देशातला एकूण आनंद मोजतात ?
By admin | Published: June 1, 2017 11:11 AM2017-06-01T11:11:49+5:302017-06-01T11:11:49+5:30
भूतान नावाच्या चिमुकल्या देशाला ते जास्त महत्त्वाचं वाटलं. त्यांनी आनंद मोजायला सुरुवात केली
Next
>- प्रज्ञा शिदोरे
जगातल्या सर्व देशांचे मूल्यांकन त्याच्या जीडीपी. अर्थात ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादन या संज्ञेत मोजलं जातं हे तर आपण शाळा-कॉलेजांत शिकतोच. एखाद्या देशाचा जीडीपी वाढल्याने त्या देशाच्या नागरिकांचे राहणीमान उंचावते म्हणतात. ते जगानं मान्य केलंय. पण त्या देशातल्या माणसांच्या आनंदाचं काय? त्यांच्या आनंदात वाढ होते का? आनंदी असणं हे पैशावर कितपत अवलंबून आहे? आनंदाचं मोजमाप करता येतं का? हे प्रश्न आहेतच, मात्र भूतान नावाच्या चिमुकल्या देशाला ते जास्त महत्त्वाचं वाटलं. त्यांनी आनंद मोजायला सुरुवात केली. २००५ साली भूतानमध्ये ‘ग्रॉस नॅशनल हॅपिनेस कमिशन’ची स्थापना करण्यात आली. या संस्थेचा पाया ४ सूत्रांवर अवलंबून आहे. ही सूत्रे ध्यानात घेऊनच मग पंचवार्षिक योजना, धोरणं, कायदे इ. ठरवले जातात. त्यातून जन्माला आला ग्रॉस हॅपिनेस इंडेक्स. जगभरातील राष्ट्रांनी या संकल्पनेकडे उत्सुकतेनं पाहिलं. या संस्थेने २०१० साली भूतानचा ग्रॉस हॅपिनेस इंडेक्स बनवून काही निकष त्यासाठी लावले. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य, वेळेचा उपयोग, आपल्या संस्कृतीबद्दलची जाण आणि आस्था, राहणीमान, शिक्षण, सामाजिक सुरक्षितता, निसर्ग जोपासायची वृत्ती इ. या तपासणीतून प्रशासनाला आपल्याच नागरिकांची नव्यानं ओळख झाली. लोकांना काय हवं आहे, ते समाधानी आहेत का, त्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत, या प्रश्नांची उत्तरं मिळत गेली. जगाच्या श्रीमंतांच्या यादीत भूतानचा क्र मांक काहीही असो; नागरिकांनी आनंदी असणं भूतानसाठी जास्त महत्त्वाचं आहे. कारण आनंदी माणूस काम चांगलं करतो आणि आपोआपच तो देश समृद्ध होतो असं ते मानतात. अधिक माहितीसाठी हे संकेतस्थळ पाहा आणि ठरवा देश म्हणून आपण आनंदी आहोत का?
वाचा- http://www.gnhc.gov.bt/
http://www.grossnationalhappiness.com/