डिप्रेशन कुणालाही येऊ शकतं. टोकाला जाऊ नका...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 03:33 PM2020-06-18T15:33:33+5:302020-06-18T15:34:58+5:30
मला काय होतंय? मनाला काही व्हायला मी काही लेचापेचा आहे का? असं म्हणू नका.
-डॉ. हमीद दाभोलकर
सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या आपल्या सगळ्यांना एक मोठा धक्का देऊन गेली. थेट तसा तो आपला कोणी नव्हता. आपल्यातील बहुसंख्यांना हेवा वाटेल असे आयुष्य त्याने स्वत:च्या साठी घडवले होते.
मात्र डिप्रेशनमुळे त्याने आत्महत्या केली हे समजल्यावर अनेकजण हळहळले. कोरोना-लॉकडाऊनच्या याकाळात आजूबाजूलाही अशा काही घटना ऐकू येत आहेत.
पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तरुण वयात येणारा डिप्रेशनचा त्रस आणि आत्महत्या या आता समाज म्हणून आपण दुर्लक्ष करण्यासारखी बाब राहिलेली नाही. आपल्या देशात दरवर्षी होणा:या साधारण दोन लाख आत्महत्यांच्या पैकी निम्म्यापेक्षा अधिक आत्महत्या या 15 ते 35 या वयातील तरुणाईच्या असतात. कुठल्याही युद्धात किंवा देशाच्या सीमेवर घडणा:या चकमकीत होणा:या मृत्यूंपेक्षा ही संख्या अनेक पटींनी जास्त आहे.
मुळातच युवावस्था ही मानवी जीवनाच्या मधील अत्यंत आव्हानात्मक अवस्था असते. एकाच वेळेला अनेक पातळ्यांवर आव्हानं असतात. शरीरात आणि मनात होणारे बदल, मित्नमैत्रिणींच्या नात्यातील ताण, पालकांच्या सोबत बदलणारे नाते संबंध, करिअरविषयी अनिश्चितता आणि त्यामधून निर्माण होणारे ताण, प्रेम-आकर्षण, जोडीदाराची निवड याविषयीच्या मनातील गोंधळाच्या मधून निर्माण होणारे पेच असे अनेक पदर या ताणतणावांना असतात.
त्यातून मानसिक अस्वस्थता येते. काही वेळेला यामधील कोणतेही कारण नसताना मेंदूत केमिकल लोचा होऊनदेखील डिप्रेशन येऊ शकते.
योग्यवेळी आणि शास्रीय उपचार मिळाले तर डिप्रेशन पूर्ण बरे होऊ शकतो. दीपिका पदुकोण, विराट कोहली अशा अनेक यशस्वी व्यक्तींनी आपण डिप्रेशनवर उपचार घेऊन मात केली असं जाहीर सांगितलं आहे.
त्यामुळे असे उपचार घेण्यात कोणताही कमीपणा नाही उलट आपल्याला त्नास होत असल्यास आपण न लाजता मोकळेपणाने मदत मागितली पाहिजे. तज्ज्ञांच्या मदतीने उपचार घेणो आवश्यक असते.
छोडना नही, पकडे रहना हा मंत्न मात्न आपण मनात जागा ठेवला पाहिजे.
डिप्रेशनची लक्षणं कोणती?
* डिप्रेशन आलेल्या व्यक्तीला आपल्या आजूबाजूचे जग काळ्या रंगात दिसू लागते. आपल्या आजूबाजूला घडणा:या गोष्टीत केवळ नकारार्थी गोष्टीच दिसू लागतात. आत्मविश्वास कमी होतो. नेहमी जी गोष्ट आपण सहज करू शकत होतो ते करणो ओङो वाटू लागते. कारण नसताना सारखे रडू येणो, छोटय़ा छोटय़ा गोष्टींनी राग येणो, भूक कमी होणो किंवा एकदम वाढणो, झोप कमी होणो किंवा सारखे झोपावेसे वाटणो अशी लक्षणो दिसायला लागतात. मदत करणारी माणसे आजूबाजूला असली तरी आपण खूप एकटे पडलो आहोत असे वाटायला लागते. आपण आयुष्यात कधीच यशस्वी होणार नाही असेदेखील विचार यायला लागतात.
* जेव्हा डिप्रेशनची लक्षणो तीव्र होतात तेव्हा ती व्यक्ती आत्महत्येचा विचार करू लागते.
डिप्रेशन आणि आत्महत्येचे विचार याविषयी गैरसमज
गैरसमज : डिप्रेशन येणो म्हणजे मनाचे चोचले आहेत.
वास्तव : डिप्रेशन हा एक मानसिक आजार आहे. बाकीच्या शारीरिक आजारांप्रमाणो त्यावर व्यवस्थित उपचार घ्यावे लागतात.
गैरसमज : डिप्रेशनचं औषध एकदा घेतलं की आयुष्यभर घ्यावं लागतं?
वास्तव : बहुतांश वेळा डिप्रेशन हे समुपदेशन आणि सौम्य स्वरूपाचे औषध उपचार सहा महिने घेतल्यास आटोक्यात येतं.
गैरसमज : एखाद्या व्यक्तीला आत्महत्येविषयी प्रश्न विचारला तर आपण त्याच्या मनात ते भरवतो.
वास्तव : तणावात असलेल्या व्यक्तीला योग्य पद्धतीने प्रश्न विचारून मन मोकळे करण्यासाठी उद्युक्त करता येते. यामुळे प्रत्यक्ष तोटा होण्याऐवजी फायदा होतो.
(लेखक मनोविकार तज्ज्ञ आहेत.)