क्रॉसिंग लिमिट्स
By admin | Published: February 22, 2017 03:07 PM2017-02-22T15:07:13+5:302017-02-22T15:08:54+5:30
जगभरातलं गाणं तिला हाका मारतं,गजल आवडतात तितकंच कर्नाटकी संगीतही, पॉप-जॅझ आवडतं तसं फ्युजनही. त्या फ्युजनमध्येच अनेक प्रयोग करणाऱ्या तरुण गायिकेशी खास गप्पा...
रिवा राठोड.
ती गाते छानच, उत्तम पियानोवादक आणि संगीतकारही आहे. ब्रायन अॅडम्ससारख्या आंतरराष्ट्रीय कलाकारासोबतची कॉन्सर्टते आता गुलजारांच्या कवितांचा तिनं गायलेला अल्बम या साऱ्याविषयी तिच्याशी या गप्पा...
गायनाचे सारे प्रकार आपल्याला यावेत,नवनव्या संगीतातली जादू कळावी म्हणून प्रयत्न करणारी एक तरुण कलाकार.
अत्यंत उत्साही. चिअरफुल. नव्या दमाची गायिका. सुप्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड आणि सुनाली राठोड यांची ही लेक.
तिला भेटा, तिचा उत्साह आणि एनर्जी तिच्याशी बोलताना जाणवत राहते. ती गाण्याविषयी बोलते तितकीच समरसून जगण्याविषयी, कलेतल्या विविध प्रयोगांविषयी, फ्युजनविषयी बोलते.
तानपुरा, पियानो आणि तबला या आवडीच्या गोष्टी तिच्या आजूबाजूस सतत असतात. सतत संगीतकार - गायकांचं येणं जाणं, तिचे डॅडी रूपकुमार राठोडांच्या आवाजातील गाणी किंवा रियाजाच्या आवाजामुळे तिच्या घरात सुरांचं वातावरण कायम भरून राहिलेलं असावं, असं वाटतं.
भारतात आणि इंग्लंडमध्ये तिनं शिक्षण घेतलं. मात्र गाणं तिच्यासोबत तेव्हाही चालत होतं; पण नेहमीच्या वाटेनं न जाता तिनं जसं कर्नाटकी संगीत शिकायचं ठरवलं तसंच पहिलावहिला कार्यक्रमही तिनं केला तोच इंटरनॅशनल फेमस गायकासोबत..
२०११ मध्ये पुण्यात ब्रायन अॅडम्सची मैफल होती. तरुण जगात केवढं त्याचं नाव. त्याच्या कॉन्सर्टचं ओपनिंग सॉँग गायचा मान रीवाला मिळाला. तिथून तिनं जी सुरुवात केली ती आपल्या गाण्यात अनेक वेगवेगळे प्रयोग करत. ती नुस्तं गात नाही तर संगीतही करते.
‘आॅन रुट गणेशा’ हे तिचं गाणं तरुणांच्या जगात अत्यंत नावाजलं गेलं. त्याची रचना, संगीत, गायन हे सगळं तिनं एकटीनं केलं. २०१४ मध्ये तिने ट्रेसेस आॅफ सँडलवूड या इंडो-स्पॅनिश सिनेमासाठी गाणंही गायलं.
ती सांगतेच, ‘मला भाषा आणि देशाच्या मर्यादा मान्य नाहीत. कलेला कोणतीही कुंपणं असू नयेत.’
म्हणूनच पॉप, जॅझपासून गझलपर्यंत सर्व गाण्यांमध्ये ती प्रयोग करते. फ्युजन हा तर तिच्या विशेष आवडीचा प्रकार आहे. गाण्याबरोबर पेंटिंग, हॉर्स रायडिंग, कुकिंगचीही तिला विशेष आवड आहे.
पण सगळ्यात जास्त आवडतात ते तिनं पाळलेले श्वान.आपल्या दोन आवडत्या कुत्र्यांबरोबर वेळ घालवणं हा तर तिचा आवडता छंद. तिची आई सुनालीला कुत्रा पाळणं आवडत नसलं तरी ती आता तिसरा कुत्रा घरी आणण्याच्या बेतात आहे.
आईबाबा म्हणजे सुनाली आणि रूपकुमार यांच्याशी तिची खासी दोस्ती आहे. ते तिचे गुरु तर आहेच; पण मित्रही आहेत. मै हँग आउटभी मम्मीडॅडी के साथ करती हूँ असं रीवा गंमतीने म्हणते तेव्हाही या नात्यातले खास बंध ती सांगत असते.
रिवाचा एक नवाकोरा अल्बम लवकरच येतो. गुलजारांच्या कवितांचं ती गाणं करतेय..
तुझे आजोबा चतुर्भुज राठोड, वडील रुपकुमार राठोड आणि आई यांचं गाणं घरात होतंच. मात्र घरातले वडीलधारे आदित्य घराण्याचे गायक असूनही तू कर्नाटकी संगीत शिकण्याचा निर्णय घेतलास, तो कसा?
सुरुवातीपासूनच मला फ्युजनचं वेड आहे. हिंदुस्थानी संगीत आमच्या घरी पिढीजात सुरू आहेच; पण कर्नाटकी संगीताची लय मला आवडली. त्याचा फायदा फ्युजनला होईल असं मला वाटलं. त्यामुळे मी कर्नाटकी संगीत शिकण्याचा निर्णय घेतला. माझ्या डॅडींनीही मला कर्नाटकी संगीत शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यामुळे आता मी कोणत्याही कलाकाराबरोबर गाऊ शकते. कोणत्याही वादकाबरोबर, संगीतकाराबरोबर सहजपणे मिसळून काम करण्याचा विश्वास कर्नाटकी शिकल्यामुळे मला मिळाला. आता मी बनारस घराण्याचे गायक राजन आणि साजन मिश्रा यांच्याकडे शिकतेय. कर्नाटकी संगीताचा अभ्यास भरपूर केला होता, त्यामुळे अचानक राजन-साजन यांच्याकडे शिकणं थोडं कष्टप्रद होतं. पण ते ही रियाजामुळे सोपं होत गेलं. आमचं गुरुकुल डेहराडूनला आहे, त्यामुळे मी शिकण्यासाठी डेहराडून आणि दिल्लीला जाते.
तुमच्या राठोड घराण्यामध्ये मोठमोठे गायक आणि संगीतकार आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्यालाही संगीतक्षेत्रात जायचे आहे असे तुला केव्हा वाटू लागले?
मी वयाच्या चौथ्या वर्षापासूनच गाण्याला सुरुवात केली. तेजपाल हॉलमध्ये मी ‘पायोजी मैने रामरतन धन पायो’ म्हटलं होतं. कदाचित लहानपणापासूनच गाण्याची बीजं माझ्यामध्ये नकळत रोवली गेली होती. घरामध्ये आई-बाबांचा पाठिंबा होताच पण मला अगदी पूर्वीपासून आतून संगीताची ओढ होती असं वाटतं.
पण तरी ठरवलं कसं, की आपण काहीतरी वेगळं करू...?
जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं संगीत भरपूर आहे. आपण एकाच प्रकारामध्ये अडकून राहिलो तर बाकी संगीताचा आनंद कसा घेणार असं मला वाटलं. म्हणून मग भाषा हा अडथळा न मानता मी त्याकडे संधी म्हणून पाहिलं. एकाच प्रकारात तुम्ही अडकून राहिलात तर संधी कमी होतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर जायचं असेल तर इतर प्रकारच्या संगीताचा अभ्यास केला पाहिजे असं माझं मत होतं. मी लहानपणापासून शांती सैगल यांच्याकडे पियानो शिकायला सुरुवात केली. केवळ आवड म्हणून संगीताकडे न पाहता शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यास सुरुवात केली. ट्रेसेस आॅफ सँडलवूड या इंडो-स्पॅनिश सिनेमासाठी आवाज दिला आहे.
घरात गाणं आहे म्हणजे रियाजही असेलच, त्या रियाजाची शिस्त कशी आहे?
माझे पहिले गुरू माझे डॅडीच. रियाज आणि एकूणच गाण्याबाबत ते भरपूर आग्रही आहेत. त्यामध्ये जराही तडजोड झालेली त्यांना खपत नाही. रियाजानंतर रोजच ते मला मार्गदर्शन करतात. आजकाल एखाद्या शो मध्ये मुलं चमकून जातात, ते चांगलं गातातही पण कदाचित एका रात्रीत मिळणाऱ्या प्रसिद्धिझोतमुळे रियाज मागे पडू शकतो. प्रसिद्धी आणि स्वत:चं नाव तयार करण्याच्या धडपडीत रियाजाशी तडजोड होता कामा नये असं मला वाटतं. त्यामुळेच मी रिअॅलिटी शोमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला. दीर्घकाळ तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात राहायचं असेल तर रियाजाला पर्याय नाही. त्यामुळे डॅडींकडे मी रोलमॉडेल म्हणून पाहते. प्रत्येक गाणं ते एकदम परफेक्ट गातात. प्रत्येक गाण्यामागे त्यांचा स्वत:चाही विचार असतो. त्यांचं गाणं ऐकताना जराही इकडं-तिकडं झालेलं दिसत नाही. दुसऱ्या कवीने लिहिलेलं आणि संगीतकाराने संगीत दिलेलं गाणं आपलं करून गाण्याची त्यांची हातोटीच या परिपूर्ण गायनामागे असावी. त्यामुळे कोणतंही गाणं त्यांचंच होऊन जातं. त्यांच्याप्रमाणे माझे गुरुजीही मला प्रत्येक सूर अनुभवून गायला सांगतात. प्रत्येक सूर तुम्हाला डोळ्यासमोर दिसले पाहिजे. इथं हा सूर आहे तिथं हा सूर आहे असे डोळ्यांसमोर मांडून त्यांना खूश करता आलं पाहिजे असं त्यांचं मत आहे. असं मनापासून गायल्यामुळे मग गायन ही यांत्रिक पद्धत न राहता तो एक आनंददायी प्रवास होऊन जातो.
तुझं आॅन रूट गणेशा खूप गाजलं, तो अनुभव कसा होता?
आॅन रूट गणेशाची रचना, संगीत, गायन हे सगळं मी एकटीनं केलं. एक चांगलं गाणं निर्माण करायचं एवढाच त्यावेळेस उद्देश होता. त्यामुळे ते केलं आणि यू ट्यूबवर अपलोड केलं. पण ते गाणं कसंकाय माहिती नाही पण पॅरिसमध्ये बुद्धा बारच्या संयोजकांच्या नजरेस पडलं आणि त्यांना ते फार आवडलं आणि त्यांनी त्या गाण्याची निवड अल्बमसाठी केली. माझ्यासाठी हा एकदम सुखद धक्का होता. बुद्धा बारच्या संगीत मालिका मी यू ट्यूबवर भरपूर ऐकल्या होत्या. त्यापासून नेहमी मला प्रेरणा मिळायची. आपणही आंतरराष्ट्रीय पातळीवर काही करावं असं वाटायचं. पण आॅन रूटची निवड त्यांनी केली तेव्हा ते स्वप्न पूर्ण झालं असं वाटलं.
तुझं शिक्षण केंब्रिजमध्ये झालं. आंतरराष्ट्रीय कलाकारांबरोबर तू काम करतेस इतकंच नव्हे तर तुझा पहिला शो ब्रायन अॅडम्सबरोबर होता, या कलाकारांचे कोणते विशेष गुण भारतीय कलाकारांनी घेतले पाहिजे असं तुला वाटतं?
माझा पहिला शो ब्रायन अॅडम्सबरोबर पुण्यात झाला. तेव्हा मी क्रॉसिंग लिमिट्स हे गाणं म्हटलं होतं आणि त्यावर नृत्यही केलं होतं. या पाश्चिमात्य कलाकारांच्या बाबत बोलायचं झालं तर त्यांचा महत्त्वाचा गुण मला दिसतो तो प्रोफेशनालिजम. एखादा शो करायचा झाला तर प्रकाशयोजना, आवाज यंत्रणा यांची ते व्यवस्थित तयारी करतात. कार्यक्रमाची तालीम वेळेत करतात, जणू खराखुरा कार्यक्रम करत आहोत अशा भावनेने ते तालमी करतात. मी मायकल जॅक्सनची पण चाहती आहे. असं ऐकलंय की मायकल जॅक्सनसारखा कलावंत कार्यक्रमाच्या दिवशी घालायचे कपडे घालून तालमी करायचा. एवढं अचूक काम करणं त्यामुळेच शक्य होत असावं. ब्रायनसारखे कलाकार कार्यक्रमात स्टेजवर इथून चालत जायचं, या गाण्याच्या वेळेत तिकडे चालत जायचं याचा सगळा विचार करतात आणि तालमीमध्ये त्याचा सराव करतात. प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी तालीम घेणं हे त्यांचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. दहा कार्यक्रम झाले आता अकराव्या कार्यक्रमाच्यावेळेस कशाला तालीम असा विचार ते करत नाहीत. दुर्देवाने आपल्याकडे मात्र अनेकदा ‘शो मे देख लेंगे’ असा अॅटिट्यूड असतो.
तू परदेशात गायलीस तो अनुभव आणि बॉलिवूडसाठी गाण्याचा तुझा विचार आहे का?
स्वतंत्र प्रज्ञेच्या कलाकारांना तिकडे नक्कीच चांगला प्रतिसाद मिळतो. तुम्ही कोठून आलात, कसे दिसता, काय करता याचा विचार ते करत नाहीत. तुमच्या कलेने मिळवून दिलेली ओळख ते लक्षातही ठेवतात. भरपूर आदर करतात. भारतात मात्र आपल्याला सारखी परीक्षा द्यावी लागते. मी हे गायलंय, मी ते गाऊ शकते, मी तेही गाऊ शकते असं सारखं सिद्ध करून दाखवावं लागतं. तसंच बॉलिवूडचा मोठा प्रभाव असल्यामुळे स्वतंत्र कलाकारांकडे थोडे लक्ष कमी जातं. उदाहरणार्थ- कोणीही आलं की आधी ‘बॉलिवूड मे आपने क्या किया है’ असं विचारलं जातं. बॉलिवूडमध्ये गाण्याची माझीही इच्छा आहे, पण मला घाई नाही. बॉलिवूडसाठी मागणी आली की मी नक्की गायीन. सगळ्याच प्रकारचं गायन मला महत्त्वाचं वाटतं.
गाण्यानं तुला काय दिलं असं वाटतं? गायिका नसतीस तर तू कोणत्या कलेला जवळ केलं असतं?
संगीत हे माझं जीवन, त्यातूनच मला आनंद मिळतो. माझं गाणं ऐकणाऱ्यांच्या आधी मला आनंद मिळतो. माझ्या आयुष्यामध्ये संगीत नसतं तर काहीच नसतं असं मला वाटतं. पण मला स्केचेस काढायला फार आवडतं. जर गायिका नसते कर मी चित्रकलेत काहीतरी केलं असतं. तसं मला टेनिस खेळण्याची आवड आहे. हॉर्सरायडिंगलाही मी जाते.
यू ट्यूबवर पाहून नवनवे स्वयंपाकाचे प्रयोगही करून पाहते. त्यामुळे एकदम रिलॅक्स वाटतं.
गुलजारजींनी लिहिलेल्या कवितांवरचा तुझा अल्बम लवकरच येत आहे, त्याबद्दल काय सांगशील?
गुलजारजींबरोबर काम करणं हा एकदम आनंददायी प्रवास आहे. मी तर त्यांना बडेपापा म्हणते. त्यांच्यासारखे कलाकार दुर्मिळ होत आहेत. त्यांनी लिहिलेल्या कवितांना मी संगीत देऊन गाणं ही माझ्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे.
मुलाखत आणि शब्दांकन
- ओंकार करंबेळकर onkark2@gmail.com