मुंबईहून चालत निघालेले शेकडो तरुण मजूर एका फोटोग्राफरला रस्त्यात भेटतात तेव्हा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 07:00 AM2020-05-07T07:00:01+5:302020-05-07T09:52:53+5:30
मुंबईहून निघालेले तरुण नाशकात भेटले. थेट उत्तर प्रदेश, बिहारमधल्या आपल्या गावी निघाले होते. बहुसंख्य चालत, काहीजण सायकलवर, क्वचित कुणाकडे दुचाकी. सगळे तरुण. वय वर्षे 20 ते फार तर 35-40. कुणासोबत बायका-मुलं. कुणीकुणी जोडपी. मुंबईत हाताला काम उरलं नाही, पोटाला अन्न नाही. आता राहून काय करणार, मग सगळ्यांचा एकच ध्यास, मुलूख जाना है!
- प्रशांत खरोटे
आपण एखाद्या हॉरर सिनेमात काम करतोय, असं वाटतं हल्ली कधी कधी.
पूर, दंगली, कुंभमेळा, निवडणुका, मोर्चे यांसह अनेक गोष्टी आजवर कव्हर केल्या. सगळीकडे माणसांचे जत्थेच्या जत्थे. आणि आता?
अवतीभोवती माणसंच नाहीत. मी नाशिकच्या मेनरोडवरून, गोदाघाटावरून जातो.
तेव्हा लांबच लांब नुसते रिकामे, सामसूम रस्ते. शहर जसं काही रिकामं झालं. रस्त्यावर चिटपाखरू नाही.
माणसं गायब. मधूनच आवाज येतो, आपल्यालाच दचकायला होतं, पहावं तर तो आपल्याच गाडीचा आवाज असतो. आपण, आपली गाडी, लांब दिसणारा रस्ता. बाकी कुणी नाही.
हॉरर सिनेमात असते तशी शांतता.
अशाच रस्त्यांवरून मी विल्होळीला पोहोचलो. मुंबईहून येणारा रस्ता जिथं नाशिक शहरात दाखल होतो, ती जागा म्हणजे ही विल्होळी.
मोठ्ठा फ्लायओव्हर. गाडय़ांची वर्दळ. त्यांचा सुसाट स्पीड हे सारं या विल्होळीच्या एण्ट्री पॉइण्टला नवीन नाही.
परवा गेलो तर तिथं अजबच दृश्य होतं. माणसंच माणसं. वारूळ फुटून मुंग्या सैरावैरा पळाव्यात तशी माणसं. डोक्यावर बोजा घेऊन रणरणत्या उन्हात निघालेली माणसं.
ती चालताहेत. चालताहेत.
त्यांच्या पायांना वेग. पायातल्या चपला पाहिल्या तर त्यांचे तळ इतके घासलेले की तापल्या डांबरांचे चटके पायांना भाजून काढत असणार. कुणी सायकलवर, कुणी एखादा मध्येच बाइकवर, त्यांच्या बाइकवर तीन-तीन, चार-चार माणसं.
बाकीचे पायीच. कुणी तरणो, कुणासोबत लेकराबाळांचं कुटुंब.
लॉकडाउनच्या काळात रिकामे, सुस्त, बेजान रस्ते पाहत मी या माणसांनी वाहत्या रस्त्यावर पोहोचलो.
थांबून थांबून फोटो काढले. आणि मग गप्पा मारायला, विचारायला सुरुवात केली की, कोण? कुठले? कुठं चालले? का चालले? कसे जाणार?
माङो प्रश्नही तेच. त्यांची उत्तरंही तीच. प्रत्येकाची कहाणी एकच, उत्तर ढोबळपणो एकच, ‘गांव जा रहे है, मुलूख!’
- मुंबईहून पायी चालत आपल्या गावी उत्तर प्रदेश, बिहारला निघालेले हे तरुण मजूर होते. कुणासोबत बायको, कुणासोबत बायका-मुलं. एकजण तर भेटला. सोबत सात महिन्यांची गरोदर बायको. तिला चालत कसं नेणार इतक्या लांब, यूपीत, अलाहाबादजवळ माझं गाव आहे म्हणाला, म्हणून याच्या त्याच्याकडे मागून, सायकलचा जुगाड केला. आता तिला सायकलवर गावी घेऊन चाललो आहे.
सात महिन्यांची गरोदर त्याची बायको. 20-21 वर्षाची तरुणी असेल. ती काहीच बोलली नाही. दमली होती, अवघडून बसली होती. तो झाडाखाली थांबून तिला पाणी देत होता. काहीतरी जे रस्त्यात मिळालं ते खात होते, जरा तरतरी आली की निघू म्हणाला पुन्हा !
ही पायी आपल्या गावाकडे निघालेली गर्दी. या गर्दीचं वय असेल सरासरी फार तर 30 वर्षे. तरुणांची संख्या जास्त. हातावरचं पोट असलेले, मुख्यत: सुतारकाम, वेल्डिंग, फॅक्ट:यांमध्ये राबणारे हे मजूर लोक. गावाकडून आले तेव्हा हातात थोडंबहुत कौशल्य असेल नसेल, मुंबईत ते कौशल्य शिकले. गवंडीकाम, सुतारकाम, यासह कंपन्यात राबू लागले.
अनेकजणांनी सांगितलं, लॉकडाउन अचानकच जाहीर झालं. कंपन्या बंद झाल्या. मालकांनी दोन आठवडे काम नव्हतं तरी पगार दिला, राहायची सोय होती, काहीजण कंपनीतच राहत होते. कुठं कुठं मालकांनीच जेवणाची सोय केली. कुठं कुठं मालक म्हणाले की, राहायची सोय करतो; पण जेवणाखाण्याचं तुमचं तुम्ही पहा. त्यांनी जोवर शक्य तोवर मदत केली, मग म्हणाले माङयाच हातात काही नाही, आता बघा तुम्ही कसं जमतंय ते ! काही काही मालकांनी मदत केली, इकडून तिकडून सायकली मिळवल्या. कुणी साठवलेल्या पैशातून विकत घेतल्या. काहींनी दोस्तांकडून जुगाड करत बाइक, टू व्हीलर मिळवल्या.
आणि ठरवलं की, आता गावी जायचं. इथं मुंबईत रहायचं नाही.
‘यहॉँ करेंगे क्या, खायेंगे क्या, उधर मुलूख में हमारे लोग है, निभा लेंगे, जैसे तैसे, बंबई तो मुसकिल है रहना !’ - एक तरुण सांगत असतो, तेव्हा बाकीचे मान डोलावतात. हा एक तरुण मुलांचा ग्रुप चालत चालत, फ्लायओव्हरवरच. सावलीत बसलेला असतो. त्याआधी नुकतंच कुणीतरी येऊन त्यांना केळी आणि पाण्याच्या बाटल्या देऊन गेलेलं असतं.
हे कुणी दिलं विचारलं तर ते सांगतात, रास्ते में लोग केलावेला, फल, पानी, कुछ खाने को दे जाते है ! बस उसीपर गुजारा है!’
हातात फार पैसे नाहीत, जेवायला रस्त्यात कुठं मिळेल अशी काही शक्यता नाही, दिवसभर चालायचं, डोक्यावर रणरणतं ऊन, पाय थकले की, सावलीचा आडोसा पाहून थांबायचं. मिळेल ते खायचं.
अनेकजणांशी बोलल्यावर लक्षात आलं की, या उन्हात सलग चालणंही शक्य नाही. किलोमीटरभर चाललं की, 10-15 मिनिटं थांबून आराम करावा लागतो. कुणा गाडीवाल्याला हात दिला तरी तो थांबत नाही, कारण त्याला आजाराची लागण होण्याची भीती वाटते. कुणी कुणी ट्रकवाले, थांबून देतातही लिफ्ट. मुंबईहून नाशिकर्पयत पोहोचायला अनेकांना तीन दिवस कुणाला चार दिवस लागले. 200 किलोमीटर साधारण अंतर. 1400-1500 किलोमीटर जायचं म्हणतात तर किती दिवस लागतील, कसे जातील, काय खातील याचा विचार करूनच पोटात गोळा येतो.
त्यात कुणीतरी पटकन पायातली चप्पल काढून दाखवतं. पूर्ण घासलेली. अनेकांनी पायाला चिंध्या बांधल्या होत्या. डांबरी सडकेवर चालून चालून पाय पोळले होते.
जौनपूरजवळच्या गावचा सुनील विश्वकर्मा या प्रवासात भेटला. त्यांचं मोठं कुटुंब. चार लहान लेकरं सोबत होती. त्यांच्याकडे दोन टू व्हीलर होत्या. दोघेजण त्या गाडय़ा चालवत होते. कुटुंबातील काही सदस्यांना 1क् किलोमीटर पुढं सोडून यायचं. बाकीचे तोवर चालतात, मग पुन्हा त्यांना घ्यायला यायचं. असं करत त्यांचा प्रवास सुरूआहे. सुनील सांगतो, ‘मुंबईत फर्निचरचं काम करायचो, आता कामच नाही, मग काय करणार, अब गाव जायेंगे!’
हे वाक्य अनेकजण सांगतात, ‘अब गाव जायेंगे!’
जास्त कुणी सांगत नाही काही, चालून दमलेली माणसं. त्यांचा आपला एकच ध्यास, अब गाव जायेंगे.
कधी पोहोचतील, कसे पोहोचतील, तब्येत साथ देईल का, असे प्रश्न आपल्याला पडतात. त्यांना नाही. त्यांचं आपलं एकच लक्ष्य, अब गाव जायेंगे.
विल्होळीपासून पुढे नाशकातल्याच आडगाव नाक्यार्पयत मी या चालत्या माणसांचे फोटो काढत, त्यांच्याशी बोलत, फिरलो.
कहाण्या ऐकून सुन्न झालो. त्यांची अवस्था पाहवत नाही. कहाणी तीच, हाताला काम, पोटाला अन्न नाही, अब गाव जायेंगे.
काहीजणांना आता कळलंही होतं की, सरकारने ट्रेन सोडल्या आहेत. त्याची आपल्याला मदत मिळू शकते.
पण कुठं पोलिसांत जा, नाव नोंदवा, तोवर कुठं रहायचं, काय खायचं, आता कुणावर अवलंबून राहायला नको, आपले आपण पायीच गेलेलं बरं असं अनेकांचं मत.
म्हणून ते आपलं बोचकं, लेकरं घेऊन सरळ चालू लागले.
एक तरुण दिसला. सायकलवर उत्तर प्रदेशात गावी निघाला होता.
हसरा. त्याच्याशी गप्पा झाल्या.
आणि पाहिलं तर, त्याच्या सायकलवर मानानं तिरंगा लावलेला होता.
देशानं आपल्याला काय दिलं याचा हिशेब न मांडता, हा तिरंगाच आपली ताकद म्हणत हा तरुण सायकलचं पायडल मारून निघूनही गेला.
ही माणसं सुखरूप आपापल्या घरी पोहचू देत, या सदिच्छांपलीकडे आपण तरी त्यांना काय देऊ शकणार, असं वाटून गेलंच.
...आता थांबणार नाही!
सात महिने गरोदर बायको सायकलवर डबल सीट घेऊन निघालेल्या तरुणाला म्हटलं, चल, मी तुझी कुठं तरी निवारा केंद्रात सोय करतो, असं कसं जाशील. हे धोक्याचं आहे.
पण त्याचं आपलं एकच, आता थांबणार नाही. अब गाव जायेंगे. त्याची बायको काहीच बोलली नाही. तो मात्र आता कुठंच थांबायच्या तयारीत नव्हता, इतका कासावीस होता की, जे होईल ते होईल आता गावीच जाऊ म्हणत होता.
आता चिडून काय उपयोग, आपलं आपण पाहू !
कुणी पुलाखाली, कुणी कुठं ढाब्याच्या बाजूला, कुणी कुठल्या ओटय़ावर रात्र काढतात. रात्री उशिरार्पयत चालतात, पहाटे लवकर सुरुवात करतात. खायला मिळतं, वाटेत कुठंतरी, कोणीतरी येतंच. नाशकात गोदावरीला पाणी पाहिल्यावर अनेकांनी आंघोळी उरकून, कपडे धुवून घेतले. जरा आराम केला.
काहीजण त्रगा करतात, सरकारला कचकचून शिव्या घालतात. आमची सोय नाही केली म्हणून चिडतात. काही शांतपणो चालत राहतात. म्हणतात, आता काय बोलून उपयोग. आपण आपलं पहायचं, आपल्याला कुणी वाली नाही.
नाशकात अनेक संस्था या मजुरांना जेवणाची पाकिटं देतात. काहीजण रोज हायवेवर पाण्याचे माठ भरून ठेवतात. जो जे जमेल ते करतोय, चालणं सुरूच आहे..
(प्रशांत लोकमतच्या नाशिक आवृत्तीत फोटोग्राफर आहे.)