रेझ्युमे कॉपी-पेस्ट करताय? मग गेली तुमची नोकरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 03:33 PM2019-10-10T15:33:10+5:302019-10-10T15:33:16+5:30
रेझ्युमे म्हणजे तुमचा पहिला इंटरव्ह्यू. तुमची ओळख. रेझ्युमेचा बाण सुटला की सुटला आणि तिथंच ठरतं तुम्हाला नोकरी मिळणार की जाणार!
डॉ. भूषण केळकर
रेझ्युमे/बायोडाटा/सीव्ही हे तीन शब्द आपल्याला फार छळतात. ते फार अवघड काम असं सार्यांना वाटतं. मात्र हा सीव्ही किंवा रेझ्युमे हीच तुमची ओळख असते. एखाद्या कंपनीत नोकरी/पदासाठी अर्ज करताना तुम्ही तुमचे सादरीकरण नीट करणे फार महत्त्वाचे, यात शंकाच नाही.
इंटरव्ह्यू किंवा मुलाखत एवढेच काय गटचर्चा अशा टप्प्यांर्पयत पोहोचण्याची पहिली पायरी असते ती रेझ्युमेची.
मी तर रेझ्युमेला तुमचा पहिला इंटरव्ह्यू असेच म्हटले आहे. त्यात जर तुम्ही सादरीकरण छान केलेत तरच पुढचा म्हणजे प्रत्यक्ष/फेस-टू-फेस इंटरव्ह्यू होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळेच रेझ्युमे उत्तम लिहिणं अनिवार्य आहे.
एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की रेझ्युमे लिहिणे हे काय आहे?
महत्त्वाचे काम. पहिला इंटरव्ह्यूच. त्यामुळे 15-20 मिनिटांत ‘उरकून एक’ हा अॅटिटय़ूड धोक्याचा आहे. लक्षात ठेवा की पुढच्या सर्व टप्प्यांसाठी हा तुमचा रेझ्युमे गुरुकिल्लीचं काम करतो. त्याला सन्मानाने वागवा.
दुसरा भाग लक्षात घ्या की समजा तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये काही चूक केलीत तर निदान तुमच्याकडे सॉरी सर, माझी गडबड झाली, मला असं उत्तर द्यायचं होतं की..’ असं म्हणून योग्य उत्तर देण्याची शक्यता तरी असते. रेझ्युमे एकदा का तुम्ही पाठवून दिलात की बाण सुटला! म्हणजे मला खरं तर तुम्हाला हे सांगायचंय की रेझ्युमे हा पहिल्याच अटेम्पटमध्ये उत्तमच असायला हवा!
सामान्यतर् एका जागेसाठी 500-600 रिझ्युमे येत असतात, कधी कधी 1000 पेक्षा जास्तसुद्धा. आणि म्हणूनच त्यातून तुमचा रेझ्युमे उठून दिसणे आत्यंतिक महत्त्वाचे आहे.
रेझ्युमे उत्तम लिहिण्याचे तीन प्रमुख नियम मी तुम्हाला सांगतो. ते जर नीट समजावून घेतलेत आणि वापरलेत तर मला खात्री आहे की तुम्हाला योग्य न्याय मिळेल. ते तीन नियम आपण समजावून घेऊ.
1) स्वतर्ला ओळखा (नो युवरसेल्फ)
2) रेझ्युमे कोण वाचणार आहे ते समजावून घ्या. (ऑडिअन्स)
3) संयुक्तिक शब्दांचा वापर (रिलेव्हन्स).
पहिला भाग आपण ‘करिअर क्लॉक’मध्ये उत्तम तर्हेने तपासला आहे. त्यामुळे त्यावर मी अधिक भाष्य करत नाही.
दुसरा मुद्दा बव्हंशी वेळा आपण रेझ्युमे लिहिताना विसरतो. जरी तुम्ही तेच असतात तरी वाचणारी व्यक्ती वेगळी असल्याने आपण भर कशावर द्यायचा हे त्या त्या कंपनीला अर्ज करताना आणि लक्षात ठेवून त्यावर अधिक भर देणं महत्त्वाचं. त्यामुळे नोकरी कुठलीही असो एकच टिपिकल सीव्ही सगळीकडे पाठवून चालत नाही.
उदाहरणार्थ तुम्ही जर्मन भाषा अगदी प्राथमिक पातळीला शिकला असाल तर बँकेमध्ये अर्ज करताना प्रामुख्याने उल्लेख केला नाही तरी चालेल; परंतु जर एखाद्या जर्मन कंपनीत नोकरीसाठी अर्ज केलात तर जर्मन भाषेचे ज्ञान प्राथमिक पातळीवरचे असूनही उल्लेख करणं फायदेशीर ठरेल.
तिसरा मुद्दा आहे तो संयुक्तिक (रिलेव्हन्ट) शब्दांचा वापर.
काही करून माहितीची पुनरुक्ती टाळणं आणि जे शब्द तुम्ही रेझ्युमेमध्ये लिहाल त्यानं काही तरी नवी माहिती वाचकाला मिळणं. ती त्या जॉबसाठी आवश्यक असणं हे पण महत्त्वाचं आहे.
मात्र ते नेमकं मांडायचं कसं याविषयी पुढच्या अंकात.