सोयीचा गडबडगुंडा हुंडा
By admin | Published: February 25, 2016 09:57 PM2016-02-25T21:57:23+5:302016-02-25T21:57:23+5:30
हुंडाबळीच्या कथा नेहमी मुलींच्या बाजूनं म्हणजेच ‘देणाऱ्यां’च्या बाजूनं सांगितल्या जातात, ‘घेणाऱ्यांचं काय?’
मुलांना हवा आहेच,...आता मुलीकडच्यांनाही द्यायचा आहे!!
परंपरा + रीत+ सक्ती +प्रेशर+छळ +शोषण+समाजप्रतिष्ठा+मुलीची बाजू+स्वेच्छा+सेलिब्र्रेशन+मोठायकी+ऐपत
हुंडाबळीच्या कथा नेहमी मुलींच्या बाजूनं म्हणजेच
‘देणाऱ्यां’च्या बाजूनं सांगितल्या जातात,
‘घेणाऱ्यांचं काय?’
त्यांची असते का काही बाजू?
बोहल्यावर चढू पाहणाऱ्या आजच्या तरुण मुलांच्या बाशिंगबळात
‘हुंडा’ किती महत्त्वाचा असतो,
अशा नाण्याच्या दुसऱ्या बाजूनं ‘आॅक्सिजन’ने
चर्चेला तोंड फोडलं !
तरुण मुलग्यांना थेट विचारलं की,
एरव्ही वडीलधाऱ्यांना न जुमानणारी, आणि
आपलं तेच खरं करणारी तुम्ही स्वतंत्रवृत्तीची तरुण मुलं
लग्न-हुंडा-देणी-घेणी याच टप्प्यात एकदम आज्ञाधारक होत
‘घरचे म्हणतील ते’ या मोडवर कसे जाता? आणि का?
हुंडा घेण्याचं असं काय कम्पल्शन असतं तरुण मुलांवर?
- त्याचं उत्तर म्हणून जे हाती आलं,
त्या पत्रातून, चर्चेतून, निरीक्षणातून साकारलेला
आणि डोकं भिरभिरवून टाकणारा हा अंक!
***
ते वाचताना आपल्या समाजातल्या,
लग्नसंस्थेतल्या ‘व्यवहारा’चं वास्तव (आपण समजतो)
त्यापेक्षा वेगळं दिसेल, बदलताना दिसेल
आणि सक्ती, जाच आणि शोषण
यासह स्वेच्छा आणि प्रतिष्ठा यांची तोरणंही
‘मुलीकडच्यांच्या’ मंडपाला लागलेली दिसतील!
कारण बहुसंख्य मुलींना आणि त्यांच्या पालकांना
शहरी-नोकरीवाला मुलगा हवाय आणि त्या मुलासाठी
पैशाची बोली लावायची त्यांची तयारी आहे.
***
म्हणून तर आधुनिक म्हणवणाऱ्या आपल्या
समाजात आता हुंड्यानं कात टाकली आहे.
टिपिकल बैठका नि याद्या, त्यावर साक्षीदारांच्या सह्या
आणि रोख रकमेतला हुंडा यापेक्षा
संसारोपयोगी वस्तू आणि सेवारूपात
‘हुंडा’ नव्याने आपला जम बसवतो आहे!
थाटामाटात लग्न, संपूर्ण संसार ते हनिमून पॅकेज आणि
बाईक ते कन्फर्म नोकरीसाठी काही लाखांची इच्छामदत
या नव्या रूपात ‘हुंडा’ असं लेबल न लागता
लग्नाची देणीघेणी पोहचत आहेत.
***
‘देणाऱ्या आणि घेणाऱ्यांच्या’ पत्रातून
उलगडत जाणारं हुंड्याचं हे ‘न बदलेलं’ तरीही
‘बदलतं’ चित्र या विशेष अंकात..
संकलन, विश्लेषण आणि लेखन :
मेघना ढोके