हुशारीचा शोध

By admin | Published: June 16, 2016 11:49 AM2016-06-16T11:49:14+5:302016-06-16T12:29:31+5:30

सगळ्यांशी उत्तम पटतं किंवा इवढुशा जागेतून गाडी पटकन बाहेर काढता येते किंवा बोटात अशी जादू की कुणी न शिकवताही पेटी वाजवता येते. हे सारं म्हणजे बुद्धिमत्ता असं म्हणता येईल का?

Discovery of intelligence | हुशारीचा शोध

हुशारीचा शोध

Next

 - डॉ. श्रुती पानसे
( लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)

तो आपला आपण लावायचा, कारण आपण हुशार आहोतच!

आपल्याला वाटतं आपलं डोकं काही गणितात चालत नाही. भूमिती, सायन्स हे काही आपल्याला झेपत नाही.
इंग्रजी तर अधूच आहे आपलं. म्हणजे एकुणात काही आपण हुशार नाही, असं आपलं आपणच ठरवतो.
हा समजच डोक्यातून काढून टाकायचा म्हणून तर आपण वेगवेगळ्या बुद्धिमत्ता समजून घेतो आहे. डॉ. हॉवर्ड गार्डनर यांनी आठ बुद्धिमत्तांची ओळख करून दिली आणि त्यानंतर हुशारी या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला. त्यापैकी भाषिक, गणिती आणि संगीतविषयक या तीन बुद्धिमत्ता आपण मागील लेखात पाहिल्या. 
या लेखात अजून तीन बुद्धिमत्ता समजून घेऊ.
मात्र आपल्या स्वत:चा शोध घेण्यासाठी या वेगवेगळ्या बुद्धिमत्ता समजून घेत, आपल्याकडे यातलं काय-काय आहे याचा अंदाज आपले आपण बांधायला हवा.

अवकाशीय बुद्धिमत्ता


अवकाशाचा विचार करणारी बुद्धिमत्ता. 
अवकाश म्हणजे अंतराळ नाही तर कुठलीही मोकळी जागा (स्पेस). मोकळ्या जागेचा योग्य विचार ज्यांना अतिशय उत्तम पद्धतीने करता येतो ते अवकाशीय बुद्धिमत्तेचे असतात. कल्पकता, सर्जनशीलता हे त्यांचे सगळ्यात मोठे गुण. उदाहरणार्थ चित्रकार, शिल्पकार, इंजिनिअर्स, आर्किटेक्ट, ड्रायव्हर्स, फोटोग्राफर्स, इंटेरिअर डिझायनर्स, अ‍ॅनिमेटर्स यांच्यात हीच बुद्धिमत्ता असते. म्हणजे जी जागा मोकळी आहे तिचा वापर, उपयोग कसा करता येईल याचं त्यांचं आकलन उत्तम असतं. केवळ मनाने एखादी कल्पना करून, एखादी संकल्पना प्रत्यक्षात उतरवणं ही एक विशेष बुद्धिमत्ता आहे. चित्रकार कल्पनेनं चित्र काढतो. ते चित्र पूर्ण झाल्यावर कसं दिसेल, त्यात कोणते रंग भरले तर ते खुलून दिसतील, कोणते रंग चांगले दिसणार नाहीत हे तो कल्पनेनंच बघत असतो. त्यानुसार कागदावर किंवा इतर कोणत्या माध्यमात उतरवत असतो.
एखादी रिकामी जागा बघून आर्किटेक्ट किंवा इंजिनिअर त्याठिकाणी मोठी इमारत कशी दिसेल याचं कल्पनाचित्र उभं करतात. इमारतीचं प्रवेशद्वार, त्याची उंची, एकूण मजले, जिने कुठून कसे जातील, इमारतीचा रंग हे सारं ते कागदावर उतरवतात. हळूहळू प्लॅन तयार होतो. मात्र कागदावर किंवा कॉम्प्युटरवर उतरवण्याच्या आधी ते चित्र त्यांच्या मनात तयार असतं. ते बुद्धीने तयार केलेलं असतं. इंजिनिअरने तयार केलेलं यंत्रदेखील आधी त्यांच्या मनात तयार झालेलं असतं. हे काम अशा माणसांमध्ये असलेली अवकाशीय बुद्धिमत्ता तयार करत असते.

आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता

आपल्यापैकी काही माणसांना कायमच इतरांच्या सहवासात राहायला आवडतं. मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्या सतत सान्निध्यात, संपर्कात असणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं, त्यावर त्यांना सल्ले देणं, इतरांना मदत करणं, इतरांची मदत घ्यायलाही कायम तयार असणं, सर्वांनी मिळून वेगवेगळे उपक्रम करायला तयार असणं हे सारं काय आहे?
अभ्यासात या सगळ्याचे मार्क्स मिळत नसले तरी ही एक वेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ताच आहे. मिळून-मिसळून वागणं हा केवळ स्वभाव नाही किंवा तो एखाद्या वेळचा मूडही नाही, तर ही खास बुद्धिमत्ता असते. या बुद्धिमत्तेचं नाव आहे, आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता. डॉ. गार्डनर यांनी या बुद्धिमत्तेला नाव दिलं आहे- ्रल्ल३ी१स्री१२ङ्मल्लं’ ्रल्ल३ी’’्रॅील्लूी.
लहानपणापासून इतरांशी संवाद साधतच आपण आपली कामं करतो. मात्र मोठं झाल्यावर, नोकरी- व्यवसाय करायला लागल्यावर व्यवहारात ही बुद्धिमत्ता जास्त नेमकेपणानं आणि सतत वापरावी लागते. ज्यांच्यात ही बुद्धिमत्ता असते अशा व्यक्ती कायम लोकांच्या घोळक्यात असतात. इतरांशी चांगले संबंध ठेवतात. 
समाजात डोकावलं तर असं दिसतं की नेतेमंडळी, कंपनीतले मॅनेजर्स, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते हे लोक या बुद्धिमत्तेचे असतात. ही बुद्धिमत्ता प्रत्येकालाच वापरावी लागत असते म्हणजे एखाद्या कलाकाराला किंवा एखाद्या शास्त्रज्ञाला किंवा खेळाडूलादेखील; परंतु काही माणसं विशेष ‘सोशल’ असतात, असं आपण म्हणतो ती अशा बुद्धिमत्तेची असतात.

शरीर/स्नायूविषयक बुद्धिमत्ता 
आपल्या शरीराचा, त्यातल्या स्नायूंचा वापर योग्य पद्धतीने करणारे लोक या बुद्धिमत्तेचे असतात. विशेषत: खेळाडू, नर्तक. यांच्यात ही बुद्धिमत्ता असावीच लागते. कोणत्याही मैदानी खेळात आपली चमक दाखवणारे लोक या बुद्धिमत्तेचे असतात. शरीराची क्षमता ओळखून त्याला हवं तसं वाकवणं, वळवणं या कामासाठी शारीरिक बुद्धिमत्तेची गरज असते. 
विविध वाद्यं वाजवणाऱ्या वादकांमध्येदेखील शारीरिक बुद्धिमत्ता असते. कारण उत्कृष्टरीत्या वाद्य वाजवण्यासाठी बोटांमध्ये, बोटांच्या स्नायूंवर योग्य नियंत्रण असावं लागतं. तसंच, अभिनेत्याला आपल्या चेहऱ्यावरच्या स्नायूंवर योग्य नियंत्रण ठेवावं लागतं. तरच यांचं अभिनयासाठी कौतुक होतं. वादकांना आपले हात, बोटं यांच्या स्नायूंवर, तर नर्तकांना संपूर्ण शरीरावरच बारकाईने नियंत्रण ठेवावं लागतं.
म्हणजे मुळात त्यांच्या अंगी कला असते असं म्हणताना ही एक खास बुद्धिमत्ताही त्यांच्याकडे असतेच!

(पुढच्या लेखात व्यक्तिअंतर्गत बुद्धिमत्ता, निसर्गविषयक बुद्धिमत्ता.)


 

 

Web Title: Discovery of intelligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.