विकासाचं तोंड गावात दिसलं पाहिजे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 07:57 AM2021-01-28T07:57:31+5:302021-01-28T08:00:17+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातलं उंड्री नावाचं लहानसं गाव. तिथल्या तरुण मुलामुलींनी एकत्र येत पॅनल बनवलं. ते लढले आणि..
-इंदुमती गणेश
आम्ही लहान असल्यापासून बघतोय ग्रामपंचायतीत वर्षानुवर्षे तीच माणसं, त्यांचीच सत्ता. पण गावात विकासाचा पत्ता नाही. आदर्श गाव म्हणून बाकीची गावं गाजतात, त्यात आमचं गाव कुठंबी न्हाई. एकाच जागी थांबलंय जखडून ठेवल्यागत. बदल हवा होता, मग आम्ही ठरवलं ग्रामपंचायतीला लढायचं. आम्ही पॅनल उभारतोय म्हटल्यावर एवढी वर्षे एकमेकांना पाण्यात बघणारे सत्ताधारी-विरोधक एकत्र आले. आम्हाला प्रभागात उमेदवारच मिळू देईना. आमच्या नावाच्या पॅम्पलेटवर नारळ, सुया टोचलेले लिंबू, हळद-कुंकू, ब्लाऊजपीस ठेवून भानामतीची भीती दाखवायलाही काही मागे हटले नाहीत. माघारीसाठी दबाव, फोडाफोडीचं राजकारणही झालं. पण आम्ही लढलो, आता निवडून आलो. इच्छा एकच, गावचा विकास झाला पाहिजे..
- कोल्हापूरपासून ३७ किलोमीटरवर पन्हाळा तालुक्यातील उंड्री नावाचं लहानसं गाव आहे. या आडवाटेवरच्या गावात पहिल्यांदाच ग्रामपंचायतीत निवडून आलेले तरुण सदस्य आपला अनुभव सांगत होते. या गावातल्या तरुणांनी ठरवलं, आपणच पुढाकार घेऊन इलेक्शन लढवू. मग त्यांनी एकत्र येत श्री निनाई जनयुवाशक्ती पॅनल नावाचं तयार केलं. नऊ जागा लढवल्या. सगळेच पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे. त्यापैकी पाच जण निवडून आले. उज्ज्वला कांबळे, सविता यादव, रंजना यादव, शहाजी यादव व शरद मोरे यांनी विजय मिळवला. गावकऱ्यांनी या नव्या तरुण उमेदवारांवर भरवसा ठेवला.
त्यांच्याशी बोलायला म्हणून त्यांच्या गावी जावं तर धड रस्ता नाही. मुख्य म्हणून जो रस्ता त्यात खड्डेच जास्त. गावात दर्शनी जी ग्रामपंचायतीची इमारत दिसते तीही पडकीच. बाजूला तुंबलेली गटारं, अस्वच्छता. गावाला जोडून खोतवाडी आणि चव्हाणवाडी असे दोन वाडे आहेत, इथलं एकूण मतदान तेराशेच्या आसपास. गावात सेंट्रिंगचा मुख्य व्यवसाय. सोबत एमआर, शेती आणि दुग्ध व्यवसाय. शाळा सातवीपर्यंत. पुढच्या शिक्षणासाठी दोन-तीन किलोमीटरवरच्या दुसऱ्या गावात जावं लागतं.
निवडणूक लढवणाऱ्या-जिंकणाऱ्या या तरुण दोस्तांशी बोलणं झालं. तर ते सांगतात, ‘हे गावंच चित्र पाहताय तुम्ही. आम्ही ठरवलं, आपल्या शिक्षणाचा उपयोग गावासाठी करू. गावचा विकास झाला पाहिजे, हे चित्र बदललं पाहिजे. आम्ही निवडणूक लढवायची म्हटलं तर आधी तर चेष्टाच झाली. कशाला नाही ते उद्योग करताय, असा सल्लाही मिळाला. अनुभव तर आम्हालाही नव्हता, आजही नाही. पण घरोघर जाऊन लोकांशी बोललो, त्यांनी आमच्यावर भरवसा ठेवला. आता त्या भरवशाला जागून काम करायचं आहे.’
निवडून आलेल्यात तीन तरुणी त्यापैकी दोघी विवाहित आणि दोन तरुण. सगळे सर्वसामान्य कुटुंबातले, कष्टकरी. कोणलाही राजकीय पार्श्वभूमी नाही. हाती पैसाही नव्हताच. मात्र त्यांनी हिंमत करून निवडणूक तर लढवलीच. गप्पांनंतर गावात एक फेरफटकाही मारला. परत निघालो तेव्हा सगळे म्हणाले, ताई पुढच्यावेळी तुम्ही याल तेव्हा तुम्हाला आमचं गाव बदललेलं दिसेल..
या तरुण हातांच्या कष्टांना यश लाभो, या शुभेच्छा..!
( इंदुमती लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत वार्ताहर आहे.)
indu.lokmat@gmail.com