कोरोना काळात कसे जगताहेत धारावी रॅपर्स?
By Meghana.dhoke | Updated: May 14, 2020 14:06 IST2020-05-14T11:30:32+5:302020-05-14T14:06:34+5:30
धारावीतले रॅपर्स, हिपहॉपर्स, बिट बॉक्सर्स, बी बॉयर्स.. धारावी त्यांचा श्वास. ते म्हणतातही, मेरे हूड जैसा कुछ नहीं. पण आता कोरोनाने नुसतं त्यांचं जगणं लॉकडाऊन केलं नाही तर काहींचे शब्दही गोठलेत. काहीजण तर सोशल मीडियातून आपल्या कलेतून पैसा उभारत आजूबाजूला जेवणाचे पुडे वाटताहेत. काही विचारताहेत सवाल की, मजदुरांच्या भुकेचा काय विचार केलाय तुम्ही? आणि काही मात्र धारावी डिस्टन्सिंग करत दूर निघून गेले संकटकाळात..

कोरोना काळात कसे जगताहेत धारावी रॅपर्स?
-मेघना ढोके
जिनको धारावी रॅपसे पैसे बनाने थें, वो तो निकल लिए, बचे वो जिनकी जिंदगी है यहॉँ, गलीमें भी, हिपहॉपमें में भी. वो तो यहीं है ना अपने हूड में.
तो बस ये सिन है, और क्या?
-आकाश व्हॉट्स अँप व्हिडीओ कॉलवर बोलत असतो. दाखवत असतो त्या छोटय़ा उपकरणातून धारावी.
त्याच सगळ्या गल्ल्या ज्या मी गेल्याच वर्षी लोकमत दीपोत्सवसाठी रॅपर्सवर लेख लिहायचा म्हणून हिंडले होते. गल्लीबोळ. कामराज हायस्कूल आणि माटुंगा लेबर कॅम्प हे दोन रॅपर्सचे अड्डे आणि त्यांना जोडणाऱ्या बारीक, निमुळत्या, चिंचोळ्या गल्ल्या.
भरपावसात ही सगळी धारावी स्वच्छ होती. गल्लीतून चालताना घरात डोकावलं तरी चकचकीत भांडे, नीट रचलेलं सामान, वितभर मोकळी जागा सहज दिसायची. स्वयंपाकाचे, भाज्यांचे, पदार्थाचे मराठी, तमिळी, कानडी, बंगाली, यूपीबिहारी गंध सहज ओळखू यावेत इतक्या त्या गल्ल्या रसरशीत जिवंत.
आणि त्यावर कडी करणारी या रॅपर्स/हिपहॉपर्सच्या चुरचुरीत शब्दांची फोडणी. ठसका लागावा असे शब्द, सणकन दिसावं असं तिथल्या जगण्याचं वास्तव सांगणारे हे तरुण रॅपर्स, त्यांची गोष्ट ‘मुंबई -17’ लोकमत दीपोत्सवने प्रसिद्ध केली.
त्याकाळात झालेली या तरुण रॅपर्सची दोस्ती कायम राहिली. त्यांच्या अंडर ग्राउण्ड सायफरची आमंत्रणं येत राहिली. व्हॉट्स अँपवर ‘क्या सिन है आजकल?’ असं सहज विचारणारे ख्यालीखुशालीचे मेसेज हे रॅपर्स दोस्त करत.
आता कोरोना कोंडीत धारावी होरपळते आहे. एकतर उन्हाचा तडाखा. प्रचंड उष्मा. त्यात इटुकली घरं, त्यात एकावेळी उभं राहता येणार नाही घरातल्या सगळ्या माणसांना एवढीच मोकळी जागा. तिथं सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटाइज करून जगण्याच्या गप्पा कुणाला पचल्या असतील?
धारावीत कोरोनाचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात वाढतो आहे. माणसांच्या हातचं काम गेलं. अखंड काम करणारी धारावी लॉकडाउनमध्ये ठप्पं झाली. हातावरचं पोट असणाऱ्या माणसांच्या जगण्याचे, जेवण्याखाण्याचे प्रश्न निर्माण झाले..
त्याची चर्चाही माध्यमांत झाली.
जेवणाची पार्सलं धारावीत पोहोचूही लागली. धारावीतली माणसं तशी एकमेकांना धरून मग सगळ्यांनी एकत्रं येऊन रांधणं खाणंही कुठं कुठं सुरू झालं..
मला आठवतंय, मी धारावीत जुलै-ऑगस्ट 2019च्या दरम्यान फिरत होते, सतत जात होते, तेव्हा रॅपर्स मुलंच नाही तर कुणीही सहज सांगायचं, ‘ पैसा कमाना धारावी में मुश्किल नहीं, पैसा चाहिए - एक दिन काम करो, पाचसौका हरा नोट युं कमा लेगा कोई भी.!’
आपल्या अंगात धमक आहे, कष्ट करायची तयारी आहे तर धारावी आपल्याला उपाशी मारत नाही, हे इथल्या तरुण मुलांना पक्कं माहिती. पैसा पोटाला हवा नाहीतर चंगळीला, आठवडाभर राबलं तर पैसा हातात यायचा.
लॉकडाऊननंही पैसे कमावण्याची संधीच संपवली. सगळं बंद.
- धारावीतल्या माणसांचं लॉकडाऊननं काय केलं याच्या भयाण कथा माध्यमांत प्रसिद्ध झाला.
मात्र ज्या रॅपर्सना आपल्या धारावीचा अर्थात त्यांच्याच भाषेत मुंबई-17चा पराकोटीचा अभिमान आहे, त्या रॅपर्सचं काय झालं?
कोरोना काळात त्यांच्या रॅपनं त्यांना जगवलं, इतरांना जगवलं की गोठून गेले शब्द?
हेच प्रश्न मी आकाश धनगरला विचारले तर तो सांगतो, ज्यांचं हिपहॉप आणि धारावीवर खरं प्रेम होतं, ते अंडर ग्राउण्डवाले राबताहेत इथंच, बाकीचे अप्पर सर्कलवाले पळाले, अब बाहर जाकर धारावी को कण्टेण्ट बन के बेचेंगे.!’
हे सांगण्यापूर्वी आकाश स्वत:ला धारावीत जाऊन 500फुड पॅक्स वाटू न आलेला असतो. तो आणि त्याचा भाऊ हिपहॉपर आहेत. स्लमगॉड नावाचा त्यांचा ग्रुप आहे. हिपहॉप करतात, पैसा नाही मिळाला तरी चालेल; पण कलेला गालबोट लागता कामा नये म्हणत आकाश धारावीतल्या मुलांना हिपहॉप शिकवतो. पोट भरायचं तर धारावी टुअर्स करवतो. सध्या इन्स्टाग्रामवर त्यांनी आपल्या हिपहॉपचे व्हिडीओ टाकलेत. लोकांना आवाहन केलं की, आम्हाला पैसे द्या, ग्राउण्ड लॉजिस्टिक्स आम्ही सांभाळतो, अन्न आम्ही शिजवून वाटतो. त्यातून काही पैसे देशातून नाहीतर परदेशातूनही उभे राहिले. आकाश आता स्वत: ते सारं सांभाळत वाटतो अन्न. त्याचंही घर छोटंच. दोन खोल्यांचं. घरात भावासह एकत्र कुटुंब, लहान मुलं. हा घरात कुणाला जवळ घेत नाही. जेव्हा खूपच एकेकटं वाटतं, तेव्हा हिपहॉप करतो, नाचतो, हरवून टाकतो स्वत:ला.
आकाश सांगतो, ‘ करायचं काय, माझ्या घराशेजारच्या खोलीत शेपन्नास लोक अजून जुगार खेळत आहेत. त्यांना संसर्गाची भीती कळत नाही, त्यांना कसलंच भान नाही. त्यांच्या हाताला काम नाही. घर म्हणावं तर त्यांन त्यात राहायची सवयही नाही. माझ्याच मुहल्ल्यात दोन लोक पॉझिटिव्ह सापडले; पण लोकांना काहीही वाटत नाही. वाटणार कसं, कोरोना झाला तर, ही भीती नंतरची, आज-आत्ता पोटात भूक मोठी आहे!’
ती भूक आकाशला दिसते, छळते, त्यासाठी तो मदत उभी करतो. आपल्या हिपहॉपचे फोटो-व्हिडीओ टाकतो, त्यावर कळकळीनं सांगतो की मदत करा.
धारावीत सामाजिक संस्था अर्थात एनजीओंना एरव्ही पूर आलेला असतो. अनेक रॅपर्स या संस्थांना धरून राहतात. कारण त्यांच्याकडे पैसा आणि शोज असतात. आता धारावी संकटात असताना अनेक संस्थांनी आपला गाशा गुंडाळला, महिला बालकल्याण, बालपोषण याविषयावर काम करतोय असं दाखवणा:या अनेक संस्था पसार झाल्या. धारावीत तरुणांसाठी काम करतोय असं म्हणणाऱ्याही अनेक संस्था गायब झाल्या. त्यांचं काम काही काळ थांबलं असं म्हणता येईल; पण ज्यांच्या हाती थोडाबहुत पैसा आला असे रॅपर्सही आता धारावीच्या बाहेर आहेत.
काही रॅपर्स ऑनलाइन संवेदना व्यक्त करताना दिसलेही मात्र त्यांच्याशी संपर्क केला तर अनेकजण आधी आपला मॅनेजर, पीआरवाला यांच्याशी बोला म्हणतात.
अनेकजण तर घाबरतात की, आपण काही भूमिका घेऊन बोललो तर त्याचा आपल्या करिअरवर तर नाही काही परिणाम होणार. या काळात त्यांनी स्वत: ‘धारावी डिस्टन्सिंग’ पाळलं आहे. ते चकार शब्द बोलायला तयार नाहीत. काही सूचलं का, रॅप लिहिलं का असं विचारलं तर त्यांच्याकडे उत्तरच नाही.
मानस धिवर सारखे काहीजण मात्र अस्वस्थ.
मानसचा एम टाउन ब्रेकर्स नावाचा ग्रुप आहे. धारावीतले सगळे लहानगे रॅपर्स मानसच्या हाताखालून जातात इतका त्याचा माटुंगा लेबर कॅम्प परिसरात होल्ड आहे.
मानस चारचारदा सांगतो, ‘बहौत खराब सिन है इधर, लोग बाहर घुमते है, खाने को मिल जाता है, पर घर में कैसे बैठेंगे, घर किधर है इधर, और आदत भी नहीं घर में बैठने की.!’
मग थांबतो क्षणभर. हसतो.
मग म्हणतो, ‘सारें एकसाथ एक दुसरे के सर पर बैठेंगे क्या?’
तो आणि त्याचा रॅपर दोस्त प्रथमेश त्यांनी एक रॅप सॉँग तयार केलंय. ते जनजागृतीपर, मात्र त्यात ते सवाल करतात की, ‘उन मजदुरोंका क्या जिनके अनाज नहीं पेट में?’
ते गाणं ते म्हणून दाखवतात; पण त्या कलकलाटात त्यांच्या रॅपकडे कुणी लक्ष देत नाहीत. ही मुलं मात्र आपला सगळा संताप त्या गाण्यात उतरवतात.
आणि सवाल करतात सा:या मुंबईलाच की, मेरे हूड का ये हाल किया किसने, बोल?’
पासपोर्टवाल्यांनी आणलेला हा आजार मजुरांच्या पोटात भूकेचा खड्डा पाडतोय, श्रीमंत मुंबईकर आपल्या घरांत सुखात आहेत आणि धारावीत मात्र गर्दीत माणसांचा जीव घेतोय कोरोना असं सांगत अनेकजण संतापाची आग ओकतात. जळजळीत शब्दांत आपला संताप मांडतात.
धारावीतला सगळ्यात लोकप्रिय तरुण मुलांचा गट म्हणजे सेवन बंटाईत.
ही मुलं एका 8 बाय 10 च्या खोलीत राहतात. तिथंच शिजवून खातात. तिथं त्यांनी छोटा स्टुडिओ सेटअप लावला आहे.
तिथंच लिहितात, कंपोज करतात. आताही ते जगभरातलं रॅप ऐकतात तिथं बसून, काही गाणी कंपोज करतात. अलीकडेच त्यांचं एक मारवाडी कोरोना रॅप गाजलं. त्याचं अन्य भाषेत ते भाषांतर करणार आहेत.
सेवन बंटाईतचा डेव्हीड सांगतो, ‘सच पुछो तो पता ही नहीं चल रहा क्या करे, लोग भूके है, काम नहीं, बाहर निकलो तो पुलीस मारती है, लगता है, क्या करेंगे तो अपने रॅप का इनको कुछ यूज होगा. होगा भी की नही.!?’
धारावीतला सगळ्यात मोठा ग्रुप डेपोडलाइज. त्यांचा म्होरक्या टोनी, त्यांचंही म्हणणं हेच की, असं घरातलं कोंडलेपण कधी पाहिलं नव्हतं, धारावीत सारं जगणंच खुलं. आता या बांधून घातलेल्या जगण्यात काय हाताला लागेल हेच कळत नाही.!’
- कलेचं काय होईल, ते कळेल तेव्हा कळेल.
पण आकाश, विकी यांच्यासारखे अनेक रॅपर्स आता आपली कला दाखवून, त्यातून पैसे उभे करूलागलेत..
ज्यांचं आपल्या कलेवर प्रेम ते माणसं जगावीत म्हणून आता ती वापरू म्हणताहेत.
ज्यांचं कलेतून मिळणाऱ्या चमकधमकवर प्रेम होतं, ते केव्हाच पांगलेत.
धारावी रॅपर्सची ही मुंबई 17 गोष्ट कोरोनानं अशी भयंकर उघडीनागडी करून ठेवली आहे.
जगण्यासाठी कला की कलेसाठी जगणं. हा संघर्ष असा भलतंच वळण घेऊन इथं उभा आहे..
(लेखिका लोकमत वृत्तसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.)
meghana.dhoke@lokmat.com