच, शिवाय सूक्ष्मजीवशास्त्राची तज्ज्ञ आणि पर्यावरणाची अभ्यासक आहे.)

Web Title: Cinematic irritation, why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.