तुम्ही सायबर जगातले ढापू आहात का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 04:22 PM2018-07-26T16:22:57+5:302018-07-26T16:24:38+5:30
तुम्ही सिनेमा पहायला जाता आणि रेकॉर्ड करून आणता? कुणी पायरेटेड कॉपी देत असेल तर लगेच उतरवून घेता? पायरेटेड सिनेमे फॉरवर्ड करता? सिनेमाचं फेसबुक लाइव्ह करता? कुठल्याही कार्यक्रमाचं रेकॉर्डिग करून सर्रास वाटत सुटता? कुणाचीही फेसबुक पोस्ट ढापून आपल्या नावानं पोस्ट करता? व्हॉट्सअॅपवर व्हायरल करता? पुस्तकांच्या झेरॉक्स मारून सर्रास वाटता? मग, सावधान. आता तुमच्यावर सायबर पोलीस कारवाई करू शकतात. आणि ‘चोरी’ केली म्हणून थेट तुरुंगाची हवा खावी लागू शकते!
- मनीषा म्हात्रे
कुठलासा सिनेमा रिलिज झाला की एखादा मित्र म्हणतो, अरे माझ्याकडे अख्खा फुल मुव्ही आहे. देऊ का तुला? आपणही मस्त ताजा सिनेमा आपल्या मोबाइलमध्ये उतरवून घेतो. पाहतो टकामका. सगळ्यांना सांगतो, आज रिलिज झाला, लगेच माझ्याकडे आला पण! काही दोस्त तर यात फार पटाईत, कसे कोण जाणे पण त्यांच्या मोबाइलवर, पेन ड्राइव्हवर, टॅबवर तमाम सिनेमे भरलेले असतात. मोठं थ्रिल वाटतं त्यांना त्यात.
ते आपल्यालाही म्हणतात घे रे, एकदम ओरिजिनल कॉपी आहे. एकदम क्लीअर, बघ बिनधास्त.
पायरेटेड सिनेमे पाहू नयेत वगैरे आपण ऐकलेलं असतं, पण फुकटात मिळतीय कॉपी तर का सोडा म्हणत आपणही घेतोच ती फिल्म उतरवून! काहीजण तर इतके हुशार की, सिनेमा रिलिज होताच थिएटरात जातात. सगळी फिल्म रेकॉर्ड करून आणतात. धडाधड दोस्तांना पाठवतात. एकदम थ्रिलिंग काम. फिरते ती फिल्म गरागरा.
हे सारं एरव्ही ठीक आणि फार कॉमन होतं; पण आता तसं राहणार नाही. या शेअरिंगमध्ये जरी तुम्ही सापडलात तरी तुमच्यावर पायरसीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. यापुढे या सगळ्या शेअरिंग साखळ्यांवर सायबर विभागाचा वॉच असणार आहे.
धक्का बसला ना, हे वाचून! काय नाही होत, चालतंय, कोण पाहतंय म्हणत पायरसी करण्याच्या वृत्तीला आळा घालण्यासाठी आता कठोर कायदे होत आहेत. ते आपल्याला माहिती असलेले बरे, नाही तर नुस्ती आपण फिल्म उतरवून घेतली तर आपण कायद्याच्या कचाटय़ात सापडायचो.
होतं काय की नवीन चित्नपट प्रदर्शित झाला की त्यांच्या सीडीजची पायरसी होते. सीडी पायरसीचे प्रकार काही नवीन नाहीत. त्यापाठोपाठ साहित्य आणि शैक्षणिकक्षेत्नातील पुस्तकांच्या पायरसी तर सर्रास होतात. पुस्तकची पुस्तकं धडाधड झेरॉक्स मारली जातात; पण आता एक नवीन प्रकार सुरू झाला आहे. सोशल मीडियावर लाइक्स, कमेण्ट्स आणि कौतुक मिळविण्याच्या नादात फेसबुक लाइव्ह सर्रास थिएटरमधून सुरू करणारेही काही वस्ताद आहेत. टेलिग्राम, व्हॉट्सअॅप ही माध्यमं तर पायरसीला मदत करत आहेत. त्यातून सर्रास जोरदार पायरसी होताना दिसते. महाराष्ट्र सायबर विभागाच्या तपासात अलीकडेच लक्षात आलं आहे की, या नव्या समाजमाध्यमांचा वापर करून पायरसी प्रचंड बोकाळली आहे. दिवसेंदिवस पायरसी करण्याचे प्रकार, त्याचा फैलाव आणि वापर हा खालच्या पातळीवर उतरत आहे , भविष्यात हा मोठा धोका ठरू शकतो.
त्यामुळेच आता सोशल मीडियाद्वारे बेछूट पायरसी करणारे, त्या पायरसीची साखळी होत त्याचा प्रसार करणारे तरुण सध्या सायबर विभागाच्या रडारवर आहेत. अशाप्रकारे पायरसी करणार्या तरुण मुलांचा, त्यांच्या विविध ग्रुप्सचा सायबर पोलिसांनी आता शोध सुरू केला आहे. तसं पाहता अशा तरुणांर्पयत पोहोचणं हे पोलिसांसाठीही मोठं अवघड काम आहे. एक मोठं आव्हानच आहे. मात्र आता टप्प्याटप्प्याने त्यांनी काम सुरू केलं आहे. येत्या काळात पायरसी करणार्या, पायरसी फिल्म्स फिरवणारे ग्रुप्स, त्या ग्रुप्सच्या अॅडमिनसह सदस्यही कायद्याच्या कचाटय़ात अडकणार आहेत, असं महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत सांगतात. पायरसी करणार्याविरु द्ध गुन्हे दाखल करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याचंही राजपूत स्पष्ट करतात.
तंत्नज्ञानाची जाण असणं, त्याचं व्यसन लागणं आणि दुरुपयोग करणं या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे सगळं करण्यात आशियाई देशांमध्ये भारतीय तारुण्याचा प्रथम क्रमांक लागतो असं आकडेवारी सांगते. आधुनिक उपकरणं, संवादाची नवीन माध्यमं, एका क्लिकवर जगाची उघडली जाणारी कवाडं हे सारं हाताशी आहे, मात्र त्याचा वापर क्षणिक थ्रिलसाठी करताना काही गोष्टींचं भान सुटतं आहे. नवीन तंत्नज्ञान बाजारात आलं की त्याची इत्थंभूत माहिती तरुणांना असते, मात्र आपल्याला वाट्टेल ते जमतं हे शोऑफ करण्याच्या नादात बेकायदेशीर गोष्टीही सर्रास केल्या जातात. अशातच फेसबुक, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यामुळे एखादी गोष्ट सोशल मीडियात शेअर केल्यास ती देश-विदेशात काही सेकंदात पोहोचते. त्यातच आताशा मोबाइल अणि इंटरनेट क्र ांतीमुळे तरुणांच्या करमणुकीच्या व्याख्याही बदलल्या आहेत. मोबाइल फोनचा वापर हा बोलण्यापेक्षा त्यात असणार्या इतर सोयीसुविधांसाठीच जास्त केला जात आहे. आयफोनसारखा फोन म्हणजे तर या सोयीसुविधांची खाणच. मात्न तरुणाईची हीच शेअरिंगची बेफिकीर क्लिक त्यांच्यासाठी भविष्यात मोठे संकट वाढून ठेवू शकते.
आणि ते भविष्य वर्तमानापासून फार दूर नाही. कारण आता महाराष्ट्र सायबर विभागाने पायरसीविरोधात मोठय़ा कारवाईची मोहीम छेडली आहे. चित्नपट, मालिका, विविध खेळांचे सामने, सॉफ्टवेअर आणि अन्य कलाकृती, कार्यक्र मांचे सादरीकरण, विविध प्रकारची माहिती चोरून (म्हणजेच पायरसी करून) इतरांर्पयत पोहोचविणार्या संकेतस्थळांविरु द्ध कारवाईची मोहीम छेडली आहे. या संकेतस्थळांची आर्थिक, तांत्रिक कोंडी सुरू केली आहे. या मोहिमेत त्यांना जवळपास चार हजार संकेतस्थळांचा शोध लागला आहे. जे सर्रास पायरसी करतात. जसजसा तपास पुढे जाईल तसा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कारवाईत सापडलेल्यांपैकी 53 संकेतस्थळे बंद करण्यात आली. विशेष म्हणजे बंद करण्यात आलेल्या संकेतस्थळांपैकी 11 संकेतस्थळं ही फक्त संजू सिनेमाची होती. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून ती लिंक शेअर करण्यात आल्याचं चौकशीत उघड झालं. त्या लिंकवर लाखभर लाइक्स, कमेण्ट्स दिसून आल्या. अर्थात यातला खरा विरोधाभास म्हणजे त्या फेसबुक लाइव्ह, लाइक्स-कमेण्ट्सचा फायदा पायरसी करणार्या संबंधित व्यक्तीपेक्षा फेसबुकलाच जास्त झाला. पण आता कारवाई त्या व्यक्तीवर होईल. संजू सिनेमाप्रमाणेच पद्मावत, बाहुबली सिनेमांचीही अशीच पायरेटेड कॉपी संकेतस्थळांवर होती. काही महाभागांनी तर फिफा वल्र्डकपच्या सामान्यांचे 14 संकेतस्थळांवर लाइव्ह प्रसारण केलं होतं. याबाबत तक्र ार दाखल होताच सायबर विभागानं ही संकेतस्थळं बंद पाडली.
काही टेक्नोसेव्ही तरुण व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, टेलिग्रामद्वारे सिनेमांचं, क्र ीडा सामन्यांचं, मालिकांचं रेकॉर्डिग करून ती लिंक ग्रुपमध्ये शेअर करतात. यामध्ये त्यांना आर्थिक मोबदला अनेकदा काहीही मिळालेला नसतो. मात्न आपण सर्वात ग्रेट, सबसे आगे, सबसे स्मार्ट आणि हटके आहोत हे दाखविण्याच्या नादात ते हे सारे उद्योग करतात. पोलीस तपासातही हेच उघडकीस आलं आहे.
हेच कशाला, लोक सर्रास एकमेकांच्या फेसबुक पोस्ट चोरतात. व्हॉट्सअॅप पोस्ट, लेख चोरतात. कॉपी-पेस्ट तर सर्रास करतात. मात्र आपण जो ढापूपणा करतो, ती सर्रास चोरी आहे हेच अनेकांना कळत नाही. मात्र यापुढे अशा ‘चोरी’ला शिक्षा आहे हे यापुढे लक्षात ठेवलेलं बरं!
तर महिन्याकाठी आठ कोटी वाचतील.
सायबर पोलिसांच्या कारवाईत बंद पाडलेली संकेतस्थळं मनोरंजन क्षेत्नाशी संबंधित आहेत. या संकेतस्थळांच्या माध्यमातून महिन्याकाठी देशभरातील दहा कोटी दर्शक, ग्राहक चोरून मिळवलेले चित्नपट, मालिका पाहत असल्याचं समोर आलं आहे. जगभरात विविध देशांमध्ये अशा चोरटय़ा संकेतस्थळांना आळा घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आकडेवारी सांगते की, ऑस्ट्रेलियात चोरटी संकेतस्थळं बंद पडल्यानंतर चित्नपटगृहांमध्ये जाऊन चित्नपट पाहण्याचं दर्शकांचं प्रमाण 50 टक्क्यांनी वाढलं. हे प्रमाण ब्रिटनमध्ये 23 टक्क्यांनी, तर कोरियात 90 टक्क्यांवर गेले. या अभ्यासानुसार महाराष्ट्र सायबरने हे प्रमाण पाच टक्के पकडून चोरटी संकेतस्थळं बंद केल्यास मनोरंजन क्षेत्नाचे महिन्याकाठी 8 कोटींचे नुकसान वाचवता येईल, असं महाराष्ट्र सायबर विभागाचे अधीक्षक बाळसिंग राजपूत सांगतात.
पायरसी कशाची?
* फेसबुक लाइव्ह, वेबसाइट लिंक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, सीडी, कॅमेरा याद्वारे पायरसी केली जाते.
* सिनेमा, संगीत, टीव्ही मालिका यांची सर्रास पायरसी होते.
* पुस्तकं आणि शैक्षणिक साहित्याची पायरेटेड चोरी होते.
* सॉफ्टवेअर, मशीन, वस्तूंची हुबेहूब कॉपी करून कमी भावात विकली जातात.
* विविध खेळांचे लाइव्ह करून त्याचं थेट प्रसारण केलं जातं.
सायबर कारवाई होते म्हणजे काय?
पायरसी करणार्या संकेतस्थळाच्या मालकाचे तपशील मिळाल्यास त्याला थेट नोटीस धाडली जाते. या नोटिसीद्वारे संकेतस्थळ तातडीने बंद करण्याची ताकीद दिली जाते. बंद न केल्यास फौजदारी कारवाई केली जाईल, असं स्पष्ट सांगितलं जातं. मालकाचे तपशील न मिळाल्यास या संकेतस्थळाला जाहिरातींद्वारे अर्थसाहाय्य पुरवणार्या बहुराष्ट्रीय कंपन्या, बँका आणि अन्य खासगी आस्थापनांना अशाच प्रकारच्या नोटिसा धाडल्या जात आहेत. संकेतस्थळ सुरू करण्यासाठी इंटरनेट सेवा पुरवणार्या (आयएसपी) कंपन्यांनाही अशाच नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. याशिवाय माहिती तंत्नज्ञान मंत्नालयाकडे पाठपुरावा करून, पुरावे समोर ठेवून ही संकेतस्थळं कायमची बंद करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. अशाप्रकारे एकूण 6 टप्प्यांमध्ये ही कारवाई केली जाते. हे संकेतस्थळ पूर्णपणे बंद पाडल्यानंतर त्याच्यामागील आरोपीला अटक केली जाते.
3 वर्षाचा कारावास
पायरसी हा गुन्हा आहे. त्यात पायरसीबरोबर चोरीचाही गुन्हा दाखल केला जातो. गुन्हा सिद्ध झाल्यास 3 वर्षाची शिक्षा होऊ शकते.
शैक्षणिक क्षेत्रात पायरसीचं लोण
गेल्या काही वर्षात साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्नातील पुस्तकांचीही पायरसी होत असल्याचं दिसून आलं आहे. नागपूरला नुकताच पुस्तक पायरसीचा प्रकार उघडकीस आला असून, शैक्षणिक आणि साहित्यिक अशी हजारो पुस्तकं गुन्हे शाखेच्या विभागानं कारवाई करून जप्त केली आहेत. नागपुरात पुस्तक पायरसीचा हा व्यापार जवळपास 40 कोटींचा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देशात अन्य राज्यात या पायरसीचं मोठं जाळं असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सीडीप्रमाणे पुस्तक पायरसीचाही मोठा व्यवसाय सुरू असल्यानं त्याचा फटका लेखक, वाचक, प्रकाशक या तिघांनाही बसत आहे. पायरसी होणार्या पुस्तकांत विशेषतर् शैक्षणिक, स्पर्धात्मक परीक्षांची पुस्तकं सापडली आहेत. या पुस्तकांच्या किमती मूळ किमतीपेक्षा कमी असल्यामुळे तरुण वाचक ती विकत घेतात.
(मनीषा लोकमतच्या मुंबई आवृत्तीत गुन्हे वार्ताहर आहे.)