दुष्काळातल्या मित्रंनो, सॉरी!!
By admin | Published: June 11, 2015 02:50 PM2015-06-11T14:50:26+5:302015-06-11T14:50:26+5:30
खेडय़ापाडय़ातून आलेले आमचे तरुण मित्रमैत्रिणी दुष्काळापायी होरपळताहेत, आणि त्यांची आमची धड ओळखही नाही, याचीच आता लाज वाटते!
Next
>‘खेडय़ापाडय़ात श्रीमंत करिअर’ हा ऑक्सिजनचा अंक वाचला!
आणि वाटलं कुठल्या जगात राहतेय मी, मला तर हे सारं काही माहितीच नाही!
मुळात मला खेडीच माहिती नाहीत, खेडय़ातला भारत माहिती नाही, आणि प्रश्नही माहिती नाहीत.
ते माहिती करून घ्यावेत असं कधी कुणी सांगितलं नाही, कधी वाटलंही नाही!
मी कायमच पुण्यात, एफसी रोडवर. मराठवाडय़ातून आलेले आमचे मित्रमैत्रिणी जेव्हा दुष्काळाबद्दल बोलतात तेव्हा त्याचं काही गम्यही वाटत नाही.
अनेकदा तर काही मित्रंना आम्ही चिडवलंपण की, काय तू तुमच्या गावाकडे एवढा दुष्काळ आणि इथं काय करतोय रूपालीत, जा हंडे वाहायला, पाणी भरायला!
आणि तो मित्रही काहीही युक्तिवाद न करता सारं काही ऐकून हसून सोडून द्यायचा. जसं काही त्यानंही नातंच तोडून टाकलं होतं त्याच्या गावाशी, तिथल्या दुष्काळाशी!
एकदा बोलता बोलता तो म्हणाला, ‘कवटाळून करू काय ती दु:ख! इथं सारी सुखं, सारी चमकधमक आणि तिथं नुस्ता खकाणा. मला कंटाळा आलाय त्या खकाण्याचा आणि त्या रिकाम्या डबडय़ांचा!’
त्यादिवशी त्याचा त्रगाही मला काही कळला नाही!
एकदा मात्र चुकून गमतीत आम्ही त्याचं वडिलांशी सुरू असलेलं बोलणं चोरून ऐकलं!
हा त्यांना कळवळून सांगत होता, नका पाठवू पैसे, मी कायपण करीन, मी काहीतरी करीन सोय, तुम्ही माझी काळजी करू नका.
ओशाळं होऊन आम्ही त्याला विचारलं की नेमकं काय झालंय?
तेव्हा तो सांगत होता, बहिणीच्या लग्नापायी डोक्यावर घेतलेलं कर्ज आहे. यंदा काहीच उत्पन्न नाही, एक गाय होती फक्त, तीही मेली. आता वडिलांकडे रोख पैसा हातात येईल अशी काही सोयच नाही.
काय तोंडानं त्यांना सांगू की मला पैसे पाठवा?’
तो ढसढसा रडला तेव्हा माझ्यासारख्यांना कळलं की दुष्काळ काय असतो? गरिबी काय असते आणि लढाई काय असते?
त्याच काळात तुमचा ग्रामीण उद्योजकतेवरचा अंक वाचला.
वाटलं, असं काहीतरी खेडय़ापाडय़ात जाऊन आमच्यासारख्याच तरुण मुलांनी करायला हवं!
कसं करायचं नि काय करायचं, हे मला आत्ता माहिती नाही!
मला आज एवढंच माहिती आहे की, माझ्या अवतीभोवती माझे असे काही मित्र आहे ज्यांच्या जगण्यात एकाएकी दुष्काळ पडलाय. आणि ते कोरडेठाक होत चाललेत!
दुर्दैव हेच की, त्यांच्यासाठी मी काहीच करू शकत नाहीये.
- मिहिरा गुंजाळ, पुणो