दौंड ते नौदल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 06:33 PM2018-02-21T18:33:45+5:302018-02-22T08:45:42+5:30
सारा देशच माझा कुठं परकेपणाची भावनाच नाही.
- अमोल शिंदे, दौंड
कौठडी. हे माझ्या गावाचं नाव. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात हे छोटंसं गाव आहे. शेतकरी कुटुंब. गावी मोठं खटल्याचं घर आहे. माझे वडील पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या सेवेत होते. त्यांच्या वारंवार बदल्या होत. दौंडनजीक त्यांनी माझ्या राहण्याची सोय केली. माझ्या शिक्षणाची अबाळ होऊ नये म्हणून वडिलांनी ही काळजी घेतली होती. माझं प्राथमिक शिक्षण दौंडला रेल्वेच्या शिशू विकास मंदिर या प्राथमिक शाळेत झालं. त्या काळी ते विद्यालय नामांकित होते. उच्च शिक्षणासाठी मी बारामती येथे विद्या प्रतिष्ठान या नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला. विज्ञान शाखेत शिकत होतो. बारावी चांगल्या मार्काने मी उत्तीर्ण झालो. त्यानंतर खºया अर्थानं माझ्या जीवनाचा नवा प्रवास सुरू झाला.
इतर मुलांसारखी डिग्री घ्यायची आणि चांगल्या पैकी एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत काम करायचं, आरामशीर जीवन जगायचं असं काही माझ्या मनात नव्हतं. मला काही वेगळी वाट चालून पाहायची होती. लहानपणापासून माझ्या वडिलांनी एक गोष्ट मनावर बिंबवली होती ती म्हणजे स्वत: आधी देशाचा विचार कर. आपण आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे.
निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा याच शिकवणुकीला जागून मी भारतीय नौदलात जाण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली. आता मी भारतीय नौदलात टेक्निकल इंजिनिअरपदावर कार्यरत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून मी सेवेत आहे. सध्या कोचीनला असतो. गाव सुटलं, राज्य सुटलं; पण देश तर माझाच आहे. सारा देशच आपला असल्यानं कुठं परकेपणाची भावना नाही. मी मनापासून एक वेगळी आणि समाधानाची वाट चालतो आहे.
(शब्दांकन -बाळू कुंभार)