...धिस इज व्हॉट आय हॅव टू डू!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 12:11 PM2018-01-04T12:11:40+5:302018-01-04T12:12:03+5:30
'आय वॉज होमलेस, बट आय टोल्ड हर, धिस इज व्हॉट आय हॅव टू डू !’ मला डान्सरच व्हायचं होतं. पण आईचं एकच पालूपद. कॉलेजात जा, शिक.
- जेनीफर लोपेझ
‘आय वॉज होमलेस, बट आय टोल्ड हर, धिस इज व्हॉट आय हॅव टू डू !’ मला डान्सरच व्हायचं होतं. पण आईचं एकच पालूपद. कॉलेजात जा, शिक. माझं शिकण्यात काही मन रमत नव्हतं, ना डोकं चालत होतं. खूप वाद झाले. शेवटी मी घरातून बाहेर पडले. राहणार कुठं? काही सोयच नव्हती. त्यात माझं स्वप्नही छळायचं. मला फुलटाइम डान्सरच व्हायचं होतं. एका डान्स स्टुडिओत मला नोकरी लागली. कशीबशी. साधीशीच; पण त्यांनी मला त्या स्टुडिओत राहायची परवानगी दिली. म्हणजे काय तर स्टुडिओतल्या सोफ्यावर मी रात्री झोपत असते. आईला ते कळलं, वाईट वाटलं. पण मी तिला स्पष्टच सांगितलं की, हाल होताहेत माझे; पण हेच मला करायचं आहे. धिस इज व्हॉट आय हॅव टू डू !
काही महिन्यांनतर मला डान्सिंग जॉब मिळाला. थेट युरोपात. मी तिकडे गेले. नाचले. शिकले. वर्षभरात परत आले तर मला ‘इन लिव्हिंग कलर’ हा शो मिळाला. त्यातली मी प्लाय गर्ल झाले. लॉस एंजिलीसला राहायला गेले. एका वर्षात सारं बदलून गेलं. जगणंही. नशीबही.
न्यू यॉर्कमधलं माझं आयुष्य साधंसुधं होतं, हॉलिवूडचं जग वेगळं. तिथला चकचकाट वेगळा. पण मी टिकले कारण त्या वर्षभरानं मला जे शिकवलं ते कायम सोबत होतं. जेव्हा जेव्हा अडले, अडथळे, संकटं आली. अपयश आलं किंवा मन हार मानायला लागलं तेव्हा तेव्हा मी आईला सांगितलेलं वाक्य स्वत:ला सांगते, धिस इज व्हॉट आय हॅव टू डू!
(गायिका, हॉलिवूड अभिनेत्री, निर्माती आणि जगातल्या अत्यंत श्रीमंत महिलांपैकी एक)