जे आपण करु शकतो, ते तरी आपण करतोय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 04:59 PM2018-10-04T16:59:54+5:302018-10-04T17:00:01+5:30
जे हातात नाही त्यासाठी रडण्यापेक्षा जे हातात आहे, त्याचं आपण काय करतो?
- विकास बांबल
कॉलेजमध्ये सर वर्गात शिकवत असताना घडलेला किस्सा.
ज्यामुळे मला खूप मोठी शिकवण मिळाली.
बिझनेस मॅनेजमेण्ट या विषयाचा क्लास चालू होता. माझा आवडता विषय. सरसुद्धा छान तल्लीन होऊन शिकवत होते. थोडय़ाच वेळात वर्गाच्या खिडकीतून बाहेरचे हसण्या-खिदळण्याचे आवाज ऐकायला आलेत व मोबाइलवरची गाणीसुद्धा ऐकू येऊ लागली. त्या आवाजामुळे संपूर्ण वर्ग डिस्टर्ब झाला.
सर तसेच तडकाफडकी खिडकी जवळ गेलेत. खिडकीतूनच डोकावून पाहत गाणी वाजवणार्या मुलांना विनंती केली, ‘अरे मुलांनो, येथे गाणी वाजवू नका.’ सरांच्या बोलण्यावर मुलांनी गाणी लगेच बंद केलीत आणि सर पुन्हा शिकवायला लागलेत. मग पुन्हा पाच-दहा मिनिटांनी गाण्यांचा आवाज ऐकायला येऊ लागला. सरांनी पुन्हा एकदा संबंधितांना विनंती केली, कृपया येथे गाणी वाजवू नका. क्लास चालू आहे.
पण ह्यावेळी गाणी बंद झाली नाहीत उलट बाहेरून हसण्याचे आवाज आलेत.
तेव्हा सरांनी नाइलाजाने ती खिडकी पूर्णपणे बंद करून घेतली. त्यामुळे ऐकू येणार्या आवाजाची तीव्रता बरीच कमी झाली. मग सरांनी आपला आवाज थोडा वाढवत आम्हाला शिकविण्यास सुरुवात केली.
तेव्हा सरांनी एक गोष्ट सांगितली होती. आजही ती स्मरणात आहे.
सर म्हणाले, मी प्रयत्न करूनही मुलांनी गाणी बंद केली नाहीत, पण मी ही खिडकी बंद करू शकत होतो जे माझ्या हातात होते ते मी केले. दुसर्यानं काय करायला पाहिजे यापेक्षा मी काय केलं पाहिजे, माझ्या हातात कुठला पर्याय आहे याचा विचार आपण करायला हवाय.
ही गोष्ट छोटी असली तरी सुखी आणि समाधानी जीवन जगण्याचा मंत्न देणारी आहे.
आयुष्यात बर्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. त्या आपल्या हातात नसतात याच गोष्टीची सल आयुष्यभर आपण बाळगतो त्यामुळे बरेचदा दुर्खच आपल्या वाटय़ाला येते. याउलट माझ्याकडे काय आहे? याचा मी जीवन सुंदर करण्यासाठी कसा उपयोग करून घेऊ शकतो? हा विचार प्रत्येकाने केल्यास दुर्खाचा भार तेवढाच कमी करता येईल.
जेवढा सकारात्मक विचार करून आपल्याला जगता येईल तेवढे आपणच स्वतर् आनंदी राहू. नकारात्मक विचार वेदनेशिवाय काही देत नाही. नेहमी आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा पुरेपूर उपयोग करून घेता आला पाहिजे. आपल्या हातात अमुक गोष्ट नाही म्हणून मन लहान करून घेऊ नये. जे आपल्या हातात आहे त्यावर समाधान व्यक्त करा. आणि प्रयत्न करीत राहा.
आयुष्याचा प्रवास करताना जे आपल्या हातात नाही त्याचा शोक करीत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा आनंद घेत उपयोग करून घेणं महत्त्वाचं.
आपण आपल्या हाती कण्ट्रोल घेतलेला बरा.