वॅरेन बफेला आवडलेलं पुस्तक, वाचलंय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 06:11 PM2018-02-14T18:11:30+5:302018-02-15T10:40:45+5:30
१९२९ च्या सुमारास अमेरिकेत सुरू झालेली आर्थिक मंदी ओसरू लागली. १९३९ साल उजाडलं तेव्हा तर तिथले तरुण नवनिर्मितीची स्वप्नं बघत होते. यातून नवे उद्योग जन्माला येत होते.
- प्रज्ञा शिदोरे
१९२९ च्या सुमारास अमेरिकेत सुरू झालेली आर्थिक मंदी ओसरू लागली. १९३९ साल उजाडलं तेव्हा तर तिथले तरुण नवनिर्मितीची स्वप्नं बघत होते. यातून नवे उद्योग जन्माला येत होते. जगावर आपला प्रभाव पाडण्यासाठी अमेरिका सज्ज होत होती. आयन रँडसारख्या लेखिका त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्याचे विचार मांडत होत्या. आपण कसं दिसतो, कसं राहतो, कसं बोलतो, काय बोलतो यावर लोक खूपच लक्ष देऊ लागली. आता अमेरिकेत ‘यशस्वी’ होण्यासाठी केवळ स्किल नाही, तर तुमचं व्यक्तिमत्त्वही महत्त्वाचं ठरू लागलं. त्यामुळेच विविध ‘व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्र म’ अमेरिकेत सुरू झाले होते, आणि लोक विविध पद्धतीच्या कमतरतांवर मात करण्यासाठी ‘सेल्फ हेल्प बुक्स’चा आधार घेत होते.
यामधील एक ‘आद्य’ सेल्फ हेल्प बुक म्हणजे डेल कार्नेजचं ‘हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल’. हा डेल कार्नेज होता एका गरीब शेतकºयाचा मुलगा. वडिलांना शेतीच्या कामामध्ये तो मदत करत असे. पहाटे ४ वाजता उठून दूध काढून मगच तो शाळेत जाई. त्यानंतर त्यानं बरीच छोटी-मोठी कामं केली. त्यातलं एक काम म्हणजे रँचर्सना (जे मोठ्या प्रमाणात पशुपालनाच्या व्यवसायात आहेत असे लोक) डिस्टन्स एज्युकेशनचं साहित्य पुरवायला सुरुवात केली. यातून त्याला शिक्षणाचं महत्त्व लक्षात आलं. कष्ट करून तो शिकला. त्याला जाणवलं की त्यानं सांगितलेल्या पद्धतींचा लोकांना खूप उपयोग होतो आहे. मग त्यानं रागावर ताबा कसा मिळवावा, पब्लिक स्पीकिंग असे अनेक छोटे-मोठे कोर्सेस सुरू केले. त्यानं त्याकाळच्या अमेरिकन नागरिकांची नस पक्की ओळखली होती. यातूनच असं एखादं पुस्तक लिहिण्याची कल्पना समोर आली.
१९३९ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या आजपर्यंत जगभरात अनेक भाषांमधून असंख्य आवृत्त्या विकल्या गेल्या आहेत. काही अंदाज असे आहेत की या पुस्तकाच्या आजपर्यंत ३० कोटी कॉपीज विकल्या गेल्या! २०११ साली टाइम मासिकाने जगातल्या सर्वात प्रभावशाली १०० पुस्तकांच्या यादीमध्ये या पुस्तकाला १९ वा क्र मांक दिला होता. वॉरन बफेसारखा माणूस जेव्हा ‘या पुस्तकाने माझं आयुष्य बदललं’ असं म्हणतो, तेव्हा तरी आपण हे पुस्तक वाचायलाच पाहिजे. काय सांगावं आपलंही आयुष्य बदलून जाईल..
हे पुस्तक मिळवून वाचा किंवा
पहा-
आॅडिओ स्वरूपात यूट्यूबवर ऐकताही येईल.
दोन भागांमध्ये दीड-दीड तासांचे हे भाग आहेत.