विचारा ना आम्हाला, दुष्काळग्रस्त पोरांचं नक्की होतं काय?

By admin | Published: July 16, 2015 07:13 PM2015-07-16T19:13:07+5:302015-07-16T19:13:07+5:30

तुमच्यावर आधीच गावंढळ ठप्पा मारलेला असतो. त्यात जर दुष्काळाबद्दल बोलायला तोंड उघडलं तर शहरी पोरं म्हणणार, काय यार तुम्ही गावाकडची पोरं

Do not ask us, what is the problem of drought? | विचारा ना आम्हाला, दुष्काळग्रस्त पोरांचं नक्की होतं काय?

विचारा ना आम्हाला, दुष्काळग्रस्त पोरांचं नक्की होतं काय?

Next

अभिषेक भोसले

तुमच्यावर आधीच गावंढळ ठप्पा मारलेला असतो. त्यात जर दुष्काळाबद्दल बोलायला तोंड उघडलं तर
शहरी पोरं म्हणणार, काय यार तुम्ही गावाकडची पोरं, लई बोअर असता राव! इकडे आपलं मन आपल्याला खातं.  ते कुणाशी बोलता येत नाही.  तिकडं गावी मायबापाची दुबार पेरणीसाठी पैशाची वणवण आणि इकडं? कुणी तोडून टाकतं, त्या जगाशी संबंधच आणि कुणीकुणी जीव जाळत,
उपाशीपोटी धरतं तग, शिक्षणाच्या आशेनं! दुष्काळग्रस्त हा शिक्का जगण्यालाच तडे पाडत जातो!
------------
साडेचार वर्षापूर्वी शिक्षणासाठी लातूर सोडून पुण्यात दाखल झालो. आपलं शहर सोडून दुस:या भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिघामध्ये आपण पोहचलो की अनेक ओळखी आपल्यामागे लागतात, त्याला मीही काही अपवाद नव्हतो. 
‘विलासरावांच्या गावाचा’ ही लातूरच्या प्रत्येक माणसाला मिळणारी ओळख जोडत लोकांनी आणखी दोन ओळखी नावाच्या मागे जोडल्या. त्यातून दोन नजराही आपोआप माङयासारख्यांकडे विशिष्ट कोनातून पाहू लागतात. एक नजर आपुलकीची, तर दुसरी  ग्रामीण समस्यांच्या अंगानं ज्यांना कधी जग दिसलंच नाही अशा लोकांची ‘शहरी’ नजर!
1993 साली किल्लारीचा भूकंप झाला आणि लातूरच्या लोकांच्या मागे भूकंपग्रस्त अशी आणखी एक ओळख लागली. पुण्यात फिरताना लातूर म्हटलं की भूकंपाची आठवण करून देणारे अनेक सहानुभूती दर्शविणारे अनुभव येतात. त्यात आताशा तुम्ही विदर्भ-मराठवाडय़ातून आलात म्हणजे शहरी लोकांच्या नजरेत आणखी एक ओळख दिसते, ती म्हणजे दुष्काळग्रस्त.
 माङयासारखे अनेक जण दुष्काळग्रस्त ही ओळख घेऊन पुण्यासारख्या शहरात दाखल होतात. जिथं वाहत असतो पाण्याचा महापूर, झगमगाट असलेले रस्ते, एफ. सी रोड - जे. एम. रोडवर वन पीस आणि शॉर्ट्स घालून वावरणा:या मुली, हातात हात घालून फिरणारी जोडपी, बरिस्ता- वाडेश्वर- गुडलक- वैशाली- रूपालीतली आतली आणि बाहेरची गर्दी. दुष्काळ पाहिलेली गावाकडची पोरं मग यात स्वत:ला कुठं तरी अॅडजेस्ट करायचा प्रयत्न करत राहतात. कॉलेज सुरू झालेलं असतं, कट्टय़ावरच्या गप्पा रंगात येत असतात, व्हॉट्स अॅपवर जोक्सचं व्हायरल होणं चालू झालेलं असतं. सगळं जगच  ‘हॅपनिंग’ असतं. आणि त्याचवेळी मन तुटायला लागतं, गावाकडं पेरणी करूनही पाऊस नसल्यानं मनावर साचणारं मळभ कुणाला बाहेर सांगताही येत नाही. 
एकतर आधीच तुम्ही मराठवाडा- विदर्भातून पुण्यात गेलेले, तथाकथित प्रमाण भाषेचा संबंध नसल्यामुळे एलिट वर्गाने तुम्हाला स्वीकारायची सुतराम शक्यता नसते. स्वीकारल्यानंतर त्यांच्यात बसून इंग्रजी चित्रपट, बर्गर, पिङझा यांच्या गप्पा मारायच्या सोडून दुष्काळाबद्दल बोललात तर मग विषयच संपला. तुमच्यावर आधीच गावंढळ ठप्पा मारलेला असतो त्यात आता बोअरछापही ठरवले जाता. ‘काय यार तुम्ही गावाकडची पोरं लई बोअर असता राव’ म्हणणारी एक जमात माङयासारख्या प्रत्येकाने अनुभवलेली असते.
मग इकडे आपलं मन आपल्याला खातं ते कुणाशी बोलता येत नाही. तिकडे आईवडील शेतकरी असतील तर सगळीच आर्थिक गणितं कोलमडायला लागतात. तिकडे दुबार पेरणी करायला लागली की इकडं पैशाची चणचण. मग कधी विद्यापीठात दोन दिवस काढायचे, तर कधी मित्रच्या खोलीवर दोन दिवस, मित्रच्या डब्यात दोन घास खायचे आणि निघायचं. एखादा चांगला मित्र  असला तर तो म्हणतो, ‘ठेव हे शंभर रु पये’ मग तेवढाच दिलासा.
बाकी कट्टय़ावर सगळं कसं आनंदात असतं. जगातली संकटं  संपली असून, आता फक्त उत्साहात सेल्फी काढायचाच असा नूर असतो. मग मित्रंसोबत बाहेर जाणं, फिरणं, खाणंपिणं ओघानं आणि आपल्याही नकळत अनवधानानंच सुरू होतं. पण किती दिवस? या मित्रंनी आल्यापासून आपल्यावर खर्च केलेला असतो. त्याची परतफेड पण करायची काही सोयच नसते. हातात पैसाच नसतो. मग  मित्रत  न बसणं, दिसले की लांबून जाणं अशा गोष्टी उरावर दगड ठेवून कराव्याच लागतात. म्हणजे दुष्काळ आम्हाला फक्त सतावत नाही, तर मित्रमैत्रिणी, माणसं यांच्यापासून दूर करत जातो. मग त्याचा सगळा परिणाम अभ्यासावर, वागण्या-बोलण्यावर होतोच.
अर्थात हे झालं एक चित्र. स्वत:चं मन खाणारी मुलं अशी असतात तशी या दुष्काळी नात्यापासून लांब पळणारी पोरंही असतात. उधारी करून चैन करणारीही असतातच. आपण ग्रामीण भागातून, दुष्काळातून आलोय म्हणून काय असंच राहयचं का, असा विचार करत जगणारीही असतात. गावाकडं पीक करपत चाललेलं असतं, माय दिवसभर  पाण्याच्या आणि बाप कोणासमोर तरी खतासाठी पैसे दे म्हणत हात पसरत उभा असतो आणि पोरानं मात्र इकडं आल्यावर स्मार्ट फोनसाठी, प्रयोगशाळा वही, प्रोजेक्ट, याची फी, त्याची फी म्हणत पैसा मागवलेला असतो. तो पैसा जात मात्र असतो संभाजी बागेतल्या भेळवर आणि ङोड ब्रिजवरच्या खारमुरेवाल्याकडे, लोणावळ्याच्या भुशी डॅमच्या कणसावर आणि ‘गर्लफ्रेंड’ला दिलेल्या भेटीवर. दुष्काळ असो वा नसो, यांच्या जीवनात मात्र सतत माय- बापाच्या घामावर उगवलेली ‘हिरवळ’ असते. 
पण दुष्काळग्रस्त भागातून आलेली सगळीच सरसकट पोरं अशी नसतात. वर सांगितलेल्या दोन प्रकारात असणा:यांची संख्या बहुसंख्य आहे; पण त्यातही संवेदनशील विचाराने झपाटलेला, दुष्काळातून आलेला विद्यार्थीही आतडं चिरत असताना तग धरून राहतोच की!  पुण्याची भाषा, संस्कृती, सुशिक्षितपणाच्या तथाकथित व्याख्या फाटय़ावर मारत जगणारी ही पोरं दुष्काळासंबंधीच्या संवेदनशील आणि असंवेदनशील भावनांच्या मधली पुसट रेषा ओळखण्याची हिंमत ठेवून असतात. 
एफ.सी. रोडवरच्या रानडे इन्स्टिटय़ूट कॅण्टीनसारखे, मराठवाडय़ातील मुलांच्या कट्टय़ांसारखे कट्टे इतरही अनेक ठिकाणी आहेत. मराठवाडा आणि विदर्भात जिथं आमच्या वृत्तपत्रची पानं दुष्काळ आणि आत्महत्त्यांच्या घटनांनी रंगलेली असतात, तिथं पुण्यात मात्र या दुष्काळाच्या बातम्यांचाच दुष्काळ असतो. जिथं जगतो त्या जगात गावाकडच्या दुष्काळाच्या खाणाखूणाही नसतात. मग असे कट्टे आपल्या दुष्काळग्रस्त या ओळखीची आठवण करायला उपयोगी ठरतात. आणि अशाच कट्टय़ांवर पुण्यातील दुष्काळावर अभ्यास करणारी विचारी मित्रमंडळी भेटतात. पुण्यातल्याही ज्या माणसांना गावाकडचं जग, त्यातले प्रश्न कळतात तीही मग कळकळीनं या कट्टय़ांवर भेटतात. 
- हे सगळं चालू असताना पाहता पाहता सेमिस्टर संपायला येतं आणि प्रेङोंटेशनचे दिवस येतात. कला विभागाच्या विद्याथ्र्यासाठी दरवर्षी ठरलेला हमखास विषय यावर्षीही असतो- दुष्काळ. मग कधी शेतातलं कसपटही न उचललेल्या पॉवर पॉईंट प्रेङोंटेशन संप्रदायातील मित्रमैत्रिणी गुगलवरून डाऊनलोड मारलेले दुष्काळाचे फोटो त्यांचं पीपीटी रंगवतात. दुष्काळ म्हटलं की पीक कोणतं घ्यायचं याची स्लाईड आलीच आणि मग सल्लाही. पाण्याचे योग्य नियोजन राखण्यासाठी उसासारखी पिके घेऊ नयेत वगैरे बाताही केल्या जातात. दुष्काळातून आलेल्या पोराच्या डोक्यात मात्र भूतकाळातील आठवणी, वर्तमानातील जगणं आणि भविष्याची चिंता यांचा धिंगाणा चालू झालेला असतो. 
 वाटतं, आपण लहानपणापासून जगत आलोय हा दुष्काळ. हाफशावरच्या रांगा काही आजवर कधी संपल्या नाहीत, की घरातली चणचण कधी आटली नाही.  पाणी यायच्या दिवशी लग्नाची तारीखही कोणी काढत नाही आपल्या भागात! पाणी आलं की हावरटासारखं वाटीपासून सगळी भांडी भरणा:या गावातले आपण! आणि आपल्याला सांगतात हे, संडासच्या फ्लशने एक काकरी भिजेल येवढं पाणी वाया घालवणारी ही शहरी माणसं आपल्याला सांगतात कोणतं पीक घ्यायचं! हे ऐकलं की मग या पोरांच्या लक्षात येतं की, बाप्पा दुष्काळाच्या समस्यांवर उपाय सांगणारी अशी मंडळी असल्यावर दुष्काळ काय संपणार आपल्या नशिबीचा? सणक जातेच डोक्यात. 
शेतावर, घरावर आणि जगण्यावर असलेलं दुष्काळाचं सावट  आपल्या करिअरवर पडू नये असा घोर जिवाला असतोच. एफ.सी. रोडच्या दुकानातील विंडो शॉपिंग करत, महागाचं जेवण टाळत रसिक मेसच्या 8क् रुपयांत तीन जण जेवत आणि उसाच्या बिलाच्या भरवशावर कॅण्टीनमध्ये उधारी करत खंबीरपणो ‘दुष्काळग्रस्त’ या टोमण्याला उत्तर देत, विद्यापीठातील ढेकणांना कुशीत घेत आम्ही दिवस काढत राहतो.
वाटतं कधीकधी, जे आहे ते आहे. दुष्काळ आणि त्यांचे चटके माहितीच नसणा:या या शहरी माणसांना सांगावंच एकदा की, येस, आय अॅम फ्रॉम लॅण्ड ऑफ काटय़ाकुटय़ा अॅण्ड दुष्काळ! 
आहे काही हरकत तुमची?
 
 

Web Title: Do not ask us, what is the problem of drought?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.