डीप  फेकचा ट्रॅप माहीत आहे का? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 07:54 AM2020-12-10T07:54:25+5:302020-12-10T07:55:01+5:30

समाजमाध्यमात वावरताना तुम्ही नक्की कशाला बळी पडू शकता? डीप फेक, सेक्सटॉर्शन हे नक्की काय आहे?

Do you know about deep fake trap ? | डीप  फेकचा ट्रॅप माहीत आहे का? 

डीप  फेकचा ट्रॅप माहीत आहे का? 

Next

-आवेज काझी

सेक्सटॉर्शन, डीप फेक हे शब्द तरुण मुलांच्या जगात दबक्या आवाजात बोलले जातात. मात्र, ते गंभीर गुन्हे आहेत आणि त्याला बळी पडणारे अधिक त्या गर्तेत अडकत जातात, याविषयी मात्र उघडपणे बोललं जात नाही. फेसबुक मॅसेंजरद्वारे ऑनलाइन सेक्स करायला लावून त्याचा व्हिडीओ रेकाॅर्ड केला जातो व तो सोशल मीडियावर व्हायरल करायची धमकी देऊन पैशाची मागणी करत ब्लॅकमेल केलं जात असल्याच्या घटना आहेत.

हे गुन्हेही ठराविक पद्धतीने केले जातात. उदा. सुहानी नावाने इंस्टाग्राम, फेसबुक किंवा मॅसेंजरवर खाते उघडले जाते. त्यानंतर त्या अकाउंट प्रोफाईलवर एखाद्या सुंदर दिसणाऱ्या मुलीचा किंवा स्त्रीचा प्रोफाईल फोटो ठेवला जातो. हळूहळू फेसबुक मॅसेंजरद्वारे मैत्री वाढविली जाते. मैत्री वाढल्यावर समोरच्या व्यक्तीकडून प्रेमाच्या गोष्टी बोलल्या जातात. प्रेमाच्या जाळ्यामध्ये एकदा का व्यक्ती अडकली की मग त्यास काही अश्लील संभाषण केले जाते. हळूहळू अश्लील संभाषण वाढवून, कपडे काढण्यास सांगून किंवा नग्न व्हायला सांगितले जाते. मग नग्न झाल्यास लैंगिक कृती करायला सांगतात. हे सारं रेकॉर्ड करून समोरच्या व्यक्तीकडून पैशाची मागणी केली जाते व धमकावले जाते की, जर पैसे नाही दिले तर हा व्हिडीओ त्या व्यक्तीच्या मित्रांना किंवा सोशल मीडियावर सर्व ॲप्सवर टाकून देऊ. त्यातून अनेकांकडून पैसे उकळले जातात. तरुण मुलांनी या साऱ्याविषयी सावध राहण्याची गरज आहे.

ऑनलाइन अशाप्रकारच्या कुठल्याही मागणीला बळी न पडणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.

डीप फेक म्हणजे काय?

डीप फेक हा असाच एक शब्द. बहुतांशी प्रकरणांमध्ये असे निर्दशनास आले आहे की, हे व्हिडीओ एका विशिष्ट साॅफ्टवेअरच्या माध्यामातून बनवून त्यात अश्लील क्लिपचा भाग मिक्स करून माॅर्फ केलेले असतात. पण ज्यांचे असे व्हिडीओ बनतात त्यांना असं वाटतं की, हा व्हिडीओ खराच आहे. आपला असा व्हिडीओ सोशल मीडियात किंवा मित्र परिवारांमध्ये व्हायरल झाला तर ते हा माॅर्फ केलेला व्हिडीओ खरा समजतील व आपल्याविषयी गैरसमज होईल, असं अनेकांना वाटतं. त्या भीतीपोटी, अब्रुनुकसान टाळण्यासाठी सायबर गुन्हेगारांच्या धमक्यांना बरेच जण बळी पडून पेटीएमद्वारे लाखो रुपये देत बसतात.

मुळात हा शब्द डीप लर्निंग आणि फेक मिळून बनलेला आहे. डीप लर्निंग एकाप्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजेन्स सॉफ्टवेअर आहे. ज्याच्या मदतीने फेक व्हिडीओ तयार केले जातात. याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही व्यक्तीचा चेहरा व्हिडीओमध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याने करू शकता. आर्टिफिशियल इंटेलिजेन्सद्वारे हे काम एवढ्या सूक्ष्मपणे केले जाते की, खरं खोटं कळू नये. या पद्धतीच्या व्हिडीओ एडिटिंगला डीप फेक म्हणतात. यामध्ये व्यक्तीच्या बोलण्याच्या पद्धती, व्यवहाराचीसुद्धा हुबेहूब नक्कल केली जाऊ शकते. याच गोष्टीचा फायदा सायबर गुन्हेगार घेतात.

विशेषत: तरुण वर्ग जो चांगल्या पदावर आहे व ज्यांची आर्थिक सुबत्ता चांगली आहे, जे इंस्टाग्रामवर आहेत, त्यांना टार्गेट केलं जातं. सायबर तज्ज्ञांच्या मते पबमधील डाटा चोरी करून त्यांच्या व्हाॅट्‌सॲप, इंस्टाग्राम किंवा फेसबुकद्वारे तरुणांना फाॅलो केले जाते व त्यानंतर हळूहळू त्या व्यक्तीशी संबंध प्रस्थापित करून सेक्स चॅट, न्यूड व्हिडीओ शेअरिंग केले जाते. एकदा व्हिडीओ रेकाॅर्ड झाला की मग त्यात आर्टिफिशिअल इंटिलेजिन्सद्वारे माॅर्फिंग करून व्हिडीओ मिक्सिंग केला जातो. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन फोन पे किंवा इतर माध्यमातून पैसे उकळले जातात. या साऱ्यावर उपाय हाच की सावध राहा. समाजमाध्यमं जबाबदारीने वापरा. आवश्यक तर सायबर पोलिसांची मदत घ्या, ब्लॅकमेलिंगला बळी पडू नका.

( लेखक पोलीस उप-निरीक्षक असून सायबर गुन्हे तज्ज्ञ आहेत.)

awezkazi@gmail.com

Web Title: Do you know about deep fake trap ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.