सायकलने 141 देशांचा प्रवास

By admin | Published: September 8, 2016 12:47 PM2016-09-08T12:47:07+5:302016-09-08T13:30:00+5:30

141 देश आपण भूगोलाच्या पुस्तकात आणि नकाशातही कधी नीट पाहिलेले नसतील. पण पॅट्रिक मार्टिन श्रोडर या अवलियानं हे सारे देश स्वत: सायकलने फिरून पाहिलेत.

Cycle travels to 141 countries | सायकलने 141 देशांचा प्रवास

सायकलने 141 देशांचा प्रवास

Next

- मयूर देवकर

141 देश आपण भूगोलाच्या पुस्तकात आणि नकाशातही कधी नीट पाहिलेले नसतील. पण पॅट्रिक मार्टिन श्रोडर या अवलियानं हे सारे देश स्वत: सायकलने फिरून पाहिलेत. दहा वर्षांपूर्वी त्यानं सायकलला पॅडल मारलं आणि त्याच्या अद्भुत प्रवासाची सुरुवात झाली... मुक्तपणे स्वातंत्र्य अनुभवायचंय आणि स्वत:ला कुठपर्यंत नेऊ शकतो याची त्यालाच परीक्षा घ्यायची आहे? 

 

आपल्यात काही ना काही झिंग असली पाहिजे, थोडा वेडेपणा हवा, असे मनोमन वाटत असतं. अगदी ‘तमाशा’मधील रणबीरसारखं. आता रणबीरचं नाव आलंच तर त्याच्याच चित्रपटातील एक वाक्य आपल्या मनातील खदखद व्यक्त करतं. तो म्हणतो ना, ‘मैं उडना चाहता हूॅँ, दौडना चाहता हूॅँ, गिरना भी चाहता हूॅँ, बस रुकना नहीं चाहता’ बहुधा हेच सूत्र प्रमाण मानून पॅट्रिक मार्टिन श्रोडरनं जगभ्रमंती सुरू केली. पॅट्रिक सायकलवर जगाची सफर करत आहे. आतापर्यंत त्यानं १४१ देश सायकलवर फिरले आहेत. काय असेल त्याच्यामध्ये जे असं धाडस करायला, असा वेडेपणा करायला त्याला हिंमत देतं असेल? काय विचार करत असेल तो? दहा वर्षांपूर्वी त्यानं पॅडल मारलं आणि सुरू झाला हा अद्भुत प्रवास. आतापर्यंत त्यानं युरोप, अमेरिका, आॅस्ट्रेलिया आणि आशिया (पाच युद्धग्रस्त देश वगळता) खंडातील सगळे देश पार केले आहेत. अर्धा आफ्रिका खंडसुद्धा पूर्ण झालाय त्याचा. घर ते आॅफिस किंवा कॉलेज व्हाया क्लासेस करत दिवस घालवणाऱ्या आपल्यासारख्या मंडळींनी एवढे देश केवळ भूगोलाच्या पुस्तकात आणि नकाशात पाहिले आहेत. कसले भन्नाट किस्से असतील त्याच्याकडे, चित्रविचित्र गोष्टी पाहिल्या असतील, केल्यासुद्धा असतील. मग ते भरउन्हाळ्यात सहारा वाळवंट असो वा हाडं गारठून टाकणारा सायबेरिया असं सगळं सगळं अनुभवलंय त्यानं. वर्षातील दोन-तीन महिने वगळता तो प्रवासातच असतो. दीड वर्ष लगातार सायकल प्रवास करून त्यानं दक्षिण-मध्य-आणि उत्तर अमेरिकेतील एकूणएक देशांना भेटी दिल्या. तो सांगतो, ‘पॅन-अमेरिकन हायवेवर सायकल चालवणं, अ‍ॅमेझॉन नदी बोटीनं पार करणं, इन्का, माया, अ‍ॅझ्टेक यांसारख्या अतिप्राचीन संस्कृतीच्या अवशेषांना भेट देणं माझं स्वप्न होतं. ते या एकाच ट्रीपमध्ये पूर्ण केलं.’ पॅट्रिकचा सगळा प्रवास अशाच इण्टरेस्टिंग किंवा हॅपनिंग गोष्टींनी भरलेला नाही. अनेकवेळा त्याला कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. मग ते मुंबईतील ढेकूण, सायकल चोरी, बंदुकीच्या धाकावर त्याची केलेली लूट असे अनेक भले-बुरे अनुभव त्याच्या पाठीशी आहेत. एकदा तर तो मगरीच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला. सोमालियामध्ये एका सीमा सुरक्षा सैनिकानं त्याला जवळपास जेलमध्ये टाकलंच होतं. तो सांगतो, ‘मी गोएथच्या ‘फॅउस्ट’प्रमाणे मनाशी एक खूणगाठ बांधून ठेवली आहे- प्रत्येक अनुभव हा खूप काही शिक वून जातो. मग तो चांगला असो वा वाईट. म्हणून मी माझी हिंमत आणि उत्साह कमी होऊ देत नाही.’ पॅट्रिकचं इंडिया कनेक्शन पॅट्रिक मूळचा जर्मन आहे. खाण्याची तर त्याला भलती आवड. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण संपूर्ण जगाची चव चाखलेल्या पॅट्रिकला भारतीय जेवण खूप आवडतं. त्याचं कारणही तसेच आहे. ते म्हणजे भारतीय जेवण स्वस्त असतं. त्यामुळे त्याच्यासारख्या अ‍ॅडव्हेंचर ट्रॅव्हलरला ते परवडण्यासारखं असतं. त्याचे सर्वात आवडीचे डेस्टिनेशन म्हणजे अंदमान निकोबार बेट. तो म्हणतो, ‘मी तीन आठवडे त्या शांत, निसर्गानं भरभरून सौंदर्य दिलेल्या बेटांवर घालवलेला वेळ म्हणजे स्वर्गानुभवच.’ निळ्याशार समुद्रकिनारी मस्त हवेशीर हमॉकवर बसून चवदार सी-फूडवर ताव मारत लाटांच्या संगीतात आवडतं पुस्तक वाचण्याची मजा काही औरच! पण खर्चाचं काय? आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात असा विचार आला असेल की, हे सगळं ऐकायला बरं वाटतं. पण पैशाचं काय? जग फिरायचं म्हणजे एवढा पैसा आणायचा कुठून? पण सगळ्या गोष्टींसाठी पैसा नसतो महत्त्वाचा. आतून इच्छा असायला हवी. कारण ‘इच्छा तेथे मार्ग’ असे उगीच नाही म्हणत. पॅट्रिक काही अतिश्रीमंत नाही. जर्मनीतील त्याच्या एका जागेपोटी त्याला मिळणाऱ्या मासिक भाड्यावर तो त्याचा छंद जोपासतो. महिन्याकाठी सुमारे बावीस हजार त्याची कमाई आहे. तो सांगतो, ‘मी सायकलवर प्रवास करत असल्यामुळे वाहतुकीचा खर्च तसा नगण्यच. आता राहिली राहण्याची व्यवस्था तर मोकळ्या आकाशाखाली टेंट लावून; नाहीतर गावातील लोकांकडेच झोपायचं. युरोपियन देशांमध्ये मी सुपरमार्केटमधून खाण्यापिण्याचे सामान खरेदी करून स्वत:च बनवत असे; पण भारत-बांगलादेशसारख्या स्वस्त देशांत हॉटेलचं जेवणदेखील मला परवडतं.’ त्याच्याकडे असणारे बहुतांश एक्विपमेंट्स हे स्पॉन्सर्ड असल्यामुळेदेखील बराच खर्च वाचतो. एवढं फिरून मिळतं काय? बरेचजण असं म्हणतील की, काय मिळतं एवढं हिंडून-फिरून. डोंगर चढण्यापेक्षा आम्हाला करिअरची शिडी कशी भरभर चढता येईल हे महत्त्वाचं. पालकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या, शेजाऱ्यांच्या तोंडी नाव आणायचे, नातेवाइकांच्या नजरेत मोठं व्हायचंय आम्हाला. वीकेंडला मित्रांसोबत जवळच्या टेकडीवर जाऊन फेसबुकवर टाकलेले फोटो पुरेसे आहेत आमच्या समाधानासाठी. पासपोर्टवर वेगवेगळ्या देशांच्या ठशांपेक्षा मल्टिनॅशनल कंपनीचा रिझ्युमवर ठपका लागण्यासाठी आमचा अट्टाहास. काय करायचं सायकलवर एवढी मरमर करून. पावसा-पाण्यात, थंडी-वाऱ्यात अडगळीच्या ठिकाणी जाऊन काय सिद्ध करायचंय? वरकरणी हा युक्तिवाद एकदम बरोबर आहे. पॅट्रिक सायकलवर १४१ देश फिरतोय म्हटल्यावर आपण सर्वांनीसुद्धा तसंच करावं असं नाही. त्याच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे स्वत:च्या क्षमतांची कसोटी लागेल अशी आव्हानं पेलायची सवय आणि धमक स्वत:मध्ये निर्माण करणं होय. पॅट्रिक काही जग बदलायला नाही निघाला. तो त्याचा छंद जोपासतोय. जीवनाचा अर्थ शोधतोय. ‘तू का फिरतोय’ असं त्याला विचारलं तर तो म्हणतो, याचं निश्चित असं उत्तर माझ्याकडे नाही. तेच मी शोधतोय. मला जग पाहाचंय, अगदी जवळून पाहाचंय. स्वातंत्र्य मुक्तपणे अनुभवायचं आहे. मी कुठपर्यंत स्वत:ला नेऊ शकतो ते पाहायचंय. आपल्यावर असणारी दृश्य-अदृश्य बंधनं झुगारून प्रत्येक गोष्ट आर्थिक आणि प्रतिष्ठेच्या जुनाट चष्म्यातून पाहणं जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत आपल्याला असा काही ‘येडपटपणा’ करता येणं शक्य नाही. आपण सेफ गेम खेळणारे. सिंगल काढून शतक पूर्ण करणारे. कशाला उगाच सैराट व्हायचं, नाही का? इथं ‘नटसम्राट’मधील ते वाक्य फार चपखल बसतं- ‘नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण.’ तर मग मित्रांनो, देऊ फेकून हे जुनं जागेपण आणि करूच स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश. काय होईल फार फार तर? ठेचा लागतील; पण थडगे बनून तर नाही ना जगणार, पराजित होऊ पण हतबल तर नाही ना होणार, भीती वाटेल पण भय तर नाही ना उरणार. काय मिळणार याचं गणित मांडण्यापेक्षा असं केलं नाही तर किती सारं गमवू याचा विचार करा. बाकी तुम्ही सुज्ञ आहात. समजदार को इशारा काफी होता है! बरोबर ना? पॅट्रिकसारख्या सायकल ट्रीपसाठी प्रो-टीप तुम्हाला जर पॅट्रिकसारखं सायकलवर जगभ्रमंती करायची असेल तर तो द. कोरियापासून सुरुवात करण्याचा सल्ला देतो. कारण निसर्गरम्य जागेबरोबरच तेथील लोक, संस्कृती एकदम वेगळी आणि उत्साह वाढवणारी आहे. तेथे सायकलचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळे सगळीकडे ‘सायकल लेन’ आहेत. तसेच चार नद्यांना पार करणाऱ्या ६०० किमी लांबीच्या बाइक ट्रेलवर सायकल चालवणं म्हणजे अविस्मरणीय अनुभव असतो, असे तो म्हणतो. -मयूर देवकर ( लेखक ‘लोकमत’च्या मराठवाडा आवृत्तीत सहायक उपसंपादक आहेत.)

Web Title: Cycle travels to 141 countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.