निर्माण - उत्तरं शोधणारा प्रवास
By admin | Published: March 10, 2017 12:48 PM2017-03-10T12:48:03+5:302017-03-10T12:48:03+5:30
उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब... या चक्रात फिरता फिरता तरुण मनांंमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न
Next
>समाजासाठी काम म्हणजे नेमकं काय करायचं?
निर्माण आणि आॅक्सिजन
उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब... या चक्रात फिरता फिरता तरुण मनांंमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरं तर प्रयोगच - गडचिरोलीला सुरू आहे. त्याचं नाव ‘निर्माण’. डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या प्रेरणेतून या प्रयोगात एकत्र येणारं तारुण्य एका विलक्षण अनुभवातून जातं.
गेल्या पाच वर्षांत ‘निर्माण’च्या एकूण पाच बॅचेसमध्ये ७००हून अधिक मुलामुलींनी हा अर्थपूर्ण अनुभव घेतला. त्यातल्या काहींनी सामाजिक कामात उडी घेतली आहे. काही पुढलं शिक्षण-जॉब या मार्गाने गेले असले, तरी त्यांनी बदलत्या समाजाकडे पाहण्याची ‘वेगळी’ नजर कमावली आहे. समाजासाठी काही करावं असं वाटणाऱ्या साऱ्यांनाच जे प्रश्न पडतात,
त्या प्रश्नांची उत्तरं स्वत:पुरती शोधण्याचा प्रयत्न या निर्माणी दोस्तांनी केलेला आहे.
म्हणून त्यांनी सांगितलेली ही अवघड प्रश्नांची उकल...
त्यातला हा तिसरा प्रश्न : समाजासाठी काम म्हणजे नेमकं काय करायचं?
..तर नाकाला रुमाल लावायची गरज नाही!
प्रश्न एवढाच आहे की आपण काय कृती करणार आहोत?
‘निर्माण’च्या मित्र-मैत्रिणींनी गेल्या काही अंकांत सांगितल्याप्रमाणे सामाजिक काम असं काही नसतं हे मी सुरुवातीलाच परत एकदा सांगतो. आणि मी या गोष्टीशी पूर्णपणे सहमत आहे. आपण जे काम करतो ते केवळ समाजासाठी उपयोगी आहे आणि त्यातून समाजासाठी काहीतरी चांगलं, नावीन्यपूर्ण, सृजनशील, सकारात्मक करता येईल हा प्रांजल प्रयत्न यामागे असावा असं मला वाटते. समाजातील ‘बॉटम आॅफ द पिरॅमिड’ म्हणजे दुर्लक्षित, काहीशा अविकसित, दुर्बल घटकांपर्यंत पोहचून त्यांना जर आपल्याला मदत करता येत असेल तर त्यात काहीच चूक नाही. पण केवळ असं काम करणारी व्यक्ती म्हणून समाजसेवक या नावाचं स्टीकर त्याच्यामागे लावणं चुकीचं आहे. हातात झोळी घेऊन, घरावर तुळशीपत्र ठेवून समाजासाठी काम करणं ही आजची समाजसेवेची व्याख्या राहिलेली नाही.
आपण आपल्या शिक्षणाचा समाजातील वेगवेगळ्या समस्या सोडविण्यासाठी केलेला प्रयत्न आणि त्या कामातून समाधान आणि आनंद मिळाला तर ते खरं सामाजिक काम होईल, असं मला वाटतं.
एखादी समस्या सोडवायला आपल्याला अगदी गावात जाऊन राहण्याची देखील गरज नाही आणि प्रत्येकाने तसं करणं देखील अपेक्षित नाही आणि प्रत्येकाला तसं करणं शक्य होईल असंही नाही. त्यामुळे आपण आपल्या गावात, शहरात जिथं कुठं असू तिथे आपण सामाजातील प्रश्न सोडविण्यात हातभार लावू शकतो. आपण आपल्या आजूबाजूच्या समस्यांबद्दल भरभरून बोलतो, टीका करतो, नुकत्याच आपल्या आजूबाजूला निवडणुकांसुद्धा झाल्या. आपण गेल्यावेळी निवडून दिलेल्या उमेदवारांबद्दल आपण असंच काही टीकात्मक बोललोही असू.
प्रश्न एवढाच आहे की याबद्दल केवळ बोलण्यापेक्षा, याला-त्याला दोष देण्यापेक्षा आपण स्वत: एखादी समस्या सोडविण्यासाठी आपल्या समाजात, परिसरात काय कृती करतो? ते जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या कुठल्याही कृतीमुळे जर समाजातील एखादी समस्या सुटत असेल, त्यातून कोणाला मदत होत असेल तर यापेक्षा मोठी सेवा नाही आणि सध्याच्या स्थितीत हीच समाजाची गरज आहे.
आपण आपल्या हातातला कचरा जिथं कुठे असू, तो कचरापेटीतच जाईल एवढी जरी दक्षता घेतली तरी ती समाजाची खूप मोठी सेवा होईल. आपला परिसर स्वच्छ राहील आणि आपल्याला नाकाला रूमाल घेऊन फिरण्याची गरज राहणार नाही. ही कृती दिसायला जरी खूप छोटी असली तरी आपल्या केवळ काही चांगल्या कृती आणि सवयींमुळे समाजात बदल घडू शकतील. त्यासाठी वेळ आणि सहनशीलता दोन्ही द्यावी लागेल यात काही शंका नाही.
आपण समाजासाठी काहीतरी जर करू शकलो तर त्यातून मिळणारा आनंद आणि समाधान ही भावना इतकी सुंदर असते की त्याचं शब्दात वर्णन करताच येणार नाही. माझा मित्र शहरातील कचरा कुजण्यासाठी चांगले उपकरण शोधतोय, एक मैत्रीण समाजातील वेगवेगळ्या समस्यांवर चांगले माहितीपट तयार करते, एक ग्रामीण भागाचे फोटो काढतो, कोणी एक मैत्रीण महिला बचतगट निर्मितीचे काम करते आणि हे सगळं आपल्या शिक्षणाचा सुयोग्य वापर करून. त्यातून ते एखाद्या मल्टिनॅशनल कंपनी देईल इतका पगार नाही पण स्वत:ला आणि कुटुंबाला आनंदी ठेवण्याइतके पैसेपण कमावतात.
त्यामुळे केवळ एका चाकोरीत अडकून राहण्यापेक्षा आपल्या ‘कम्फर्ट झोन’च्या पलीकडचे जग एक्सप्लोर करणं आणि त्यातील आव्हानं सांभाळणं इथपर्यंत आपल्या कामाची व्याप्ती असते. प्रश्न इतकाच उरतो की समस्या खूप दिसतात पण त्यावर तुम्ही काय कृती करता?
हा प्रवास सुरू करणं आणि ते काम सामाजिक आहे की असामाजिक हे ज्याचं त्यानं ठरवणं इतकंमात्र नक्की होऊ शकतं.
-- रंजन पांढरे, निर्माण
( इंजिनिअर झालेला रंजन पुण्यात बायफमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो.)
काम वेगळं, जगणं वेगळं असं कसं असेल?
आपली लाइफ स्टाइल आणि काम यांच्यातलं अंतर पुसत जाणं हे समाजकामच!
तसं तर प्रत्येकच जण सामाजिक काम करतो का?
म्हटलं तर हो; म्हटलं तर नाही.
‘मी सामाजिक काम करतो’ या वाक्याला ७ अब्ज लोक ७ अब्ज पद्धतीने पटवून देऊ शकतात. आपण करत असलेल्या कामाचा किंवा कृतीचा समाजावर काही ना काही फरक पडतच असतो. तो फरक काय पडावा याच्यावरती आपण ते काम ‘सामाजिक’ असं ठरवत असतो. एसटी बस चालवणारे ड्रायव्हर किंवा शेती पिकवणारे शेतकरी एका दृष्टीने समाजाला फायदा होईल असंच काम करत असतात; पण त्यांना आपण ‘तसं’ सामाजिक कार्यकर्ते वगैरे म्हणत नाही.
याचं कारण त्या कृतीमागची प्रेरणा आपण तपासतो आणि मग ठरवतो. तसेच (सामाजिक प्रेरणा आहे असे मानले तर) दारू पिऊन एसटी चालवणारा ड्रायव्हर किंवा नदीतून बेकायदेशीरपणे पाणी उचलून ऊस पिकवणारा शेतकरी यांना आपण मुळीच ‘सामाजिक’ म्हणणार नाही किंवा म्हटलं तर असामाजिकच म्हणू. कृती तर तीच आहे; पण दृष्टिकोन बदलतो.
मग, सामाजिक काम ठरवण्याचे सर्वसाधारण परिमाण काय?
१. आपण काय प्रेरणेतून काम करतो?
२) कसं करतो, म्हणजे कोणती मूल्ये समोर ठेवून काम करतो?
३) कोणासाठी करतो? यावरून सामाजिक कामाची ओळख ठरते, असं म्हणता येईल.
एखादा संवेदनशील तरुण रस्त्यालगत राहणाऱ्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्याच्या मोकळ्या वेळात त्यांना शिकवण्याचं काम करतो, त्याला (वरील कसोटी लावली तर) आपण सामाजिक काम म्हणू शकतो. पण मला या पुढं जावसं वाटतं. लोकांची गरज, आपली प्रेरणा आणि मूल्ये या गोष्टी सांभाळून सामाजिक काम करता येईल; पण इतक्यावर मला भागवायचं नाही. या कामाव्यतिरिक्त आयुष्यात काय आणि कसं जगतो हेही महत्त्वाचं.
तोच तरुण इतर दिवशी मॉलमध्ये पिझ्झा, बर्गर उडवत असेल; महागड्या गाडीवर रोड ट्रीपवर जात असेल तर? (सो कॉल्ड नैतिकतेच्या चौकटीत राहून ऐशोआरामाची जिंदगी जगत असेल तर)
काम करताना प्रेरणा आणि मूल्ये आहेत, सहवेदना आहे पण बाकी आयुष्यात नाही, हे द्वैत मला खटकतं. २४ तासांतून १ मिनिटसुद्धा इतरांच्या सहवेदनेपासून हटता येणार नाही, क्षणासाठीही समाजातील व्यापक प्रश्नांपासून प्रवृत्त होता येणार नाही इतकं समाजवास्तव आजूबाजूला असतं. म्हणून मला काम वेगळं आणि जगणं- लाइफ स्टाइल वेगळी असं करता येईल का, निदान सामाजिक क्षेत्रात तरी?
माझी सामाजिक काम करण्यामागची प्रेरणा, लोकांप्रतीची सहवेदना आणि त्यासाठी मी माझ्यासाठी ठरवलेली मूल्ये यांना जीवनात संपूर्णपणे (२४ बाय ७) धारण करणं तसंच काम आणि लाइफ स्टाइलमधलं द्वैत कमी कमी करत नेणं या दिशेने मी करत असलेले प्रयत्न म्हणजे ‘सामाजिक काम’!
- अमोल शैला सुरेश, निर्माण ६
बी द चेंज
आपलं प्रत्येक काम समाजाला काय देतं, हेच या प्रश्नाचं उत्तर!
समाजकाम म्हणजे काय? याचा विचार करण्यापूर्वी माझ्या लेखी समाज म्हणजे काय हे प्रथम सांगणं महत्त्वाचं आहे. मी आणि माझ्या अवतीभवतीचा परिसर म्हणजे माझा समाज. या समाजात माझा परिवार, माझे मित्र, माझे गाव, तालुका यापासून तर थेट संपूर्ण विश्व हा माझा समाज होऊ शकतो. माझा समाज माझ्यावर आणि माझ्या विचारांच्या व्याप्तीवर अवलंबून आहे. नुस्ती माणसं म्हणजे माझा समाज नाही तर पर्यावरण, प्राणी, पक्षी, पाणी, वायू, आकाश, शेती हेसुद्धा माझ्या समाजाचाच भाग आहे. या समाजातील प्रत्येक घटकाचं रक्षण, संवर्धन हे उद्देश ठेवून जे कुठले काम केलं जातं ते माझ्या लेखी सामाजिक काम आहे. शेतात सेंद्रिय धान्य पिकविण्यापासून तर अवकाशात एकाचवेळी १०४ उपग्रह सोडणं, विनाकारण चालू असलेला नळ बंद करण्यापासून तर गंगा शुद्धीकरणापर्यंत, विनाकारण सुरू असलेले पंखे, लाइट बंद करण्यापासून तर सौरऊर्जा वापरेपर्यंत सगळं माझ्या लेखी सामाजिक काम आहे.
थिंक ग्लोबली, अॅक्ट लोकली- आपण जी एखादी कृती करणार आहोत त्याचा संपूर्ण विश्वावर काय परिणाम होणार आहे हा विचार करून आपलं सामाजिक काम सुरू केलं पाहिजे असं माझं मत आहे. गांधीजी म्हणतात, Be the change you wish to see in the world
जोवर प्रश्न आहेत तोवर उत्तरांची गरज भासणारच. जोवर मी आजारी आहे तोवर डॉक्टरांची गरज भासणार आहेच. तसंच जोवर सामाजिक स्वास्थ्य नाही तोवर सामाजिक कामांची गरज असणार आहेच. माझ्या समाजातील सर्व घटक पर्यावरण, निसर्ग, मनुष्य जोवर स्वस्थ नाहीत तोवर समाजिक स्वास्थ्य निर्माण होणार नाही. सामाजिक कामाची गरज ही नेहमी असणार आहेच. त्याचे स्वरूप प्रत्येक काळात बदलणारे असते. पण गरज कधीही संपणार नाही.
सामाजिक कामांची व्याप्ती ही फार मोठी आहे. परंतु माझ्यासाठी ती आरोग्यापुरता मर्यादित असेल तर कुणाच्या बाबतीत फक्त शिक्षण प्रश्नापर्यंत मर्यादित असेल. माझ्या सामाजिक कामाची व्याप्ती मी कशी ओळखू शकतो? तर मी जे शिक्षण घेतलं आहे, माझ्यात जी कौशल्ये आहेत, मला ज्याची रूची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या प्रश्नावर खरंच काम करण्याची गरज आहे अशी कामं माझ्या कामांच्या व्याप्तीत येतात.
जीवन जगताना काही उद्देश्य घेऊन आपण काम करीत असू तर ते काम न राहता कर्मयोग होतो आणि आपलं जगणं अर्थपूर्ण होतं. सामाजिक काम करण्यासाठी कुठलीही पदवी लागत नाही आणि कुठलेच प्रमाणपत्र लागत नाही. स्त्री-पुरु ष, लहान मुलं, वृद्ध कोणीही असो सामाजिक काम सगळेच करू शकतात. फक्त करून बघणं महत्त्वाचं आहे. चला तर मग करके देखो.
भूषण देव, निर्माण ५