डिजिटल स्थानिक आणि उपरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 07:54 PM2018-04-27T19:54:38+5:302018-04-27T19:54:38+5:30
‘अ वेन्सडे’ सिनेमा आठवतो, त्यात पोलिसांना मदत करणारा एक तरुण हॅकर मुलगा? नवा काळ या मुलांचा असेल ज्यांना म्हणायचं, डिजिटल नेटिव्ह.
- डॉ. भूषण केळकर
मुलीचं लग्न आहे, ४००-५०० लोकं सहज येतील. पण म्हणून त्या लग्नासाठी कोणी नवीन मोठं घर विकत घेत नाही ! एक-दोन दिवस मंगल कार्यालय भाड्यानं घेता येतं. तसाच भटजी, फोटोग्राफर यांची सेवा घेतली तात्पुरती की झालं काम. दुसरं उदाहरण. आंब्याच्या सीझनमध्ये कोकणातले आंबे मोठ्या प्रमाणात येतात म्हणून केवळ एप्रिल - मेसाठी, त्यांच्या साठवणुकीकरिता प्रचंड घर/ जागा कुणी विकत घेत नाहीत !
तसंच ४०-५० लाख रुपये वार्षिक उलाढाल असणारी एक आयटी कंपनी असेल तर त्या कंपनीला एचआरच्या सॉफ्टवेअरची गरज असतेच ५०-६० लोकांचा पेरोल, त्यांचे पेन्शन, रिक्रूटमेंट इत्यादी लागतंच. मग त्यासाठी हे काम सांभाळणारं एचआर सॉफ्टवेअर विकत घेतलं तर? पण त्याची किंमत असते १५-२० लाख रुपये ! तुम्हीच सांगा, ४० लाखाची तुमची उलाढाल, त्यात नफा ५-१० लाख, मग १५-२० लाख रुपये मोजून एचआर सॉफ्टवेअर घेणं कंपनीला परवडेल का? मग कंपनी ते जुजबीपणे/थातूरमातूर कामचलाऊ पद्धतीने करत राहते आणि एचआर सॉफ्टवेअरच्या फायद्यांना मुकते.
पण विकत घेण्याऐवजी हेच एचआर सॉफ्टवेअर जर भाडेतत्त्वावर मिळालं तर? दरवर्षी फक्त एक लाखात ते वापरता आलं तर?
कटकट वाचते, पैसे वाचतात आणि कार्यक्षमता वाढते.
वरील तीनही भाडेतत्त्वावर वस्तू वापरण्याची उदाहरणं म्हणजेच क्लाउड तंत्रज्ञानाचा आत्मा ! ‘पे -अॅज-यू-गो’ म्हणजे ‘‘जेवढं वापरता, तेवढ्याचे पैसे भरा’’ अशा आॅन डिमांड तत्त्वावर क्लाउड आधारित आहे. संसाधनांचा विभागून केलेला वापर आणि त्यात मिळणारी लवचिकता ही क्लाउड तंत्रज्ञानात फार महत्त्वाची आहे.
क्लाउड तंत्रज्ञान म्हणजे तांत्रिक संसाधनांचे अचूक वितरण करत आल्याने ‘आखुडशिंगी बहुदुधी’ गाय आहे असं म्हणावं लागेल !
बहुदुधी आहे; पण ‘आखूड’ का होईना ‘शिंगी’ आहे हे मात्र आपण ध्यानात घ्यायला हवंच ! हे शिंग म्हणजे सायबर सिक्युरिटी/क्लाउड सिक्युरिटीबद्दल आहे हे नक्की आणि ते आखूडच राहो ही अपेक्षा !
डेटा सुरक्षा आजकालचा कळीचासुद्धा झालाय. केब्रिज अॅनॅलिटिकाबाबत आपण बघितलंच; पण तुम्हाला आठवत असेल की मागे ‘रॅन्समवेअर’ नावाचा व्हायरस हा भारतातसुद्धा आला होता आणि त्यानं धुमाकूळ घातला होता. असं म्हणतात की, यापुढची युद्ध ही पाण्यावरून होतील आणि एआय आणि सायबर वॉरफेअरवर लढली जातील. चीन त्याबाबत अत्यंत जोरात तयारी करतो आहे, असा बोलबाला आहे.
‘आधार’ हे तरी सुरक्षित आहे का की तो डेटासुद्धा असुरक्षित आहे आणि तो त्याचा गैरवापर होईल हासुद्धा सध्या ‘हॉट टॅपिक’ आहे ! मला तर वाटतं की फेसबुक, क्रेडिट/डेबिट कार्ड, तुमचा मोबाइल की जो तुम्ही ‘लोकेशन’ हा चॉईस आॅन ठेवा अगर न ठेवा तुम्हाला ट्रॅक करतोच आहे, अशा विश्वात आपण जगतो आहोत, त्यात आधारबद्दल गळा काढणं म्हणजे स्वत:चीच केलेली फसवणूक आहे !
या डेटासुरक्षा/गोपनीयता या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आतासुद्धा उपलब्ध आहेत आणि त्याचं महत्त्व लक्षात घेता त्याचा भविष्यातील आलेखसुद्धा उंचावतच राहील. यामध्ये नवीन/तरुण पिढीचं योगदान महत्त्वाचं ठरेल.
‘अ वेन्स्डे’ हा अनुपम खेरचा सिनेमा आठवा. नसरुद्दीन शाहचा मोबाइल ट्रॅक करण्याकरता पोलिसांना शेवटी मदत करतो तो फारसं फॉर्मल शिक्षण न झालेला एक पोरगेलासा हॅकर तरुण !
भविष्यात हे तर होणारच आहे. आता डिजिटल जगात दोन पिढ्या आहेत. एक पिढी तिला ‘डिजिटल मायग्रण्ट’ (उपरे !) म्हणतात. ही म्हणजे ‘जुनी’ पिढी की ज्यांना तंत्रज्ञानाशी जुळवून घेणं आवडत नाही/तो वेग आवडत नाही. ‘डिजिटल नेटिव्ह’ म्हणजे नवीन तंत्रज्ञानावर ज्यांचा पिंड पोसला आहे अशी नवीन पिढी. त्यांच्या रोमरंध्रात तंत्रज्ञान आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ‘दोन शब्दात, दोन संस्कृती !’ हा प्रसिद्ध निबंध आहे ‘श्रृतिस्मृतिपुराणोक्त’ ही एक संस्कृती आणि ‘अद्ययावत’ ही दुसरी अशी त्यांनी दोन संस्कृती रूपं सांगितली आहेत. त्यांची क्षमा मागून मला वाटतं की डिजिटल पिढ्यांमध्येही हा प्रकार आपल्याला दोन शब्दात सांगता येईल.
‘प्रभाते करदर्शनम्’ असे मानणारी ‘डिजिटल मायग्रण्ट’ पिढी आणि सकाळी उठल्या उठल्या मोबाइलचं स्क्रीनचे दर्शन घेणारी ‘प्रभाते स्क्रीनदर्शनम्’ वाली ‘डिजिटल नेटिव्ह’ पिढी. डाटा सिक्युरिटीची गरज कोणाला आहे ती कोणी सोडवायची आहे हे यातून आपसूकच आपल्याला समजेल! सुज्ञास सांगणे नलगे!
( लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.)