कॉलर, कलर, स्कार्फ
By Admin | Published: December 11, 2015 02:01 PM2015-12-11T14:01:22+5:302015-12-11T14:01:22+5:30
गुलाबी थंडीत कॉलेजात जायचं आणि फॅशनेबलही दिसायचं म्हणून धडपडणारा हा थंडीतला नवा उबदार ट्रेण्ड.
>‘विण्टर अॅक्सेसरीज’ नावाच्या एका नव्याच रंगबिरंगी
जगाची फॅशनेबल हौस.
हिवाळा सुरू तर झाला पण अजून म्हणावी तशी थंडी पडत नाहीये!
बाकीच्यांचं ठीक, पण ज्यांना रोज पहाटे उठून भरभर आवरून कॉलेजचं पहिलं लेक्चर भल्यासकाळी गाठायचं असतं त्यांना हिवाळ्यातली गुलाबी थंडी सकाळी जाणवतेच!
त्यात हा सगळा ‘कट्टेकरी’ वर्ग. त्यांना फॅशन, दिसणंबिसणंही सांभाळावं लागतं. मग अनेकजण कॉलेज संपलं की, हिवाळी कपडय़ांची खरेदी करायला ग्रुपनेच जातात.
त्यांच्यासाठी म्हणजे खरंतर हिवाळ्यावर प्रेम करत, त्या हिवाळ्यात मस्त फॅशनेबल दिसावं, जरा मकडून घ्यावं सकाळच्या उन्हात असं ज्यांना वाटतं, त्यांच्यासाठी या काही वेगळ्या हिवाळी वस्तू!
आजच्या भाषेत सांगायचं तर ‘विण्टर अॅक्सेसरीज!’
फार पैसे खर्च करायचे नसतील, जुनं स्वेटरच यंदा वापरायचं असेल तरी हरकत नाही. फक्त सिझनल फॅशन कशी नवा ट्रेण्ड निर्माण करतेय, हे या नव्या अॅक्सेसरीजमधून नक्की कळेल!
1) फर कॉलर
खरंतर फर कॉलरची फॅशन ऐंशीच्या दशकातली. आता ती फिरून आली आहे. अनेकांना (विशेषत: तरुण मुलांना) स्वेटर घालायला आवडत नाही. त्यांच्यासाठीही हा एक पर्याय. फरची कॉलर फक्त वापरायची. ती दिसते चांगली आणि थोडी उब मिळते, ती वेगळीच!
2) मॅजिक स्कार्फ
या स्कार्फला जबरदस्त लोकप्रियता लाभली आहे. या स्कार्फचा वापर चक्क टोपी, टॉप, ड्रेस आणि श्रग म्हणूनही करता येतो! स्कार्फ एक, कमाल अनेक!
3) वूलन स्टोल
खास हिवाळ्यासाठी लोकरीचा स्टोल दाखल झाला आहे. लोकरीची फुलं विणून ती जोडून तयार केलेला फ्लॉवर स्टोल दिसायलाही हटके दिसतो.
4) स्टोल विथ कॅप-1
हा लोकरीचाच स्टोल. विणलेल्या स्कार्फवर मध्यभागी टोपी जोडण्यात आली आहे. म्हणजे टोपी घातली की लगेच स्टोल खांद्यावर घ्यायचा.
5) स्टोल विथ कॅप-2
या प्रकारात पिरॅमिड आकाराची टोपी अन् स्वतंत्र स्टोल असतो.
6) शॉर्ट सॉॅक्स
शॉर्ट आणि प्रिंटेड सॉक्सही ‘इन’ आहेत. ज्या मुली चप्पल घालतात त्यांच्यासाठी हे शॉर्ट सॉक्स फार कामाचे.
7) हाय सॉक्स
हा तसा फॅशनेबल प्रकार म्हणायला हवा. विशेषत: स्कर्ट्स, लॉँग स्कर्ट्स, मीडीज वापरणा:या मुलींसाठी हा एक ट्रेण्डी पर्याय. हे सॉक्स थेट गुडघ्यार्पयत असतात. विविध रंगात मिळतात. कॅप, हाय सॉक्स, स्टोल आणि नी लेंथपेक्षा थोडा मोठा स्कर्ट आणि शर्ट ही यंदाच्या हिवाळ्यातली सगळ्यात लेटेस्ट फॅशन आहे.
8) ग्लोव्हज
खरंतर ग्लोव्हज घालावेत इतकी थंडी अजून पडलेली नाही. पण जे टू व्हीलर चालवतात त्यांच्यासाठी थंडीत ग्लोव्हज फार महत्त्वाचे आहेत. मुलींसाठीच नाहीत तर मुलांसाठीही अनेक रंगात आणि उत्तम दर्जाचे ग्लोव्हज सध्या मिळताहेत.
9) मोठय़ा कलरफुल माळा आणि क्लिप्स
सध्या तशीही मोठ्ठाल्या रंगबिरंगी माळांची फॅशन आहे. हिवाळ्यात तर मोठ्ठाले रंगबिरंगी स्टोन्स, वूडन, क्विलिंग ज्वेलरी वापरण्याची आणि वॉर्म कलर मिरवण्याची एक संधीच असते. त्यामुळे गळ्यात माळा, केसात रंगीत क्लिप्स बिंधास्त वापरा. विण्टर फॅशन है!
1क्) लेदर जॅकेट आणि सनग्लासेस
या दोन गोष्टी तर कायमच फॅशनेबल असतात. मग हिवाळ्यात त्यांचं काय कौतुक? आणि मुख्य म्हणजे सनग्लासेस अर्थात गॉगल्स कशाला घालायला हवेत हिवाळ्यात? पण हल्ली घालतात. कारण फॅशन आहे. सिम्पल.
- सारिका पूरकर-गुजराथी