कमिटमेण्ट फोबिया
By admin | Published: March 10, 2017 12:59 PM2017-03-10T12:59:56+5:302017-03-10T12:59:56+5:30
प्यारव्यारच्या वाटेलाच नाही जात काहीजण आणि काहीजण प्यारव्यार करतात, मारे इश्क होतं त्यांना; पण महिना-दोन महिन्यात ब्रेकअप करून मोकळे. काहीजण तर अथांग प्रेमात बुडालेले असतात, वर्षानुवर्षे चालतं त्यांचं अफेअर घरच्यांनाही वाटतं की हे लग्नच करतील एकमेकांशी; पण ते लग्नाचं नाव काढत नाही. लग्न म्हटलं की विषय टाळतात. का? असे ‘बेफिक्रे’ का झालेत हे तमाम शुद्ध देसी रोमान्स करणारे तरुण आणि तरुणीही?
Next
>- अनादी पाठक
आपल्या नात्याला आॅफिशियल नात्याचा दर्जा देण्याची भीती का वाटते अनेकांना?
‘अरे राजा वेडा झालास का? कशाला लग्नाच्या भानगडीत पडतोस? अजूनही वेळ गेलेली नाहीये, विचार कर, एकदा बांधून घेतलंस की सुटका नाही.’ लग्नाळू मुलांना किंवा गर्लफ्रेण्डला प्रपोज करून औंदा बार उडवायचाच या इच्छेने पछाडलेल्या बॉयफ्रेण्ड्सला मिळणारा हा आगंतुक सल्ला. हा सल्ला सध्याच्या लग्नसराईमध्येही घुमतोय. आणि तसं पाहिलं तर या सल्ल्याला कोणी सिरिअसली घेतही नाही. स्वत: शादी का लड्डू खाल्लेला मित्र किंवा मोठा भाऊ किंवा धाकटा काका असले कोणी या सल्ल्याचा मुळाशी असतात.
‘मला तर नाही चान्स, तू तरी तुझं सिंगल लाईफ उपभोगून घे.’ असलं काही बाही सांगत असतात बायकोची नजर चुकवून. पण हाच सल्ला आपल्यापेक्षा चार वर्षांनी लहान असलेला भाऊ किंवा मित्राने दिला तर? ज्याचं लग्नाचं सोडा; पण गर्लफ्रेण्ड असण्याचा तरी वय आहे का, असा प्रश्न पडू शकेल त्याला सिंगल असण्याचं आणि आयुष्यभर कोणालाही बांधील ना राहण्याचं एवढं आॅबसेशन? कसं शक्य आहे.
पण ते हल्ली आहे. कारण आजकाल तरुणाच्या, इस्पेशली, मिलेनिअल्सच्या मनात असलेली कमिटमेण्टची भीती. ही भीती इतकी तगडी आहे की तिला चक्क कमिटमेण्ट फोबिया असं नाव देण्यात आलेलं आहे.
फोबिया म्हणजे कोणत्याही गोष्टीची अति आणि अनाठायी भीती. हाच फोबिया स्वत:ला कुठल्या नात्यात बांधून घेण्याविषयी वाटू लागला की बनतो कमिटमेण्ट फोबिया. आणि हा कुठलाही वेडगळपणा नसून चक्क एक मानसिक स्थिती आहे जिच्यापायी माणूस स्वत:ला दुसऱ्यासोबत कमिट करूच शकत नाही. आठवा आपल्या आसपास असणारे मित्र ज्यांनी स्वत:च्या हातानी चांगल्या गर्लफ्रेण्ड्स घालवल्या आहेत. एका दिवसापर्यंत सगळं आलबेल असतं आणि अशाच एखाद्या दिवशी आपण आपल्या मित्राच्या तिला ‘वहिनी’ म्हणून हाक मारून बसतो. (का मारू नये छान आहे की ती, ह्या म्हशाला दुसरं कोण उभं करणार? आपल्यालाही ती वहिनी म्हणून पटलेली असते, आणि आपण तशी हाक मारली की चक्क लाजते, और क्या चाहिये?) आणि तिसऱ्या दिवशी कळतं की त्यांचं ब्रेकअप झालं. आपली भावी वहिनी आपल्याला फोन करून रडरड रडते, कोणालाच कळत नाही व्हॉट वेण्ट रॉँग; पण आपला मित्र तसाच अलिप्त. काही दिवस जातात आणि त्याच तिकिटावर तोच खेळ सुरू होतो. कधी कधी तर त्या मित्राच्या जागी आपणच असतो, सगळं सुरळीत सुरू असतं, जवळचे विचारायलाही लागतात की मग आता कधी लग्न करणार? पण आपल्याला करायचंच नसतं, हिच्याशी नाही, तिच्याशी नाही, कुणाशीच नाही. हाच तो कमिटमेन्ट फोबिया.
या अवाढव्य शहरांनी आणि त्यात सतत वाहत राहणाऱ्या पैशांनी काय केलं असेल तर आख्खीच्या आख्खी तरु ण पिढी ओढून शहरात नेली. सुरु वातीचे काही दिवस होमसिक झाल्यानंतर हेच तरुण-तरुणी घर विसरतात, नाती विसरतात आणि स्वत:चं एक वेगळं विश्व तयार करतात. अतीव प्रायव्हसी हे या विश्वाचं लक्षण. यांच्याकडे पाहिलं की लक्षात येत की, एकटेपणाचा उगा किती बागुलबुवा करून ठेवलाय आपण. खरं म्हणजे हे तरु ण-तरु णी एकटेपणा एन्जॉय करत असतात. काम असतं, सहकारी असतात, मित्र-मैत्रिणी असतात, हव्या त्या गरजा पूर्ण करायला पैसा असतो त्यामुळे यापुढे जाऊन कोणाला नवरा बायको किंवा लिव्ह इन पार्टनरची गरजच भासत नाही. कोण फुकटचे झमेले मागे लावून घेणार? तू जमिनीवर कपडेच का टाकलेस आणि आज उशिराच का उठलीस? म्हणून अशा लोकांना जेव्हा रिलेशनशिप मध्ये पुढची स्टेप गाठायची वेळ येते तेव्हा ते सरळ पळून जातात किंवा नातं संपवून टाकतात.
असं म्हणतात की, सिनेमा समाजमनाचा आरसा असतो. खरंच असावं ते, कारण कालपर्यंत एक दुसरे के लिये मरने-मारने के लिये तय्यार असणारे हिरो हिरॉईन आता ‘आय लव्ह यू बट आय काण्ट मॅरी यू’ची भाषा बोलायला लागले आहेत. सगळं करतात एकमेकांसोबत; पण एक लग्न करत नाहीत. आठवा शुद्ध देसी रोमान्स, कॉकटेल, ये जवानी है दिवानी किंवा अगदी अलीकडचा बेफिक्रे . अर्थात हिंदी सिनेमे असल्यामुळे तिथे दि एण्ड गोग्गोडच होतो. प्रत्यक्षात मात्र असं काही होत नाही.
अभ्यासकांच्या मते लहान वयात आपल्याला काय हवं हे माहीत नसल्यामुळे नाती तुटणं आणि काय हवं हे पक्क माहीत असल्याने नातीच संपवणं यात फार फरक आहे. पहिल्या प्रकारात कॉलेजमधली प्रेमप्रकरण, झिंगाट स्टाइलनं पळून जाणं हे सगळं येत. पण आयुष्याच्या एका टप्प्यावर पोहचून ही मंडळी आपल्याला एका बंधनात बांधून घेतात. मनापासून असो व मनाविरु द्ध. दुसऱ्या प्रकारात मात्र तिशीच्या आसपासची किंवा ओलांडलेली हाय अचिविंग मंडळी असतात, ज्यांना त्यांच्या आयुष्यात कुठलंच बंधन नको असतं.
थोडं नजर उचलून बघितलं तर आसपास अशी बरीच मंडळी दिसतील. एका नात्यातून निघून दुसऱ्या नात्यात जाणारी, कधी समोरच्याची फसवणूक करणारी तर कधी स्पष्ट आपला स्वभाव मांडणारी. फोबिया ही मानवी वृत्ती आहे आणि तो असणाऱ्या माणसाची त्यावर मात करण्याची इच्छाशक्ती हा त्यावरचा एकमेव उपाय. कोणी मारून मुटकून कोणाला एखाद्या नात्याच्या बंधनात नाही अडकवू शकत. निदान आजतरी नाही. त्याची परिणीती कशात होते हे सांगायला फॅमिली कोटर््स ओसंडून वाहून चाललीयेत. हा कुठला प्रश्न नाही, रोग नाही, मानसिक आजार नाही. हा फक्त सड-सुटवंग राहू इच्छिणाऱ्यांचा चॉईस आहे. फक्त तो पर्याय निवडताना दुसऱ्या कोणाचा हकनाक बळी जाऊ नये एवढी काळजी घ्यायलाच हवी.
३५% फोबिक
पाश्चात्त्य जगात या मानसिक स्थितीला लोक सिरिअसली घ्यायला लागले आहेत. त्यासाठी खास सपोर्ट ग्रुप असतात, काउन्सेलिंग सेशन असतात. त्या तुलनेत आपल्याकडे काहीच नाही. मुळात हे असलं काही असतं हेच आपल्याकडे कित्येकांना माहीत नसेल. पोरगा पोरगी वयात आले की उजवून टाकायचे अशा विचारसरणीत राहतो आपण. कोण लक्ष देतोय असल्या फोबिया बीबियाकडे. हे शहरात राहणाऱ्यांचे चोचले असू शकतात. पण हेच चोचले आपल्या समाजाची रिअॅलिटी होऊ पाहत आहेत. आजमितीला मेट्रो सिटीज्मध्ये राहणाऱ्या आणि डेटिंग करणाऱ्या पॉप्युलेशन पैकी सुमारे ३५ टक्के यंगस्टर्स कमिटमेण्ट फोबिक आहेत. या प्रत्येकाला आपल्या डेटिंगला नाव देण्यात, पुढे नेण्यात भीती वाटते. हे कमिटमेण्ट फोबिक आपल्या पार्टनर्स सोबत फिरतात, खातात अगदी झोपतातही. पण तेवढच. तो क्षणिकआनंद संपला की आपल्या घरी आपल्या कोशात परततात.
..ते ब्रेकअप आणि हे ब्रेकअप
बऱ्याचदा असं होतं, मुलगा-मुलगी एकमेकांना भेटतात, प्रेमात पडतात, लग्न करायचं ठरवतात. पण अचानक लक्षात येतं की आपण एकमेकांना कम्पॅटिबल नाही, मग ती दोघे आपापले वेगळे रस्ते शोधतात. मग या ब्रेकअपच कारणही कमिटमेण्ट फोबियाच असतो का? नाही. ब्रेकअप का झालं त्याच्या कारणावरून ठरतं रिलेशनशिप मधल्या कोणाला हा फोबिया आहे की नाही. एकमेकांचं जमत नाही, किंवा विचार जुळत नाहीत म्हणून दूर होणं वेगळं. तिथे निदान एकमेकांशी जुळवून घेण्याचे प्रामाणिक प्रयत्न झालेले असतात. आणि सारे प्रयत्न फोल ठरल्यावरच वेगळं होण्याचा निर्णय घेतला जातो. कमिटमेण्ट फोबिया असणाऱ्या व्यक्तीला मात्र रिलेशनशिपच्या सुरुवातीलाच पुढे काय होणार याची खात्री असते आणि आपलं नातं पुढे जावं यासाठी ती व्यक्ती कधीच प्रयत्न करत नाही. उलट एकदा नात्यामधलं नावीन्य संपलं की जोडीदाराला इरिटेट करायला सुरुवात होते ज्यायोगे जोडीदाराने स्वत:च आपल्याला कंटाळून सोडून द्यावं. तेही सध्या झालं नाही तर काही ना सांगता सवरता निघून जायचा मार्ग राखीव ठेवलेला असतोच.
खूप आॅप्शन्सचा गुंता
विदेशातलं ठीक आहे; पण आपल्यासारख्या एवढ्या संस्कारी, सोज्वळ आणि संस्कारी समाजात हे का घडत असावं, असा प्रश्नही अनेकांना पडेल. उत्तर सोपं आहे, हा अतिआॅप्शन्सचा गुंता आहे. आज-काल डेटिंग अॅप्सवर सटासट लेफ्ट स्वाइप (नाही आवडला) आणि राइट स्वाइप (आवडला बुआ) करता येतं. दर दिवशी पन्नास रिक्वेस्ट येऊन पडतात, तिथे इससे पन अच्छा इससेपण सस्ताच्या शोधात हातचे घालवणाऱ्यांची संख्या वाढली नाही तर नवलंच.
कमिटमेण्ट फोबिया असणाऱ्या मुलींचंही प्रमाण वाढतं
फक्त मुलांना असा फोबिया असतो, मुली मात्र कायम सुखी संसाराची स्वप्न पाहण्यात गुंग असतात. या भ्रामक समजुतीला आता सॉलिड तडे जात चालले आहेत. मेट्रोसिटीज् मधल्या मुलींना कधी नव्हे ते या फोबियाची लागण झाली आहे. करिअरच्या मागे धावता धावता लग्नाचे वय कधी येते समजत ही, तरीही हवे तसे यश न मिळाल्याने लग्नाचा निर्णय लांबणीवर पडतो आणि मग मनासारखा जोडीदार मिळत नाही. लग्न झाल्यानंतर मुलींकडून केल्या जाणाऱ्या अवास्तव अपेक्षाही याला कारणीभूत आहेत. त्यामुळे मेरी जरूरते पुरी करने के लिये मुझे किसी हसबंड की जरु रत नही असले काही डायलॉग देणारी दीपिका पदुकोण त्यांना जवळची वाटते. आपल्या आयुष्याचे निर्णय घ्यायला आपण मुखत्यार आहोत, स्वत:चं घर पैसे, गाडी बाळगून आहोत मग आपल्याला अक्कल शिकवणाऱ्या पुरुषाचे कपडे धूत बसायची गरज काय, असा प्रश्न कमिटमेण्ट फोबियाच्या मुळाशी असतो आणि आजकाल हा प्रश्न पडणाऱ्या मुलींचा प्रमाण वाढतंय.
जोडीदाराचं काय?
बऱ्याच केसेसमध्ये कमिटमेण्ट फोबिया असणाऱ्या व्यक्तीच्या जोडीदाराला माहीतही नसतं, की आपल्या जोडीदाराच्या मनात काय सुरू आहे. इकडे जोडीदार सुखी संसाराची स्वप्न रंगवत बसतो आणि तिकडे फोबिया असणारी व्यक्ती काहीही पूर्वकल्पना न देता नातं संपवते. फोबिया असणाऱ्यांच्या जोडीदारांसाठी हा खूप मोठा धक्का असतो. आपलं काय चुकलं या विचारापायी त्यांच्या मेंदूचा भुगा होतो; पण समर्पक उत्तर सापडत नाही. काही लोक निराशेच्या गर्तेतही ढकलले जातात. सुदैवी असतील तर त्यांना पुन्हा सुयोग्य असा जोडीदार मिळतो ज्या सोबत ते आयुष्याची नवी सुरवात करू शकतात नाहीतर त्यांचा नात्यांवरचा विश्वासच उडतो.