दोस्तीचे गुन्हेगार
By Admin | Published: December 3, 2015 10:19 PM2015-12-03T22:19:46+5:302015-12-03T22:19:46+5:30
ज्यांनी दोस्तीत विश्वासघात सहन केला, आपल्या आयुष्याची वाताहात करून घेतली अशा मित्रांनी पुढच्यास ठेच, मागचा शहाणा म्हणत सांगितलेल्या या ५ गोष्टी.
ज्यांनी दोस्तीत विश्वासघात सहन केला, आपल्या आयुष्याची वाताहात करून घेतली अशा मित्रांनी पुढच्यास ठेच, मागचा शहाणा म्हणत सांगितलेल्या या ५ गोष्टी. ‘आॅक्सिजन’च्या वाचक चर्चेत सहभागी झालेले तरुण दोस्त म्हणताहेत, आम्ही चुकलो, पण तुम्ही सांभाळा! ‘दोस्तीचे गुन्हेगार’ हा ‘आॅक्सिजन’ (३० आॅक्टोबर) मधला लेख वाचून अनेक मित्रमैत्रिणींनी आपले अनुभव लिहून पाठवले. अर्थात मुलींपेक्षा मुलांची पत्रं कितीतरी जास्त. सारी एकच कथा सांगणारी! मित्रांनी आपल्याला कसं फसवलं, याच्या त्या कहाण्या. कारणं अनेक, कहाण्या अनेक, अनुभव अनेक पण तरीही त्यात एक सूत्र दिसतं. आपण ज्यांना मित्र समजून ज्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकत होतो, त्या मित्रांनीच विश्वासघात केल्याचं दु:ख तर होतंच, पण अनेकांच्या पत्रात वेदना होत्या. आपल्या आयुष्यातली अनेक महत्त्वाची वर्षे वाया गेल्याची, आणि त्यापायी स्वत:च्या जगण्याची वाताहात करून घेण्याची! त्या साऱ्या कहाण्या शांतपणे वाचल्या तर मित्रांनी आपल्याला का फसवलं किंवा आपण का फसत गेलो, याची काही कारणं या तरुण मुलांनीच सांगितलेली दिसतात. तीच ही ठळक कारणं.. अशा ५ गोष्टी, ज्या पुढच्यास ठेच, मागचा शहाणा असं समजून लक्षात ठेवायला हव्यात.. १) व्यसनांचा आग्रह वाईट संगतीला लागून आपले हाल झाले, असं कबूल करणाऱ्या सगळ्या मित्रांनी लिहिलं आहे की, व्यसन हा सगळ्यात मोठा आणि पहिला शत्रू ठरला. ‘घे रे सिगारेट, काही होत नाही’ असं म्हणत झालेली सुरुवात मग दारू आणि काहींच्या संदर्भात तर पार ड्रग्जपर्यंत पोहचली. आणि मग त्यासाठी पैसे हवेत म्हणून घरातली चोऱ्यामाऱ्यांना सुरुवात झाली. आपले मित्र आपल्याला व्यसनांच्या नादी लावून आपलं नुकसान करताहेत, भरीस घालून आपल्याला नको त्या गोष्टींची सवय लावताहेत हे त्यावेळी लक्षातही आलं नाही. आणि दोस्तीत व्यसन आणून सगळ्याच गोष्टी हाताबाहेर जात राहिल्या, जात राहतात. २) मुलींची छेड आणि प्रेम प्रकरण विशेषत: कॉलेजात जाणाऱ्या तरुणांनी हे लिहिलंय की, तरुणींना छेडणं, नाक्यावर उभं राहणं, पाठलाग करणं यासाऱ्याला तरुण दोस्त अनेकदा डेअरिंग म्हणतात आणि ते डेअरिंग करायला भाग पाडतात. त्यातून मग मारामाऱ्या सुरू होतात. गोष्टी विकोपाला जातात. ३) फक्त थ्रीलसाठी अनेक तरुण मुलांनी लिहिलं आहे की, पैसा होता आमच्याकडे पण लाइफमधे काही थ्रील नव्हतं. त्या थ्रीलसाठी मग बाइक उचलणं, त्या दामटून कुठं तरी सोडून देणं असे प्रकार आम्ही दोस्तांनी सुरू केले. त्यातून आलेला पैसा व्यसनात गेला की मग घरातही चोऱ्या केल्या. त्या साऱ्यात थ्रील वाटू लागलं आणि आपल्याला कुणी पकडू शकत नाही, असा कॉन्फिडन्स वाढला. ४) एकटेपणा आणि घरातली शिस्त खरं तर हे कारण जरा विचित्र वाटेल, पण अनेक पत्रात मुलांनी लिहिलंय की घरात शिस्त फार. त्यात आई-बाबांना वेळ नाही. त्यांना काही सांगायला गेलं की ते लगेच भांडायला लागतात नाही तर लेक्चर तरी देतात. त्यातून एकटेपणा वाढलेला. अशावेळी दोस्तच सर्वस्व वाटतात. ते म्हणतील ते खरं आणि तेच करावंसं वाटतं. हे दोस्त तुटले तर आपलं कुणीच नाही, नसेल याची भीती वाटते. आणि मग त्यातूनच ते दोस्त जपण्यासाठी ते म्हणतील ते करायला सुरुवात होते. ५) मित्रांवर विश्वास हे खरं तर सगळ्यात मोठ पण इमोशनल कारण! दोस्तांवर विश्वास तर असतोच पण त्यांच्या विषयी प्रेम असते. आपल्या दोस्तांइतकं आपल्याला कुणी ओळखत नाही, त्यांच्या इतका आपला विचार कुणीच करू शकत नाही, अशी एक खात्री असते. त्या विश्वासापोटी मित्रांच्या भानगडीत त्यांना मदत केली जाते. त्यांच्या चुका लपवल्या जातात. आणि कधी ना कधी ते सुधारतील असं वाटून त्यांची संगत कायम ठेवली जाते. आपण केलं काहीच नाही पण त्या मित्रांच्या चुकांनी आपला घात केला, असं पत्रात अनेकांनी लिहिलंय ते त्यातल्या भयाण कहाण्यांसह! हे सारं वाचून ज्यानं त्यानं ठरवायचं की, आपले मित्र हे खरंच मित्र आहेत की, आपल्याला फसवत दोस्तीचे गुन्हेगार ठरताहेत? - आॅक्सिजन टीम