कापून टाका दु:खाचे दोर!
By admin | Published: October 9, 2014 06:27 PM2014-10-09T18:27:25+5:302014-10-09T18:27:25+5:30
दु:खाच्या जखमेवर खपल्या धरु द्या. बर्या होऊ द्या जखमा. आणि जे होऊन गेलं ते मान्य करा. दु:खाचा सामना यापेक्षा वेगळा कसा करणार ?
Next
>दु:खाने आपल्याला विळखा मारुन बसू नये म्हणून ठरवलं तर खूप काही करता येईल!
रचना ३२ वर्षांची, तिचा घटस्फोट झाला, त्याला आता तीन वर्षे झाली. पण आजही तो विषय निघाला की ते सारं नुकतंच घडलेलं असावं असं ती बोलते. तिचं दु:ख आजही तसंच आहे, त्याची तीव्रता कमी झालेली नाही की काळानं तिच्या जखमेवर खपली धरलेली नाही. घटस्फोटानंतर तिचा आत्मविश्वास जो खचलाच तर खचलाच. आता तर स्वत:च्या आयुष्याबद्दल पुढचा कसलाच विचार करण्याचीही तिची तयारी नाही.
दु:ख जेव्हा असं हलकं होत नाही तेव्हा ते खूप गुंतागुंतीचं होऊन जातं. माणसाचं आयुष्यच पुढे सरकत नाही, अडकून पडतं. रचनाचं झालंय तसंच. ती घटस्फोट झाला त्याच टप्प्यात अडकून पडली आहे. आपलं आयुष्य नव्यानं सुरु करण्याची तिची तयारीच होत नाही आणि मग त्याचा त्या व्यक्तीच्या आयुष्यावर, नातेसंबंधांवर खूप परिणाम होतो.
खरंतर कुठल्याही दु:खावर काळ हेच औषध असतं असं म्हणतात. पण खरं सांगायचं तर प्रत्येक दु:ख प्रत्येक माणसासाठी वेगवेगळंच असतं. अमुक एका कालावधीत तमुक दु:खातून कुठल्याही माणसाने बाहेर पडलच पाहिजे असं म्हणणं अजिबात योग्य ठरणार नाही.
कुठलीही दु:खद घटना घडल्यानंतर सुरुवातीला दु:खाची तीव्रता खूप जास्त असते. पण नंतर काळाच्या ओघात ती कमीही होताना दिसते. नंतर काही खास दिवसांना काही खास क्षणांना, त्या दु:खाची तीव्रता परत उफाळून वर येते. पण जाणार्या प्रत्येक क्षणानंतर हळूहळू त्या दु:खापासून आपण लांब होतो. ज्या गोष्टी घडल्या त्या समजायला, त्यानुरूप परिस्थितीत किंवा माणसांमध्ये बदल करायला, जे आहे ते वास्तव स्वीकारायला सुरुवात होते. अर्थात हे असं होणं म्हणजे अवघड कालात दु:ख ही भावना योग्यप्रकारे हाताळणं. ती तशी हाताळता आली नाही तर मात्र त्याचे परिणामही नकारात्मक होतात आणि आहे तो अवघड काळ जास्त गुंतागुतींचा, जटील होतो. अनेकदा सहन करण्यापलीकडचं, सोसण्यापलीकडचं दु:ख होतं, आयुष्य निर्थक वाटतं, पण त्याचकाळात या भावनेला आपण नीट हाताळायला पाहिजे. नाहीतर गोष्टी जास्त बिघडतात. खरंतर दु:ख ही आपल्या जगण्यातली स्वाभाविक आणि नाजूक भावना आहे. गाठी होऊ न देता, गाठींचा गुंता न बसू देता दु:खाचे दोर सोडवता आले पाहिजेत. माझ्याच वाट्याला हे दु:ख का आलं म्हणत स्वत:ला आणि परिस्थितीला दोष न देता, जरा काळजी घ्या स्वत:ची.
दु:खाच्या विळख्यानं स्वत:ला जखडू नका.
दु:खामुळे जगण्याचा गुंता वाढतो केव्हा?
१) दु:खाची तीव्रता कमीच होत नाही
२) जे घडून गेलं, ते स्वीकारताच येत नाही.
३) गेलेली व्यक्ती, घडलेली घटना याविषयीचे विचार मनातून जाता जात नाही.
४) जे झालं त्याविषयी खूप राग येतो.
५) नवं काम, नव्यानं पुन्हा आयुष्य सुरु करणं जमत नाही.
६) सतत खूप निराश वाटतं.
दु:खाचे दोर कापायचे कसे?
१) आपल्याला जे काही वाटतंय, जसं वाटतय तसं वाटू द्या. ते वाटणं नाकारु नका.
२) आपण जे गमावलंय, ते आता गमावलं आहेच, हे स्वीकारण्याचा प्रयत्न करा.
३) दु:खाच्या या अवघड काळातून जाताना आपल्या किंवा इतरांच्या आयुष्याबद्दल कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका.
४) स्वत:ची काळजी घ्या. स्वत:ला वेळ द्या.
५) जी व्यक्ती आपल्याला सोडून गेली तिच्या शिवाय जगण्याची तयारी करा. आपलीच एक नवीन ओळख मनात तयार करा.
६) आपलं जगणं या एकाचं घटनेने पूर्णत: निर्थक झालं आहे, असं म्हणू नका. तसं होत नाही, आयुष्य नव्यानं जगण्याचा प्रयत्न करा.
७) आपले मित्र, नातेवाईक आपल्याला आधार देत असतील, तर ती मदत घ्या. त्यांच्याशी मनमोकळेपणानं बोला.
८) नाउमेद न होता, आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा निर्धार करा.
- संज्योत देशपांडे