लग्न ठरवताना पालक आणि तरुण मुलं यांच्यात 'या' कारणांमुळे होतो संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 07:00 AM2018-10-04T07:00:00+5:302018-10-04T07:00:00+5:30
रोमान्सच्या पलीकडचा प्रॅक्टिकल प्रवास करायचा तर डोळस विचार करा.
सचिन थिटे, महेंद्र नाईक
‘आम्ही मुलांना लहानाचं मोठं करायचं, खस्ता खायच्या, पैसे खर्च करायचे मग मुलांनी आमचं ऐकायला नको का? ऐकलं समजा तर असं काय आकाश कोसळेल.’
- एक पालक फोनवर स्पष्टच बोलत होते. खरं तर जाबच विचारत होते. पालकांनीच समजून घ्यायला हवं हा सूर त्यांना काही पचलेला नव्हता. मुलांच्या भल्यासाठीच, त्यांचं भविष्य, संसार उत्तम व्हावा हीच आपली भावना असते, आम्ही पालक काय शत्रू असतो का, असंही ते म्हणत होते. त्यांचा राग घटकाभर बाजूला ठेवला तरी खरंच होतं त्यांचं म्हणणं. अनेक पालक आम्हाला हेच सांगत होते, म्हणत होते की पालकांनी समजून घ्यायचं हे कळतं, पण मुलांनीही जरा पालकांचं ऐकून घ्यायला नको का?
प्रश्न होतेच. पण त्या प्रश्नांतही, काहींच्या संतापातही एक गोष्ट स्पष्ट दिसत होती की पालकांनी वेळ, भावना, पैसा आणि खूप काही मुलांत गुंतवलेलं असतं. पालकांचं भावविश्व मुलांभोवती गुंतलेलं असतं. त्यांच्याशिवायचं जगणंच काही पालक विसरून गेलेले असतात.
त्यातलेच काही पालक सांगत होते, मुलांच्या निर्णयाला आंधळेपणाने सहमती द्यावी असं नाही. पण विरोधाची कारणं मुलांच्या सुखापेक्षा मोठी आहेत का, हे विचारावं स्वतर्ला!
काही पालक मनमोकळं करत सांगत होते की, मुलांनी आपल्याला अंधारात ठेवून लग्नासारखा मोठा निर्णय घेतल्याचं दुर्ख वाटतंच, पण तरी समाजाच्या भयापोटी त्यांचा खून करणं चुकीचंच आहे.
पालक त्यांची बाजू नाही, खरं तर मनमोकळं करत होते, आमच्याशी फोनवर! जे एरव्ही मुलंही घरात ऐकून घेत नसतील ते सांगत होते.
निमित्त होतं, ‘ऑक्सिजन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाचं. त्या लेखाच्या शेवटी महाराष्ट्र अंनिसच्या जोडीदाराची विवेकी निवड टीमचे व्हॉट्सअॅप नंबर दिले होते. लेख प्रसिद्ध झाल्यादिवशी सकाळपासूनच मुंबईपासून ते चंद्रपूरपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून तरुण मुला-मुलींचे आणि त्यांच्या पालकांचे सतत फोन आले. त्यात अलीकडच्या काळात आंतरजातीय लग्न केलेल्या जोडप्यांचे फोन आणि मेसेज होते. काहींना आंतरजातीय लग्न करायचं म्हणून सल्ला हवा होता, तर काहींना घरच्या विरोधावर तोडगा हवा होता. कुणाला मदतही हवी होती, तर कुणाकुणाला फक्त मनातलं सांगायचं होतं, मन मोकळं करायचं होतं.
तरीही हे सर्व फोन ऐकून आमच्या हाती लागलेले हे काही मुद्दे.
1) निर्णय घेण्यासंदर्भात तरुणांमध्येही गोंधळलेपण आहे हे जाणवलं. प्रेम आणि आकर्षण यातला फरक न समजणं, प्रेम म्हणजे सर्वस्वाचा त्याग अशा फिल्मी कल्पना, विश्वास-अविश्वास यातला गोंधळ यांमुळे लग्नाचा निर्णय घेण्यत अडचण येते.
2) टोकाच्या पजेसिव्हनेसमुळे प्रेमाची जागा मालकीने घेतलेली आहे, हे अनेकांना लग्नाचा निर्णय घेताना लक्षात येत नाही. त्यातून अविवेकी निर्णय घेतले जाऊ शकतात.
3) जात हा प्रश्न मोठा दिसतोच. जात लग्नातच कशी आडवी येते? तेही मुलगा खालच्या जातीतला असेल तर? हा संताप व्यक्त करणारा अनेक मुलींचा प्रश्न होता. मानसिकतेतील जातींची उतरंड, उच्च-नीचता, योनिशुचिता, वर्ण संकर इत्यादी कारणं हा स्वतंत्न लेखाचा विषय व्हावा इतका तपशील मुलांनी फोनवर शेअर केला. 4) मात्र यातली आनंद वाटावी अशी गोष्ट म्हणजे आजच्या युवा पिढीला पडत आहेत, ते प्रश्न मोकळेपणानं विचारत आहेत, त्यातील आंतरविरोध शोधत आहेत हे आश्वासक आहे.
5) सांगलीच्या राजमती घसघसे यांचा अनुभव इथे महत्त्वाचा आहे, आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर लग्न न करू शकलेल्या या जोडप्यानं स्वतर्च्या मुलीच्या आंतरधर्मीय लग्नाला पाठिंबा दिला आणि मुलाच्या घरचे तयार होईर्पयत वाटही पाहिली. त्यांचा हा कृतिशील अनुभव प्रेरणादायी आहे.
6) निष्टूर घटना टाळण्यासाठी प्रत्येक गावात समुपदेशन केंद्र हवं असं मत यवतमाळच्या प्रतिभा मेश्राम मांडतात, ते फार महत्त्वाचं आहे.
7) एक अजून विशेष गोष्ट म्हणजे अनेक तरु ण मुला-मुलींना पालकांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याची इच्छा नाहीये. आपल्या पालकांशी बोलावं, त्यांना समजून सांगावं आणि त्यांनी किमान सारासार बोलणं करावं आपल्याशी, मग त्यांचा निर्णय पक्का करावा एवढी साधी इच्छा आहे या मुला-मुलींची.
8) गोव्यातून एका मुलीच्या आईचा फोन आला होता, जिने मुलीच्या आंतरजातीय प्रेमविवाहाला घरातील इतरांचा विरोध असताना स्वतर् खंबीर पाठिंबा देऊन लग्न लावून दिलं; पण लग्नानंतर आता वर्षभरात घटस्फोट घ्यावा लागला. या गोष्टीचा जितका धक्का मुलीला बसला त्यापेक्षा जास्त या आईला बसला होता. त्यांच्याशी अधिक बोलल्यावर लग्न ठरवताना निवडीच्या निकषांतच कमतरता होती हे लक्षात आलं.
9) असेच जे फोन प्रेमात असणार्या मुला-मुलींचे आले त्यातसुद्धा आम्हाला हेच जाणवलं की हीच व्यक्ती का, निकष काय या प्रश्नाची उत्तरं अनेकांकडे नाहीत.
10) म्हणूनच हा विषय जितका जाती-धर्माचा आहे त्याहीपेक्षा अनेक पटीने एकूणच जोडीदार निवडीचा आणि त्यासाठी कुटुंबात हव्या असणार्या संवादाचा आहे असं लक्षात आलं.