दत्तू बबन भोकनळ

By Admin | Published: May 7, 2016 04:43 PM2016-05-07T16:43:23+5:302016-05-07T16:43:23+5:30

अडचणींच्या महासागरातून जिद्दीनं आपली बोट वल्हवत थेट ऑलिम्पिक मेडलसाठी दावेदारी सांगायला निघालेला एक तरुण

Dattu Baban Bhokanal | दत्तू बबन भोकनळ

दत्तू बबन भोकनळ

googlenewsNext
>- स्वप्नील जोशी
(स्वप्नील ‘लोकमत’च्या नाशिक आवृत्तीत कनिष्ठ उपसंपादक आहे.)
 
 
अडचणींच्या महासागरातून जिद्दीनं आपली बोट वल्हवत थेट ऑलिम्पिक मेडलसाठी दावेदारी सांगायला निघालेला एक तरुण.
मूळ पत्ता- मु. पो. तळेगाव रोही, 
ता. चांदवड, जि. नाशिक.
 
‘त्याची’ गोष्ट सोपी नाही.
किंवा खरं तर त्याची गोष्ट इतकी ‘आम’ आहे की, खेडय़ापाडय़ात राहणा:या, दुष्काळाचे चटके सोसणा:या आणि परिस्थितीशी सतत झगडणा:या कुणाही तरुणाला ती गोष्ट आपलीच वाटेल.
कुठल्याही गावखेडय़ात असावा तसाच हा ‘दत्तू’ नावाचा मुलगा.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातल्या तळेगाव रोही गावचा.
गाव दुष्काळीच. नाशिकपासून म्हणायला 80 किलोमीटरच दूर पण तरीही शहरी झगमगाटापासून खूप लांब. दुष्काळाचाच सुकाळ. आसपास ना नदी ना नाला, ना पोहणं ना बोटिंग, ते सारं कल्पनेपलीकडचंच.
तोसुद्धा पोट भरायचं म्हणून विहिरी खणण्याच्या नी त्यातला गाळ उपसायच्याच कामावर जायचा.
त्यात बरकत येईना म्हणून थेट लष्करात गेला.
आणि तिथं नशिबानं त्याच्या समोर बोट आणि वल्ही आणून उभी केली.
आणि आज तोच,
दत्तू बबन भोकनळ
रोईंग अर्थात नौकानयन खेळात थेट ऑलिम्पिक पदकाची दावेदारी सांगत ब्राझीलला निघाला आहे. त्यासाठीच्या सर्व निवड स्पर्धा जिंकत त्यानं आपली एण्ट्री पक्की केली आहे!
जागतिक स्पर्धेत ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय करणं हेसुद्धा गुणवत्तेचा मैलाचा दगड ठरतो.
त्या दगडावर पाय ठेवून आता ऑलिम्पिक पदकाचंच स्वप्न पाहणा-या दत्तूला भेटा.
 
‘त्याच्या’ गावात प्रचंड दुष्काळ. शेतीवर पोट. हंगामात जे पीक हाती येईल त्यावर गुजारा कसाबसा करायचा. घरातली परिस्थिती अत्यंत हलाखीची. त्यात दुर्दैव म्हणजे तो जेमतेम नववीत शिकत असताना वडिलांचं छत्र हरपलं.  आणि एवढय़ा लहान वयात त्याच्या खांद्यावर कुटुंबाची  जबाबदारी येऊन पडली. राबायचं, चार पैसे कमवायचे नी घरादाराचं पोट भरायचं म्हणून त्यानं नववीतच शिक्षण सोडलं आणि काम धरलं. काम काय तर गावात विहिरी खोदण्याचं आणि यारी पद्धतीनं विहिरीतील गाळ उपसण्याचं. पाण्याशी संबंध म्हणाल तर एवढाच. 
बाकी दुष्काळच. सगळ्याचाच.
अशी ज्याची लाइफ स्टोरी असेल तो मुलगा थेट ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय करतो, तेही नौकानयन अर्थात रोईंग नामक क्रीडा प्रकारात, यावर कुणी तरी विश्वास ठेवेल का?
विश्वास ठेवणं अवघड आहेच, पण तरीही आपल्या जिद्दीनं आणि चिकाटीनं ही गोष्ट सत्यात उतरवण्याचं काम केलंय एक तरुणानं.
दत्तू बबन भोकनळ.
असं त्याचं नाव.
नाशिकपासून 80 किमी अंतरावर असलेल्या चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही या गावातला हा दत्तू. ज्याच्या गावात कायमच प्रचंड दुष्काळ, नदीशी कधी संबंधच आलेला नाही. पाण्यात उतरून पोहणंबिहणं तर लांबच! त्यात त्याच्या डोक्यात पाण्याची भीतीच. फोबियाच. अशा अवस्थेतला दत्तू थेट रोईंगसाठी आता ऑलिम्पिक पदकाची दावेदारी सांगायला निघाला आहे. ऑलिम्पिकला क्वालिफाय करून तो नुकताच नाशकात आला होता, तेव्हा त्याची भेट झाली. आणि गावाकडच्या दत्तूची ही रिओर्पयतची व्हाया आर्मी आणि व्हाया तुफान पाणी धडक समजत गेली! 
नाशिकच्या आदिवासी भागातल्या सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊतनं आधीच ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय केलंय आणि आता दत्तू तर एका वेगळ्याच क्रीडाप्रकारात एक नवीन मानाचं पान लिहितोय. आणि त्यातलाच एक मैलाचा दगड म्हणजे ऑलिम्पिकसाठी ‘पात्र’ ठरणं!
इथवरचा सारा प्रवास कसा काय झाला तुझा, असं विचारत दत्तूच्या भूतकाळाची पानं उलगडत गेलं तर एक अत्यंत कष्टाची, जिद्दीची, चिकाटीची आणि आशावादाची गोष्टच उलगडत जाते. 
शेतीत भागेना आणि घरादाराचं पोट तर भरायचं म्हणून दत्तूनं ठरवलं की लष्करात भरती होऊ! पण लष्करात जायचं तरी किमान दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक होतं. त्याशिवाय तिथं भरतीलाही कुणी उभं केलं नसतं. आपल्याला लष्करात जाण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही हे लक्षात आल्यानं दत्तू पुन्हा अभ्यासाकडे वळला. 17 नंबरचा फॉर्म भरून तो दहावीच्या परीक्षेला बसला. घरीच अभ्यास करून दहावी पासही झाला. आणि थेट लष्करभरतीला गेला. नशीब जोरावर होतं म्हणून सैन्यात नोकरी लागलीही. केवळ पोटापाण्यासाठी सैन्य दलात सहभागी झालेल्या दत्तूच्या नशिबात मात्र वेगळंच काहीतरी लिहून ठेवलं होतं. सैन्य दलात भरती झाल्यानंतर पुण्यातील ‘बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप’मध्ये दत्तू दाखल झाला. त्याची शरीरयष्टी बघून सुभेदार कुदरत अली यांनी त्याला रोईंग नावाच्या क्रिडाप्रकाराची माहिती दिली. आणि रोइंग करायला भागही पाडलं. मनात पाण्याची भीती. दत्तूला सुरुवातीला फार अवघड गेलं हे पाण्याशी दोन हात करणं. मात्र प्रशिक्षक प्रोत्साहन देत होते. पुण्याजवळ नाशिक फाटा परिसरातील मुळा-मुठा नदीच्या पात्रत द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक इस्माईल बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी आणि संध्याकाळी दररोज दोन तास सराव करून दत्तू हे नौकानयन शिकला. ज्या पाण्याची भीती वाटायची, त्याच पाण्यावर बोट घेऊन स्वार होऊ लागला. त्यानं अनेक स्पर्धामध्ये सहभाग घेतला. राष्ट्रीय स्पर्धेत खेळताना तर दत्तूनं दोन सुवर्णपदकं मिळवली. आणि याच कर्तृत्वावर त्याला भारतातर्फे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. यानंतर बीजिंग येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत दत्तूनं चांगली कामगिरी करत थेट रौप्यपदकाला गवसणी घातली. विविध प्रकारच्या स्पर्धांमधून दत्तूच्या कामगिरीचा आलेख  चढताच राहिला. त्याच्या या कामगिरीमुळे दत्तूच्या प्रशिक्षकांचाही उत्साह वाढला.
आता दत्तूचं लक्ष्य ऑलिम्पिकच असलं पाहिजे असं त्याच्या प्रशिक्षकांनाही वाटत होतं. त्यांनी दत्तूकडून आणखी कठोर सराव करून घ्यायला सुरुवात केली.  आणि मग वेळ आली ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी कोरियाला जायची. मिळालेल्या या संधीचं सोनं करत ‘सिंगल स्कल’ प्रकारात दोन किलोमीटरचं अंतर 7 मिनिटं 14.49 सेकंदात पूर्ण करत रौप्यपदकासह रिओ ऑलिम्पिकचं त्यानं पक्कं केलं. आणि आशियाई गटातून ऑलिम्पिकसाठी आपण ‘पात्र’ आहोत हे सिद्ध केलं.
एकीकडे हे सारं आनंददायी आणि आशादायी घडत होतं, तर दुसरीकडे कोरियाला जाण्यापूर्वी काही दिवस आधीच दत्तूच्या आईला दुचाकीवरून पडल्यानं गंभीर अपघात झाला. उपचारासाठी त्यांना दवाखान्यात दाखल करावं लागलं. एकीकडे आयुष्यभरासाठीची संधी, तर दुसरीकडे आई आजारी. जावं की न जावं अशा द्विधा मन:स्थितीत दत्तू होता. पण सैन्यातल्या अधिका:यांनी, प्रशिक्षकांनी दत्तूला आश्वस्त केलं की, तू जा आम्ही आईच्या उपचाराची पूर्ण काळजी घेऊ. म्हणून मग मनावर दगड ठेवून आणि आईची जबाबदारी धाकटय़ा भावावर सोपवून दत्तू कोरियाला स्पर्धेसाठी रवाना झाला. 
आणि परतला ते मोठय़ा यशाचा हात धरूनच!
 दुष्काळी भागातल्या ज्या तरुणाला नौकानयन हा शब्दही माहिती नव्हता, त्यानं आज थेट तिरंगा खांद्यावर घेत ऑलिम्पिकर्पयत धडक मारली आहे.
खरंतर कोरिया, चीन, न्यूझीलंड या देशांमध्ये मिळणारं नौकानयनाचं प्रशिक्षण, सुविधा आणि आपल्या देशात मिळणा:या सुविधा यामध्ये प्रचंड तफावत आहे. आपल्या देशात रोईंग (नौकायन) म्हणजे काय हेही अनेकांना माहिती नसेल. रोईंग हा परदेशी खेळ असावा असंही अनेकांना वाटतं. मात्र वस्तुस्थिती तशी नाहीये. हा खेळही अन्य भारतीय खेळांइतकाच भारतीय आहे.
आता दत्तूनं मारलेल्या या धडकेमुळे का होईना, नौकानयन नावाच्या या खेळाविषयी थोडी जागृती होईल. आपल्या देशात रोईंगसाठी पोषक वातावरण आहे. रोईंगचं  प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली तर नदी आणि अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ राहण्यासदेखील मदत होऊ शकेल असं दत्तूच्या प्रशिक्षकांनाही वाटतं. मुख्य म्हणजे दत्तूनं ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली, आता इथून पुढं जिद्दीनं तो ऑलिम्पिक मेडलचंही स्वप्न पाहील असं त्याच्या प्रशिक्षकांनाही वाटतं आहे.
दत्तूचं आणि पर्यायानं देशाचंही ते स्वप्न पूर्ण व्हावं, हीच दत्तूसाठी शुभेच्छा!!
रोईंग म्हणजे.
 
रोईंग म्हणजे नौकानयन.
स्कल आणि  स्विप असे दोन प्रकार यात असतात. स्कलमध्ये दोन्ही हातांनी रोईंग केलं जातं. सिंगल स्कल प्रकारात एक व्यक्ती रोईंग करते.
डबल स्कल प्रकारात एका नौकेत दोन व्यक्ती रोईंग करतात. कॉड्रेबल फोर प्रकारात एका नौकेत चार व्यक्ती रोईंग करतात.
स्विप प्रकारात नौकेतील खेळाडू उजव्या किंवा डाव्या अशा एकाच बाजूने रोईंग करतो. यामध्ये कॉकलेस पेअर प्रकारात दोन खेळाडू, कॉकलेस फोर प्रकारात चार खेळाडू, कॉक्स फोर प्रकारात चार खेळाडू आणि एक दिशादर्शक तर कॉक्स एट प्रकारात आठ खेळाडू आणि एक दिशादर्शक यांचा समावेश असतो.
दत्तू स्कल सिंगल प्रकारात रोईंग करतो.
दत्तू म्हणतो.
‘‘भारताबाहेर जाऊन खेळणं हे एक मोठं आव्हान असतंच. तिथलं वातावरण एकतर वेगळं असतं. भारतातलं वेगळं, कोरियात वेगळं होतं, आता ब्राझीलमध्येही वेगळंच असेल. त्याच्याशी जुळवून घेत सराव करायचा म्हणून दोन महिने आधीच तिथं पोहचणार आहे. त्यापूर्वी अमेरिकेतही महिनाभर सराव करणार आहे. ऑलिम्पिकसाठी निवड हा एक टप्पा गाठलाय, आता पुढचं स्वपA आहे ऑलिम्पिकचं पदक. तेच आता एकमेव ध्येय. माङो प्रशिक्षक इस्माईल बेग माङयाकडून सराव करून घेत आहेत. मला पदक मिळवण्यासाठी  किमान 6.36 मिनिटांर्पयत कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. कोरियात झालेल्या स्पर्धेत 7.18 मिनिटात मी लक्ष्य गाठलं होतं. त्यामुळे आता इथून पुढची स्पर्धा आता माझी स्वत:शीच आहे. मी स्वत:ला हरवत पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे.
खरं सांगतो, आपलं लक्ष्य पक्कं होत जातं, तसं आपली भाषा, आपलं बोलणं हे काही अडसर राहत नाही. त्यात माङयावर सैन्याचे संस्कार. मागे हटणार नाही हे नक्की!’’
 
 
 

Web Title: Dattu Baban Bhokanal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.