मनासारखा जॉब मिळत नाही? मग मिळेल तो करा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 01:40 PM2017-10-04T13:40:22+5:302017-10-05T07:36:19+5:30

आपल्याला हवा तसा जॉब मिळाला नाही तर घरी बसेन,ही वृत्ती तुम्हाला कायमचं घरी बसवू शकते!त्यापेक्षा प्लॅन करून नोकरी सोडा, नोकरी सोडताना आपलं करिअर एक पाऊल पुढे सरकायला हवं, मागे पडायला नको!

Do not get a job like a man? Then get it ... | मनासारखा जॉब मिळत नाही? मग मिळेल तो करा...

मनासारखा जॉब मिळत नाही? मग मिळेल तो करा...

Next

- निशांत महाजन
‘आॅफर लेटरला भुलू नका, अपॉइण्टमेण्ट लेटर हातात असल्याशिवाय आहे त्या नोकरीचा राजीनामा देऊ नका..’ - एका कोकणातला नेता..

अशा आशयाचा एक विनोदी फॉरवर्ड मेसेज कदाचित तुम्हालाही गेल्या आठवड्यात फॉरवर्ड होत आला असेल. त्यातला विनोद आणि राजकारण सोडून देऊ; पण या मेसेजमध्ये तथ्य आहे.
अलीकडे तरुण मुलंही, विशेषत: कार्पोरेट जगात. नुस्त्या आॅफर लेटरला भुलतात. आणि हातात असलेल्या नोकरीचा राजीनामा देऊन मोकळे होतात.
अनेकदा ते आॅफर लेटर, आॅफरच्याच रुपात राहतं आणि तिकडचं अपॉइण्टमेण्ट लेटर मिळत नाही. ती नोकरीही हुकेल की काय, अशी स्थिती. क्वचित हुकतेही. आणि आहे त्या नोकरीविषयी खूप नकारात्मक बडबड केलेली असते. मी आता सोडणारच म्हणून वल्गना केलेला असतो. आणि होतं असं की आहे ती नोकरीही जाते. आणि नवीन बडी आॅफर कागदावरच राहते आणि प्रत्यक्षात हाती काहीच पडत नाही.
त्यात सध्या तरुण जगात एक नवीन ट्रेण्ड आला आहे.
मी गॅप घेतलीये, आय अ‍ॅम फ्री, आय रिझाईन अशी स्टेटस आता फेसबुकवर दिसतात. लोकं त्यांचं अभिनंदन करतात. काहींना मत्सरही वाटतो की, आपण काय नोकरीच्या घाण्याला जुंपलोय. लोकं कसे राजीनामा देऊन मोकळे होतात.
काही जणांना वाटतं की चांगला जॉब मिळाल्याशिवाय अजिबात कुठं नोकरीच करणार नाही. त्यापेक्षा अभ्यास करीन. खाईन तर तुपाशीच असा त्यांचा अ‍ॅटिट्यूड. पण असं नोकरी सोडून घरी बसणं महागात पडू शकतं, म्हणजे आर्थिकदृष्ट्याच नाही तर तुमच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावरही त्याचा थेट परिणाम होतो. त्यामुळे नोकरी नसण्यापेक्षा नोकरी असलेली बरी हे कायम लक्षात ठेवा.
अलीकडे एका ब्रिटिश संस्थेचा अभ्यास प्रसिद्ध झाला. हा अभ्यास यूके हाउसहोल्ड स्टडी नावानं उपलब्ध आहे. तर नोकरी बदलणाºया, नोकरी बदलून नवी नोकरी शोधण्याच्या काळात असलेल्या, ट्राझिटमधल्या, गॅप घेतलेल्या, रागानं तडकाफडकी राजीनामा देऊन घरी बसलेल्या, आॅफिसनं ‘नारळ’ दिलेल्या अनेकांचा या सर्व्हेत अभ्यास करण्यात आला. आणि अभ्यास कशाचा तर नोकरी नसतानाच्या काळात यांच्या आरोग्यावर काय परिणाम झाले याचा. ते परिणाम मानसिक, शारीरिक, स्ट्रेस लेव्हल, हृदय विकार, पचनशक्ती, प्रतिकारशक्ती या वेगवेगळ्या टप्प्यात मोजले गेले. आणि त्यात असं दिसून आलं की, मानसिक ताण प्रचंड वाढलेला असतो. त्यातून एकटेपणा येतो. रुटीन बिघडतं. आर्थिक ताण असताताच. त्यात पचनक्षमता बिघडते. आरोग्य घसरतं. आणि एकूणच आरोग्याची वाताहात होते.
त्या तुलनेत अशा माणसांचं आरोग्य बरं दिसतं जे नोकरीला चिकटून होते. नोकरीवर नाराज होते, कमी पैसे मिळतात म्हणून नाखूश होते, त्यांना नोकरीत ताण होता, जीव नको झाला म्हणत होते तरी त्यांचं आरोग्य हे नोकरी सोडून घरी बसणाºयांपेक्षा चांगलं होतं.
ही परिस्थिती जर ब्रिटनमधली असली तर आपल्याकडे मुळातच नोकºयांची चणचण असताना हवा तसा जॉब मिळाल्याशिवाय नोकरीच करणार नाही, हा अ‍ॅटिट्यूड नुस्ता घातकच नाही तर वेडगळ ठरू शकतो.
त्यापेक्षा आपल्या क्षेत्रातला जो त्यातला त्यात बरा वाटेल तो जॉब घ्या. तिथं शिका. पुढची संधी मिळण्याची वाट पाहा. रिकामपण फार वाईट हे लक्षात ठेवा.
ते रिकामपण टाळून, जर काही कॉँक्रीट प्लॅन आपल्याकडे असेल तर आहे ती नोकरी सोडावी.
केवळ आली लहर, केला कहर असं वागलो तर तारुण्यातले महत्त्वाचे दिवस तर हातून जातातच, पण आपलं आर्थिक आणि मानसिकही मोठं नुकसान होतं, हे विसरू नये.


नोकरी सोडण्याचा विचार करताय? - हे वाचा...

आहे त्या नोकरीचा तुम्हाला खूप कंटाळा आला आहे. प्रचंड मनस्ताप होतोय, घुसमट होतेय. आपल्यावर अन्याय होतोय असं वाटतंय. सोडून द्यावी ही नोकरी, फेकावा साहेबाच्या तोंडावर राजीनामा असंही वाटतं, पण म्हणून तसं करावं का?
घुसमट सहन करत आहे तिथंच काम करावं असं नाही. जास्त पैसे हवे तर नोकरी बदलण्यात चूकही काही नाही.
पण ती बदलताना आपण जर काही अक्षम्य चुका केल्या तर आपलं करिअर गोत्यात येऊ शकतं. ते येऊ नये म्हणून या काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

१) काहीच प्लॅन नसेल, दुसरी नोकरी हातात नसेल, पक्कं अपॉइण्टमेण्ट लेटर हातात नसेल तर आहे ती हातातली नोकरी सोडू नका. आधी दुसरी नोकरी शोधा, आहे त्या पे स्लीपपेक्षा जास्त पैसे देणारी नोकरी हातात ठेवा आणि मग ही नोकरी सोडा. तसं न करता नोकरी सोडली तर आपली नोकरीच्या बाजारातली किंमत शून्य होऊ शकते.

२) ट्राण्झिट प्लॅनचा विचार करा, म्हणजे काय तर आपण नोकरी सोडू त्या काळात जर दोन-तीन महिने आपल्या हाती दरमहा पगार येणार नसेल तर आपलं कसं भागेल याचा विचार करा.
३) तडकाफडकी कधीही नोकरी सोडू नका. आता आहे त्या कंपनीत, बॉस किंवा अन्य विभागप्रमुखांशी भांडण करून, तमाशे करून नोकरी सोडू नका.
४) त्यापेक्षा नम्रपणे सांगा, इथं जी संधी मिळाली त्यासाठी धन्यवाद द्या. चांगल्या टर्म्सवर नोकरी सोडा. पुन्हा याच कंपनीत कामाला यावं लागलं तर हे दार आपल्यासाठी उघडं रहायला हवं, याचा प्रॅक्टिकल विचार करा.
५) या संस्थेत जे काम केलं, त्याची एक यादी करा. त्या कामाचे पुरावे आपल्याकडे ठेवा.
६) शक्य झाल्यास लिंकडीन प्रोफाइल अपडेट करा, आत्ताच्या बॉसला किंवा वरिष्ठांना तुमच्यासाठी तिथं रेकमेंडेशन लिहिण्याची विनंती करा.
७) नाहीच मिळाली अपेक्षित नोकरी किंवा तिही सोडावीच लागली अचानक तर त्या काळात आपला आर्थिक गाडा कसा चालेल याचंही प्लॅनिंग करा.
८) सगळ्यात महत्त्वाचं नोकरी सोडण्याचा निर्णय भावुक होऊन घेऊ नका, तर प्रॅक्टिकली घ्या.

Web Title: Do not get a job like a man? Then get it ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.