कस्टमाईज्ड बुलेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 03:58 PM2017-12-20T15:58:39+5:302017-12-21T08:53:49+5:30

पुण्याचा शार्दुल. त्यानं ठरवलं आपण का कस्टमाईज्ड करू नये गाडी? आठ महिने राबून त्यानं ती केली आणि..

Customized Bulge | कस्टमाईज्ड बुलेज

कस्टमाईज्ड बुलेज

Next

 - भक्ती सोमण

शार्दुल सांगतो..

अशा गाड्या तयार करायच्या असतील तर पेशन्स सांभाळणं खूप गरजेचं असतं. कारण बºयाचदा गाडीशी संबंधित महत्त्वाचे पार्ट्स उपलब्ध नसल्याने २-४ दिवस थांबवलं लागतं. वेल्डर योग्य नसला आणि मनाप्रमाणे काम झालं नाही तर हतबल वाटतं. अशावेळी सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे घडण्यासाठी योग्य वेळ जाऊ द्यावा लागतो. त्यामुळे हे काम करण्यासाठी किमान दोन महिन्यांपासून आठ महिनेही लागू शकतात. पण बाइकवर प्रेम असलं की हे जमतं.

बाइक. या विषयावर तरुण कितीही वेळ गप्पा मारू शकतात. अनंत काळ बोलू शकतात. पण त्यातही भाव कोण खातो तर एखादा बुलेटवला! क्रेझच तशी बुलेटची!

त्यात सध्या आपल्या बाइकला संपूर्ण वेगळा लूक देऊन म्हणजेच कस्टमाईज करून घेण्याचा फंडा अनेकजणांना प्यारा आहे. आणि त्यासाठी लाखोने पैसा खर्च करण्याची त्यांची तयारीही असते. अशीच बुलेट कस्टमाईज केली ती पुण्याच्या शार्दुल रानडेनं. त्यानं डिझाइन केलेली बाइक नुकतीच गोव्यात झालेल्या रॉयल इनफिल्डच्या 'रायडर मेनिया'त भारतातल्या २० बाइकर्समधून सिलेक्ट झाली.
पुण्याचा शार्दुल रानडे. वय फक्त २५. वडील गिरीश रानडे यांच्या नोकरीमुळे सहा वर्षे तो दुबईला राहिला. त्या काळात शार्दुलने दुबईतल्या लोकांचं कस्टमाईज बाइकवरचं प्रेम बघितलं होतं. या बाइक कशा करतात, त्याची माहिती त्याला समजत गेली. तिकडे त्याला एक्सपोजर मिळालं. आणि हे बाइक कस्टमाईज करणं आपल्यालाही जमेल असं त्याला वाटायला लागलं. तीन वर्षांपूर्वी तो पुन्हा पुण्यात परत आला. एकीकडे इंजिनिअरिंगचा डिप्लोमा सुरू होता. पण बाइक कस्टमाईज करण्याचं वेड काही स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यानं 'करिस्मा'चं कस्टमाईज हे 'कॅफे रेसर' या कॅटेगरीतलं केलं. (आउटलाइन तशी केली.) त्याची सबफ्रेम बदलली. सन्स्पेन्शन ड्युएलवरून सिंगल केलं. टाकी दुसऱ्या गाडीची लावली. हेडलाइट बदलले. ते करताना वायरिंगमध्ये सतत त्रुटी येत होत्या. त्या दुरुस्त करत गाडी तयार केली. या काळात झालेल्या चुकांमधून त्याला बरचं शिकता आलं.

पण, खरं आकर्षण होतं ते बुलेट कस्टमाईज करण्याचं. शार्दुलच्या चुलत बहिणीने, आरोही करमकरने त्याचं करिस्मा बाइकवर केलेलं काम पाहिलं होतं. त्यामुळे बुलेट कस्टमाईज करण्यासाठी तिने आर्थिक साहाय्य केलं. तसेच आई उज्ज्वलानेही मदत केली. रॉयल इनफिल्ड क्लासिक ५०० ही बुलेट त्यानं सेकंड हॅण्ड घेतली. ही गाडी कस्टमाईज करण्यासाठी त्याचं फ्रेमवर्क तयार केलं. (फ्रेमवर्क म्हणजे ज्याच्यावर गाडी उभी असते तो गाडीचा बॅकबोन.) त्यानंतर मग हळूहळू कामाला सुरुवात केली. शार्दुलचा मित्र किशोर गुरवचं कात्रजला गॅरेज आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली स्वत: मेहनत करून त्याने आठ महिन्यांत हे काम केलं. गाडीचा प्रत्येक पार्ट हॅण्डमेड असण्याकडे भर दिला. साधारणपणे बुलेटची लांबी सहा ते साडेसहा फूट असते, ती आठ फूट केली, तर साधारणपणे तीन फूट असणाºया सीटची हाइट फूटभर कमी केली. म्हणजेच स्टेबिलिटीसाठी गाडीची लांबी वाढवली आणि उंची कमी केली. त्यामुळे लांबच्या प्रवासातही ती आरामदायीपणे चालवता येऊ शकते. त्यानंतर गाडीचं इंजिन, चाकं, टायर्स, व्हील्स, पेट्रोलची टाकी अशा सगळ्यांत बदल केले. बाइक पूर्ण झाल्यावर तिला रंग दिला. ही गाडी बनवायला त्याला आठ महिने लागले. दरम्यान, त्या रॉयल इनफिल्डच्या गोव्याच्या इव्हेंटबद्दल कळलं. आणि तिथे गाडी कशी तयार केली याची संपूर्ण माहिती पाठवली. त्यातून भारतातल्या २० जणांमध्ये त्याची निवड झाली. हा आनंद त्याच्यासाठी विशेष होता.


 

Web Title: Customized Bulge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.