चलते चलते बच गये तो गाव पहुंच जायेंगे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 10:46 PM2020-05-06T22:46:28+5:302020-05-07T09:46:07+5:30

तेलंगणा-आंध्र प्रदेशात रोजंदारीसाठी, मिरच्या खुडण्यासाठी गेलेले मजूर आता गडचिरोली-चंद्रपूरमध्ये परतत आहेत, काही पुढे झारखंडला जात आहेत. उन्हात मैलोन् मैल चालत आहेत, ना पोटात अन्न, ना पायात ताकद. मात्र त्यांचाही ध्यास एकच, ‘घर जाना है!’

corona -lockdown - hundreds of young migrants from Telangana & aandhra pradesh walk home to Maharashtra- jharkhand | चलते चलते बच गये तो गाव पहुंच जायेंगे !

चलते चलते बच गये तो गाव पहुंच जायेंगे !

googlenewsNext
ठळक मुद्देभारत आणि इंडिया हे दोन वेगळे देश आहेत, आणि लॉकडाउनमधला भारत हा ‘असा’ आहे. एवढंच !

- सतीश गिरसावळे

चंद्रपूर, गडचिरोलीसमवेत मध्य भारत हा जगातील सर्वात उष्ण भाग समजला जातो.
सकाळी 11 वाजता घराबाहेर पाऊल ठेवणं  मुश्कील. आणि  याच रणरणत्या उन्हात 13 जणांचा एक समूह भेटतो.
चंद्रपूरहून थेट झारखंडला जायला  निघालेली ही तरुण मुलं. साधारण 11क्क् किलोमीटर पायी जायचं आहे असं ते सांगतात.
शोधग्रामजवळच ते भेटले. थोडी विचारपूस केली तर समजले की हे सर्वजण चंद्रपूरला एका स्टील प्लाण्टमध्ये काम करत होते. आता हाताला काम नाही.
पण मग तरी तुम्ही चंद्रपूरलाच थांबले का नाहीत, अशा प्रश्न विचारला तर एक जण म्हणाला की, ‘कब तक उबले हुये आलू खाके जिये, वैसे भी वहा मरना ही था, चलते चलते बच गये तो गाव पहुंच जायेंगे !’


असाच एक दुसरा ग्रुप. गडचिरोली शहरापासून साधारण 25 किमी पुढे धानोरा गावाजवळ हैदराबादहून चालत आलेले आठजण भेटले. तीन महिला, पाच पुरुष. हे सर्वजण छत्तीसगडमधील मानापूर परिसरातील रहिवासी. मजुरीसाठी चार महिन्यांपूर्वी हैदराबादला गेले होते. तिथे हे सर्वजण एका बांधकाम ठेकेदाराकडे मजुरी करत होते. लॉकडाउनमुळे बांधकाम थांबलं, मजुरीही बंद झाली. ठेकेदाराने काही दिवस रेशन पुरवलं; पण पुढे ठेकेदारही अडचणीत आला. काम नसताना या सर्वानी स्वत:जवळील पैशाने कसाबसा एक महिना काढला. पैसे आणि धान्य दोन्ही संपल्यावर उपासमारीची पाळी आली. त्यामुळे 22 एप्रिलला हैदराबाद ते छत्तीसगड असा पायी प्रवास त्यांनी सुरू केला. ते आम्हाला भेटले तेव्हा  बारा दिवसांमध्ये 55क् किलोमीटर ते चालून आले होते.  प्रत्येकाच्या पायाला फोड आले होते, काही फोड फुटले होते. शरीर एवढं कमजोर झालं होतं की, आम्ही खायला दिलेलं टरबूज उचलणं त्यांना अवघड झालं होतं. बसल्यानंतर उठण्याची ताकद कुणाच्याच शरीरात नव्हती. त्यांच्याकडे सामानही नव्हतं.
सामान नाही का काही असं विचारलं तर ते म्हणाले, वाटेत पोलिसांनी थांबवलं म्हणाले, ‘सामान के साथ तुम कोरोना साथ लेके जाओगे !’ आणि त्यांनी कपडय़ासकट जवळपास सर्व सामान काढून घेतलं. 
प्रचंड उन्हामुळे प्रत्येकाचं शरीर करपून गेलं होतं, फार गळून गेली होती ही माणसं.
**
वरंगलहून गोंदियाला पायी जाणारं एक कुटुंब कुरुड गावाजवळ भेटलं. पाच जण होते. त्यांच्याकडे स्टीलच्या दोन मोठय़ा बादल्या होत्या. या बादल्यात काय आहे म्हणून पहायला डोकावलो तर त्यात दोन लहान मुलं होती. उन्हात स्टीलची बादली गरम झाल्यावर त्या लेकरांचं काय होईल? असा प्रश्न पडलाच. मात्र त्यांना काही विचारायची हिंमत झाली नाही. ते रस्त्यावरील चिंचेच्या झाडाखाली चिंचा जमा करत होते. जवळचं सर्व अन्न संपल्यामुळे चिंचा खाऊन पोट भरायची वेळ त्यांच्यावर आली होती.
जवळपास 5क्क् किलोमीटरचा पायी प्रवास यांनी लपूनछपून केला होता. सगळे इतके घाबरलेले होते की, भुकेले असूनसुद्धा गावक:यांकडून जेवण घेण्याची हिंमत होत नव्हती. संवाद करण्याची, विचारलेल्या प्रश्नांचे नीट उत्तर देण्याची, शांत चित्ताने विचार करण्याची कुणाचीही मानसिक स्थितीच नव्हती.
या मार्गाने जाणा:या काही मजुरांनी रात्नीचा मुक्काम नवेगाव गावाच्या जवळ केला. त्यांच्या जेवणाची व्यवस्था सर्चचे कार्यकर्ते आनंदराव दुधबळे यांच्या पुढाकाराने गावक:यांनी केली. यापैकी कित्येकांची परिस्थिती चालून चालून एवढी खराब झाली होती की, जेवायला उठून बसण्याचीपण ताकद शरीरात उरली नव्हती. रस्त्यावर चालत असलेल्या भुकेल्या मजुरांना जेवणापेक्षा घरी जाणं जास्त महत्त्वाचं वाटत होतं.
***
गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो मजूर दरवर्षी मिरची तोडण्यासाठी तेलंगणा व आंध्र प्रदेशात जातात. फक्त गडचिरोली जिल्ह्यातीलच 11 हजार मजूर तेलंगणात यावर्षी गेल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. लॉकडाउनमुळे हे सगळेच मजूर तेलंगणामध्ये अडकलेले होते, ते आता हळूहळू वेगवेगळ्या मार्गाने गडचिरोली आणि चंद्रपुरात प्रवेश करत आहे. ब:याच जणांनी पायीच आपलं गाव गाठलं. तर काही जण मिरची तोडण्यातून मिळवलेले सर्व पैसे खर्च करून टेम्पो किंवा ट्रक करून गावी आले. भरउन्हात वाळलेली तिखट मिरची डोक्यावर घेऊन शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करतही अनेकजण आले.
*
गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो मजूर दरवर्षी मिरची तोडण्यासाठी तेलंगणा व आंध्र प्रदेशात जातात. फक्त गडचिरोली जिल्ह्यातीलच 11 हजार मजूर तेलंगणात यावर्षी गेल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. लॉकडाउनमुळे हे सगळेच मजूर तेलंगणामध्ये अडकलेले होते, ते आता हळूहळू वेगवेगळ्या मार्गाने गडचिरोली आणि चंद्रपुरात प्रवेश करत आहे. ब:याच जणांनी पायीच आपलं गाव गाठलं, तर काही जण मिरची तोडण्यातून मिळवलेले सर्व पैसे खर्च करून टेम्पो किंवा ट्रक करून गावी आले. भरउन्हात वाळलेली तिखट मिरची डोक्यावर घेऊन शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करतही अनेकजण आले.
तेलंगणाहून आलेल्या एका आज्जीला शाळेत वेगळं राहण्याबाबत (क्वॉरण्टाइन) काय अडचण आहे असं मी विचारलं तर ती म्हणाली, ‘कोरोनाची नाहीजी, मले यगरं यगरं (वेगळं वेगळं) राहण्याची जास्त भीती वाटते.’
या फक्त काही निवडक कहाण्या आहे. या तरुण मजुरांची, आयाबायांची काय चूक म्हणून त्यांना ही शिक्षा?
भूक, निराशा, शेकडो किलोमीटरची पायपीट, अमानवीय कष्ट आणि उष्माघाताने मृत्यू.
भारत आणि इंडिया हे दोन वेगळे देश आहेत, आणि लॉकडाउनमधला भारत हा ‘असा’ आहे. एवढंच !

 

(सतीश ‘निर्माण’ या सामाजिक  उपक्र मासोबत गडचिरोलीत काम करतो.)

 

Web Title: corona -lockdown - hundreds of young migrants from Telangana & aandhra pradesh walk home to Maharashtra- jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.